Zendu-Lagwad-In-Marathi-naturekrushi.jpg

Zendu Lagwad In Marathi

Blog फूल

Zendu Lagwad In Marathi

Zendu Lagwad In Marathi: झेंडू चा वापर हा आपण प्रत्येक सणाला करतो. दसरा, दिवाळी होळी या सणांमध्ये झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असते. झेंडूच्या फुलांना धार्मिक कार्यामध्ये आणि सजावटीसाठी असलेले महत्त्व सर्वश्रुत आहे. झेंडूची फुले पिवळ्या रंगाच्या विविध छटा सोबत लाल, केसरी, नारंगी अशा विविध रंगछटांमध्ये उपलब्ध असतात. झेंडूचे सजावटीसाठी आणि धार्मिक कार्यामध्ये सोडून बरेच अजून फायदे आहेत. जखम व मुका मार यावर झेंडूच्या फुलांचा वाटून लेप उपयोग मध्ये आणल्यावर वेदना कमी होतात. झेंडू मलेरियांच्या डासांचा देखील नाश करते. चेहऱ्यावर होणारा जळजळपणा, पुरळ सारख्या आजारांवर सुद्धा चांगला उपयोग करता येतो.

मुत्रविकारांमध्ये झेंडूचे औषधी गुणधर्माचा फायदा होतो. झेंडूच्या फुलांचे चूर्ण श्वसनाचे विकार बरे करण्यासाठी उपयुक्त ठरतात. झेंडूच्या सर्व वनस्पतीचे सर्व भाग पान, फुल, फांदी, बिया सर्वांचा उपयोग होतो. झेंडूची लागवड ही तिन्ही हंगाम मध्ये केली जाते. त्यामुळे शेतकऱ्याला चांगला फायदा होतो. सणासुदीच्या काळामध्ये झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळतो. झेंडूचा लागवड आपण आंतरपीक म्हणून सुद्धा करू शकतो. बागायती भागांमध्ये झेंडूची फुले लावली जातात. त्यामुळे परागीभवन होण्यासाठी मधुमक्षिका आकर्षित होतात आणि नैसर्गिक रित्या परागीभवन वाढते आणि उत्पादन देखील वाढते. झेंडूची लागवड केल्यामुळे शेतकऱ्याला कमी कालावधीमध्ये चांगला फायदा मिळतो.

लागणारी जमीन :

  • झेंडू लागवड हे वेगवेगळ्या जमिनीमध्ये करता येते.
  • चांगले उत्पन्न घेण्यासाठी सेंद्रिय पदार्थ जास्त असलेले, पाण्याचा उत्तम निचरा होणारे जमीन, झेंडू साठी चांगली असते.
  • भरपूर सेंद्रिय पदार्थ असल्यामुळे रोपांची वाढ चांगली होते आणि उत्पन्न देखील चांगले मिळते.
  • क्षारयुक्त, पाणथळ जमिनीमध्ये झेंडूची लागवड करणे टाळावे, झेंडूच्या लागवडीसाठी जमिनीचा सर्वसाधारणपणे सामू 7 ते 7.5 च्या दरम्यान असल्यास योग्य ठरते.
  • झेंडू साठी स्वच्छ भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
  • झाडे सावलीमध्ये चांगले वाढतात पण फुलांचे उत्पादन कमी मिळते.

लागणारे हवामान :

  • झेंडूचे पीक हे तिन्ही हंगामामध्ये घेतले जाऊ शकते.
  • झेंडूच्या पिकाला थंडीचे वातावरण जास्त मानवते.
  • म्हणजेच झेंडूची वाढ आणि फुलांचा दर्जा थंड हवामानामध्ये चांगला येतो.
  • रात्रीच्या वेळी 15 ते 18 अंश सेल्सिअस तापमान मध्ये झाडाची वाढ चांगली होते आणि उत्पन्न देखील चांगले मिळते.
  • जास्त प्रमाणामध्ये पाऊस या पिकाला हानिकारक ठरतो.
  • जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे करपा या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो, त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते.

झेंडूच्या जाती :

अ.आफ्रिकन झेंडू :

या प्रकाराचे झेंडू खूप उंच झुडपामध्ये वाढतात. झुडुप काटक असतात. या प्रकारात मध्ये फुले टपोरी असतात.

फुलांना केशरी आणि पिवळ्या रंगाच्या छटा असतात. काही फुले पांढरी देखील असतात. या प्रकारातील फुले ही हार बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.

