Cultivation-of-Termaric-plant-NATUREKRUSHI-1.jpg

Haldi Lagwad In Marathi

Blog मसाले

Haldi Lagwad

Haldi Lagwad In Marathi: हळद हे मसाला पिकांमध्ये प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये खूप काळापासून हळदीची मोठ्या प्रमाणावर लागवड शेतकरी करतात. महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, चंद्रपूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हळदीचे लागवड केली जाते. भारतामध्ये हळदीला ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक आणि औषधी खूप महत्त्व आहे. हळदीचा उपयोग भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. भाजीमध्ये, तिखट मध्ये, मसाल्यांमध्ये आणि तसेच हिंदू धर्मामध्ये सुद्धा हळदीचे खूप महत्त्व मानले जाते. हळदीपासून कुंकू बनवला जातो. सौंदर्य प्रसाधनांमध्ये तसेच लग्न समारंभामध्ये हळदीचे खूप महत्त्व मानले जाते.

हळदीचे औषधी गुण सुद्धा खूप आहेत. सर्पदंशावर, विंचू चावल्यानंतर, खोकल्यावर, मुळव्याध, कफ रोगावर, मुतखड्यावर, हळद, औषधी म्हणून वापरली जाते. हळदीमध्ये रक्त शुद्ध करण्याचा गुण सुद्धा असतो. हळदीमध्ये अ जीवनसत्व जास्त प्रमाणामध्ये असते. जखम झाल्यानंतर हळद लावली जाते कारण हळद मध्ये अँटीसेप्टिक गुण असतात. महाराष्ट्र मध्ये सध्याच्या काळामध्ये नाशिक, नगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हळद लागवडीसाठी सुरुवात झालेली आहे. हळदीची निर्यात सुद्धा केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हळद लागवड हे फायद्याचे आहे.

लागणारी जमीन :

  • हळद हे जमिनीच्या आत वाढणारे खोड आहे.
  • त्यामुळे जमीन ही उत्तम पाण्याचा निचरा होणारी असावी.
  • नदीकडेच्या जमिनी मधील मातीमध्ये हळदीचे पीक खूप चांगले येते.
  • क्षारयुक्त चिकट काळ्या मातीमध्ये हळदीची लागवड योग्य राहत नाही.
  • कंदाच्या वाढीसाठी भुसभुशीत असलेली जमीन लागवडीसाठी निवडावी.
  • कोकणामध्ये सुद्धा हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
  • कारण तेथील जांभ्या मातीमध्ये सुद्धा पाण्याची सोय असल्यास हळद लागवड चांगली होते.

लागणारे हवामान :

  • हळद या पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान चांगले ठरते.
  • हळद लागवडीसाठी 20 डीग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सियस पर्यंत तापमान असल्यास हळद लागवड यशस्वी होते.
  • हळदीच्या लागवडीसाठी सरासरी वार्षिक पाऊस 7 सेंटीमीटर ते 250 सेंटीमीटर पर्यंत चालतो.
  • जास्त दमट वातावरणामध्ये हळदीवर रोगांचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

सुधारित जाती :

1. सेलम :

हळदीच्या या जातीची लागवड सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये केली जाते.

या जातीच्या हळकुंडे आणि उप हळकुंडे ठसठशीत आणि जाड असतात. हळकुंडाची साल पातळ असून गर्द पिवळ्या रंगाचा गाभा असतो. या जातीमध्ये कुरकूमीन चे प्रमाण 4 ते 4.5 टक्के पर्यंत असते.

ओल्या हळदीचे हेक्टरी उत्पादन 300 ते 400 क्विंटल पर्यंत मिळते. हळद परिपक व्हायचा काळ 8 ते 9 महिन्यांपर्यंत असतो.

2. राजापुरी :

हळदीच्या या जातीची लागवड सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते.

या जातीला गुजरात, राजस्थान आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये खूप मागणी असते आणि दरही चांगला मिळतो.

जातीच्या हळकुंडांमध्ये कुरकुमीन यांचे प्रमाण 6.30 टक्क्यांपर्यंत मिळते. हळकुंडे आखूड, जाड आणि ठसठसित असतात. गराचा रंग पिवळा ते गडद पिवळा असतो.

3. फुले स्वरूपा :

हळदीची ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने विकसित केलेले आहे. मी सरासरी वजन 50 ते 55 ग्राम पर्यंत मिळते. हळकुंडे सरळ आणि लांब असतात.

हळकुंडाच्या गाभ्याचा रंग पिवळसर असतो आणि कुरकुमीन यांचे प्रमाण 5.19 टक्के इतके असते.

ओल्या हळदीचे सरासरी उत्पन्न 350 क्विंटल पर्यंत मिळते.