ब. फ्रेंच झेंडू :

या प्रकारांमधील झेंडूची झुडपे उंचीला थोडी कमी असून झुडपा सारखी वाढतात.

प्रकारातील जाती कुंडीमध्ये, बागेमध्ये तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावल्या जातात आणि सुशोभीकरण करण्यासाठी या जातीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

या प्रकाराची फुले आकाराने लहान मध्यम असून रंगात वेगवेगळ्या प्रकाराची असतात.

क. संकरीत जाती :

1. पुसा बसंती झेंडू :

झेंडूच्या या जातीची लागवड सर्व जागी केली जाऊ शकते .या जातीच्या फुलांचा आकार मध्यम असून फुले पिवळ्या रंगाचे असतात.

फुलांचे उत्पादन 80 ते 100 क्विंटल एकरी मिळते. ही जात 1995 मध्ये विकसित केलेली आहे.

2. पुसा अर्पिता :

झेंडूची ही जात 2009 मध्ये विकसित केलेली आहे .या जातीपासून सरासरी 75 ते 80 क्विंटल एकरी उत्पन्न मिळते.

या जातीच्या फुले आकाराने मध्यम असून हलक्या केशरी रंगाचे असतात.

3. पुसा ऑरेंज झेंडू :

या जातीच्या झेंडू चा वापर औषधी तयार करण्यासाठी केला जातो. या जातीपासून एकरी 100 ते 120 क्विंटल उत्पन्न मिळते. या जातीचे फुले हे आकाराने मोठे असतात आणि फुले गडद केशरी रंगाचे असतात.

4. मखमली :

या जातीची फुले दोन रंगाची असतात. ही जात बुटकी असून फुले लहान आकाराचे असतात. या जातीचा वापर कुंडीमध्ये लावण्यासाठी केला जातो किंवा बागेच्या कडेने लावण्यासाठी चांगली ठरतात.

5. गेंदा डबल :

या जातीच्या फुलांना कटफ्लावर म्हणून ओळखले जाते. या जातीमध्ये भगवा आणि पिवळा असे दोन प्रकारे येतात. या जातीची फुले आकाराने मोठी पण संख्येने कमी असतात.

6. गेंदा :

या जातीची झाडे उंच मध्यम वाढतात .फुलांचा आकार मध्यम असतो आणि रंग पिवळा आणि भगवा अशा दोन प्रकारांमध्ये असतो.

या जातीच्या फुलांना हार बनवण्यासाठी चांगली मागणी असते.

7. पुसा नारंगी :

या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 120 ते 130 दिवसानंतर फुले येऊ लागतात .या जातीच्या फुलांचा रंग नारंगी असतो आणि झुडूप झपाट्याने वाढते व 70 ते 75 सेंटीमीटर उंच वाढते.

8. पुसा बसंती :

झेंडूची ही जात कुंडीमध्ये लागवड करण्यासाठी योग्य मानले जाते. लागवड केल्यानंतर सरासरी 135 ते 145 दिवसांमध्ये फुले येऊ लागतात.

या जातीची फुले 6 ते 9 सेंटीमीटर व्यासाची असून पिवळ्या रंगाची असतात. या जातीची झुडपे 60 सेंटीमीटर उंच वाढतात.

लागवड :

  • झेंडूची लागवड करण्यासाठी सर्व जमीन नांगरून भुसभुशीत करावी.
  • सर्व ढेकळे फोडून घेऊन जमीन एकसारखी करून घ्यावे. झेंडूची लागवड ही सरीवरंबा, सपाट वाफा, रुंद सरी किंवा गादीवाफ्यावर केली जाते.
  • शेवटच्या कोळप्याच्या पाळीच्या वेळी जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे.
  • झेंडूची लागवड ही 60 × 30 सेंटिमीटर अंतरावर केल्यावर रोपांची अपेक्षित संख्या शेता मध्ये बसते.
  • त्यामुळे हेक्‍टरी चांगले उत्पादन मिळते.
  • झेंडूची लागवड ही सायंकाळी चार नंतर करावी.
  • रोपांची मर होऊ नये म्हणून बीजामृत मध्ये झेंडूच्या रोपांच्या मुळ्या भिजवून लावाव्या.
  • 60 × 30 सेंटिमीटर या अंतराने झाडे लावल्यावर एकूण 40 हजार झेंडूची रोपे हेक्टरी लागतात.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

  • पूर्व मशागत करत असताना चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळून घ्यावे.
  • जमिनीला जीवामृत सोडावे त्यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि पिकाला वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते.
  • परिणामी भरघोस उत्पन्न वाढते.
  • झेंडूला योग्य वेळी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.
  • पाण्याचे व्यवस्थापन जमिनीच्या मगदूराप्रमाणे करावे.
  • फुल येण्याच्या काळामध्ये पाण्याची कमतरता पडू देऊ नये.
  • ठिबक सिंचनाचा वापर पाणी व्यवस्थापनामध्ये केल्यावर पिकाला त्याचा चांगला फायदा होतो आणि पाण्याची देखील बचत होते.
  • जमिनीमध्ये पाणी साठवून राहणार नाही याची योग्य काळजी घ्यावी, नाहीतर जास्त पाणी झाल्यामुळे झेंडूच्या झाडांच्या मुळ्या कुजतात.

आंतर मशागत :

  • लागवड केल्यानंतर झेंडूचे शेत पूर्णपणे तनवीरहीत ठेवणे खूप गरजेचे असते.
  • वेळोवेळी खुरपणी घेणे आणि कोळपणी घेणे हे खूप गरजेचे असते.
  • तणांचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यावर उत्पन्नामध्ये कमी येऊ शकते आणि तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे विविध किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो.
  • झेंडूच्या रोपांना वेळोवेळी मातीची भर घालून घ्यावी.
  • कोळपणी ही वापसा आल्यानंतर करावे.
  • कोळपणी केल्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते आणि वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते.

झेंडूवरील किडी :

1. लाल कोळी :

या किडीचा प्रादुर्भाव फुले येण्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ही कीड पानांमधील रस शोषून घेते. त्यामुळे पाने लालसर रंगाची दिसतात. या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

2. केसाळ अळी :

या किडीच्या अळ्या झाडाचे सर्व पाने कुरतडून खाते .त्यामुळे पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात. किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

3. तुडतुडे :

या किडीचे प्रौढ आणि पिले दोन्ही अवस्था पानांमध्ये रस पूर्णपणे शोषून घेतात. त्यामुळे सर्व पाने सुकतात. कोवळ्या पानांमधून आणि फांद्यांमधून मोठ्या प्रमाणावर शोषून घेतल्यामुळे फांद्या टोकाकडून खालच्या बाजूला सुकत जातात. त्यामुळे संपूर्ण झाड पिवळे पडते आणि उत्पादनामध्ये घट होते. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी शेतामध्ये घ्यावे.

झेंडूवरील रोग :

1. मर रोग :

या रोगाचा प्रादुर्भाव आफ्रिकन झेंडूवर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव उष्ण वातावरणामध्ये आणि आद्रता जास्त असल्यावर वाढतो. मर रोग झाल्यानंतर झेंडूचे पाने पिवळी पडतात आणि मुळे पूर्णपणे सडतात. त्यामुळे पूर्ण झाड मरते या रोगावर नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

2. करपा :

हा रोग झेंडूवर आढळणारा मुख्य रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव बुरशीमुळे होतो, या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झेंडूच्या पिकाच्या खालच्या पानावर काळे ठिपके दिसून येतात. त्यामुळे पाने गळतात परिणामी झेंडू करपून मरतो. करपलेली सर्व पाने काढून टाकावी व जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.

फुलांची काढणी :

  • झेंडू लागवड केल्यानंतर सरासरी तीन महिन्यानंतर फुले येतात.
  • झेंडूची पूर्ण उमललेली फुले देठासोबत तोडावी आणि त्यांची वेचणी करावी.
  • फुलांची तोडणी नेहमी दुपारनंतर किंवा सकाळी करावी.
  • फुले तोडत असताना कोवळ्या फांद्या आणि नवीन कळ्या यांना इजा होऊ नये याची योग्य काळजी घ्यावी.
  • फुले तोडून झाल्यानंतर सावलीमध्ये ठेवावेत त्यानंतर पिशवीमध्ये भरून बाजार मध्ये पाठवावे.

उत्पादन :

  • झेंडूच्या फुलांचे उत्पन्न हे जमिनीचा प्रकार, हवामानांमधील बदल, वेगवेगळ्या वाणाचे प्रकार, खत आणि पाणी नियोजन, आंतरमशागत या गोष्टींवर अवलंबून असते.
  • आफ्रिकन झेंडूचे सरासरी 15 ते 18 टन हेक्टरी उत्पादन मिळते आणि फ्रेंच झेंडूचे 12 ते 15 टन एवढे उत्पादन आपल्याला मिळते.
  • वेगवेगळ्या जातीनुसार झेंडूचे उत्पादन बदलते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/flower

5/5 - (1 vote)