हळदीची ही जात पानावरील करपा आणि कंदमाशी या किडीसाठी प्रतिकारक आहे.

4. कृष्णा :

हळदीच्या या जातीचे हळकुंडे लांब आणि जाड असतात. हळकुंडाचा गाभा हा पिवळा पांढरट रंगाचा असतो.

हळदीच्या पेऱ्यांची संख्या 8 ते 9 असते. हळकुंडाच्या दोन पेरांमध्ये अंतर बाकी जातींच्या तुलनेमध्ये जास्त असते.

वाळलेल्या हळदीचे हेक्टरी उत्पन्न 75 ते 80 क्विंटल पर्यंत मिळते. या जातीच्या हळकुंडांमध्ये कुरकुमीन यांचे प्रमाण 2.80 टक्के पर्यंत असते.

5. आंबेहळद :

या जातीच्या हळदीचा सुवास हा कच्च्या आंब्याप्रमाणे येतो. या जातीची हळद काढणीसाठी 7 ते 7.5 महिन्यांमध्ये तयार होते.

या जातीचा वापर लोणचे तयार करण्यासाठी केला जातो.

आतील गराचा रंग फिकट पिवळा असतो आणि वरून दिसायला ही हळद बाकीच्या हळदी सारखी दिसते.

आंबे हळदीचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये औषधांमध्ये केला जातो.

6. टेकुरपेटा :

ह्या जातीच्या हळकुंड हे लांब, जाड आणि ठसठशीत असतात. हळकुंडाच्या गाभ्याचा रंग आणि पानांचा रंग हा फिकट पिवळसर असतो.

कच्च्या हळदीचे हेक्टरी उत्पादन 380 ते 400 क्विंटल पर्यंत मिळते आणि 65 ते 70 क्विंटल पर्यंत वाढलेल्या हळदीचे उत्पन्न मिळते.

या जातीच्या हळकुंडांमध्ये कुरकुमीन यांचे प्रमाण 1.80% पर्यंत असते.

7. वायगाव :

या जातीची हळकुंडे 7 ते 7.5 महिन्यांमध्ये काढण्यासाठी तयार होतात. कच्चा हळदीचे हेक्‍टरी उत्पादन 200 क्विंटल पर्यंत मिळते आणि 38 ते 25 क्विंटल उत्पादन सुकलेल्या हळकुंडाचे मिळते. या जातीच्या हळकुंडांमध्ये 6 ते 7 टक्के पर्यंत कुरकुमीन यांचे प्रमाण असते.

पिकाच्या पानाला तीव्र सुवास असतो आणि पानांचा रंग गर्द हिरवा आणि चकाकणारा असतो.

हंगाम :

  • हळदीची लागवड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्यामध्ये केली जाते.
  • हळदीची उशिरा लागवड ही जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये केली जाते.
  • हळद ठराविक काळात लावली नाही तर हळदीचे उत्पादनावर वाईट परिणाम दिसून येतात.

पूर्व मशागत :

  • हळद हे जमिनीच्या आत वाढणारे खोड आहे.
  • चांगली वाढ होण्यासाठी हळद लागवडीसाठी भुसभुशीत जमीन असावी.
  • त्यासाठी जमीन खोल नांगरून घ्यावी आणि कोळप्याच्या सहाय्याने दोन ते तीन वेळा उभी आडवी कोळपून घ्यावी.
  • त्यानंतर पंधरा ते वीस दिवस जमीन उन्हामध्ये तापून द्यावे आणि नंतर दुसरी नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यावे.
  • त्याच सोबत चांगले कुजलेले शेणखत किंवा घन जीवामृत मातीमध्ये मिसळून घ्यावे.

हळद लागवड पद्धती :

महाराष्ट्र मध्ये दोन प्रकारे हळद लागवड केली जाते.

1.रुंद वरंबा :

या पद्धतीमध्ये 1.5 मीटर अंतरावर सऱ्या पाडल्या जातात. दोन सरांमधल्या अंतर हे 90 सेंटीमीटर ठेवले असते.

एक मीटर चा गादीवाफा तयार केला जातो या गादीवाफ्यावर तीस सेंटीमीटर अंतरावर लागवड केली जाते.

रुंद वरंबा पद्धत ही सम पातळीचे जमिनीमध्ये केली जाते. त्यामुळे वाफ्यांना सोडलेले पाणी व्यवस्थित प्रत्येक रोपापर्यंत जाते आणि उत्पन्न चांगले मिळते.

2.सरी वरंबा पद्धत :

या पद्धतीमध्ये 75 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून सरीच्या दोन्ही बाजूस दोन गडद्या मध्ये तीस सेंटीमीटर अंतरावर लागवड केली जाते. या पद्धतीला सरी वरंबा पद्धत असे म्हणतात.

बेण्यांची निवड :

हळद लागवडीसाठी बियाण्यांची निवड हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हळद ही लागवडीसाठी अंगठ्यापेक्षा मोठे गड्डे वापरावेत. हळद लागवडीसाठी बेण्याचे वजन सरासरी 40 ग्रॅम असावे आणि त्याला डोळे फुटलेले असावे.

गड्डे नेहमी मुळ्या विरहित वापरावे. खराब झालेले कुजके आणि नासके गड्डे वापरु नयेत. एका हेक्टर साठी साधारणपणे 25 क्विंटल बियाण्यांची गरज असते.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

हळदीच्या पिकाला सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणात दिले पाहिजे. जमीन तयार करत असताना शेणखत आणि घनजीवामृत टाकावे आणि ठिबक 💧 सिंचन केल्या जीवामृत दर काही दिवसांनी सोडावे.

हळदीची लागवड केल्यानंतर दर 7 ते 8 दिवसानंतर हळदीला पाणी द्यावे. हळद हे बागायती पीक आहे. त्यामुळे वेळेवर पाणी न दिल्यास कंदांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि उत्पादनामध्ये घट येते.

हळदीचे पीक नऊ महिने झाल्यानंतर आणि हळदीची पाने खाली पडून सुकल्यानंतर पाणी देणे बंद करावे.

हळदीचे पीक निघून पर्यंत पाण्याच्या 18 ते 22 पाळ्या होतात. पीक काढणीच्या अगोदर एक महिना पाणी तोडावे. जेणेकरून हळदीचे कंद काढण्यासाठी मदत होईल.

अंतर पिके आणि अंतर मशागत :

हळदीच्या रोपाची वाढ 30 सेंटीमीटर ते 120 सेंटीमीटर पर्यंत असते. त्यामुळे रिकाम्या राहिलेल्या जागेमध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो.

कमी कालावधीत व कमी जागे मध्ये श्रावण घेवडा किंवा मुळा ही भाजी आपण आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. काही भागांमध्ये कांदा हे हळद लागवडी मध्ये आंतरपीक म्हणून घेतले जाते.

कांदा लागवड झाल्यानंतर शेत तन विरहित राहील याची पूर्णपणे काळजी घ्यावी आणि तन काढताना जमीन तुडवली जाणार नाही याची पूर्णपणे दक्षता घ्यावी.

नाहीतर कंद हे जमिनीच्या खाली वाढतात जमीन सक्त झाल्यावर कंदांची वाढ थांबते.

तन वाढल्यानंतर तीन ते चार खुरपण्या कराव्या, चार ते पाच पाने हळदीला आल्यानंतर रोपांना मातीची भर घालावी आणि उघडे पडलेले सर्व गड्डे झाकून घ्यावे.

महत्त्वाच्या किडी आणि रोग :

किडी :

कंदमाशी, पाने गुंडाळणारी अळी, खोडकिडा, हुमणी ह्या हळद लागवडी मधील मुख्य किडी आहेत.

रोग

कंदकुज, पानावरील ठिपके हे हळद लागवडीमध्ये मुख्य रोग आहेत.

काढणी आणि उत्पादन :

  • लागवड केल्यानंतर 8 ते 9 महिन्यानंतर हळद काढण्यासाठी तयार होते.
  • हळद काढणीसाठी तयार झाल्यानंतर हळदीची पाने पिवळी पडतात आणि सुकून जातात आणि जमिनीवर लोळतात.
  • काढणी करण्याच्या अगोदर पंधरा दिवस ते एक महिना जमिनीच्या मगदूराप्रमाणे पाणी तोडावे आणि योग्य ओलावा पाहून कुदळीच्या साह्याने हळदीचे गड्डे जमिनीच्या बाहेर काढावे.
  • काढण्याच्या वेळी गड्ड्यांना इजा होणार नाही याची दक्षता बाळगावी.
  • हळकुंडे वेगवेगळी वेचून काढावीत.
  • पुढच्या हंगामामध्ये बियाण्यासाठी गड्डे योग्य ठिकाणी साठवावे.
  • कुजलेले, खराब झालेले गड्डे वेगळे करावे आणि नष्ट करून टाकावे.
  • एका हेक्टर पासून सरासरी 300 ते 400 क्विंटल ओली हळद आणि 25 ते 30 क्विंटल गोल गड्डे मिळतात.
  • हळदीच्या जातीनुसार उत्पादनामध्ये बदल बघायला भेटतो.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/vegetables

5/5 - (3 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *