Blog

भुईमूग लागवड :

5/5 - (1 vote)

भुईमूग हे पीक आर्थिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे पीक आहे. भुईमूग हे तेल वर्गीय पिकांमधून महत्त्वाचे पीक मानले जाते. भुईमुगाच्या बियाण्यामध्ये तेलाचे सरासरी 45 ते 55 टक्के प्रमाण असते आणि भुईमुगाच्या शेंगांमध्ये प्रथिनांचे प्रमाण 26 टक्के पर्यंत असते. भुईमुगाच्या तेलाचा वापर हा खाद्यतेल म्हणून स्वयंपाकात आणि वनस्पती तूप तयार करण्यासाठी केला जातो. भुईमुगाच्या तेलापासून साबण सौंदर्य प्रसाधने आयुर्वेदिक औषधे सुद्धा तयार केले जातात. भुईमुगाच्या शेंगांमध्ये अ, ब आणि ब -2 आणि ही जीवनसत्वे असतात, त्याचबरोबर स्फुरद ,चुनाव ,लोह ही खनिजे भरपूर प्रमाणामध्ये आढळतात.

भुईमुगाच्या शेंगा या मीठ लावून किंवा भाजून खातात. तेल काढून झाल्यानंतर राहिलेल्या चोता आपण पेंड म्हणून वापरू शकतो. पेंडीचा उपयोग सेंद्रिय खत म्हणून केला जाऊ शकतो .पेंडीमध्ये 7.8 टक्के नत्र 1.5 टक्के स्फुरद आणि 1.2 टक्के पालाश असलेले बघायला मिळते .शेंगांची टरफला चा उपयोग इंधन आणि हलक्या प्रतीचे पुठ्ठे तयार करण्यासाठी केला जातो .भुईमुगाच्या पिकाच्या मुळावर गाठी असतात ,त्या गाठी रायझोबियम जिवाणू हवेतील नत्र स्थिर करतात .त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी देखील भुईमुगाची बरीच मदत होते. भुईमुगाच्या वेली आपण जनावरांच्या खाद्य म्हणून देखील वापरू शकतो.

लागणारे हवामान :

भुईमूग हे उष्ण व समशवीतोष्ण कटिबंधातील पीक मानले जाते .भुईमुगाच्या पिकाच्या लागवडीसाठी जास्त प सूर्यप्रकाश तसेच पीक वाढीच्या कालावधीमध्ये उष्ण हवामान असल्यास भुईमुगाचे पीक उत्तम येते. चांगल्या वाढीसाठी सरासरी 24 ते 33 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असल्यास पिकाची वाढ उत्तम होते. भुईमुगाच्या पिकाला वाढी करता 500 मी मी ते बाराशे 1250 मिमी पर्यंतच्या पावसाची गरज असते .फुलोरा ते शेंगा धरणाच्या अवस्थेमध्ये पावसाची आवश्यकता असते.

लागणारी जमीन :

भुईमुगाच्या पिकाची लागवड उत्तम निचरा होणाऱ्या ,वाळू मिश्रित ,हलक्या ते मध्यम आणि सेंद्रिय पदार्थ जास्त असलेला जमिनीमध्ये चांगली होते. भुईमुगाच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू 6 ते 7.5 च्या दरम्यान असल्यास लागवड उत्तम होते. ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होतो अशा जमिनीमध्ये भुईमुक्ती लागवड करावी . काळ्या व चिकट पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये भुईमूगची लागवड केल्यास उत्पन्न कमी येते.

सुधारीत जाती :

टीएमव्ही -३

कराड ४ -११

टीएमव्ही -१

एके-१२-२४

टीएमव्ही -४

कोपरगाव नं -१

टीएमव्ही – १०

पूर्व मशागत :

मागील पिकाची काढणी झाल्यानंतर ताबडतोब जमिनीमध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल नांगरणी करावी आणि कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून ढेकळे फोडून घ्यावे.

भुईमुगाच्या पिकाकरता जमीन खोल भुसभुशीत आणि मऊ असल्यानंतर शेंगा जमिनीमध्ये परिपक्व होतात.

कुळवाच्या शेवटच्या पाळी पूर्वी जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत टाकून जमीन एकसार करून घ्यावे.

लागवड :

भुईमुगाची लागवड ही दोन हंगामांमध्ये केली जाते.

1.खरीप हंगाम : खरीप हंगाम म्हणजे जूनच्या शेवटचा आठवडा ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस झाल्यानंतर पेरणी केली जाते.

2.उन्हाळी हंगाम : उन्हाळी भुईमुगाची लागवड ही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते.

खरीप हंगामामध्ये लागवडी साठी भुईमुगाची बियाणे सपाट वाफेवर टोकून पेरले जातात. उपट्या प्रकारातील जातींमध्ये टोकन पद्धतीने लागवड केल्यास दोन ओळींमधील अंतर 25 सेंटीमीटर आणि दोन वनस्पतींमध्ये अंतर 15 सेंटीमीटर ठेवावे. पसऱ्या जातींसाठी अंतर 60 × 60 सेमी ठेवावे. पेरणीची खोली ही पाच ते सहा सेंटीमीटर पर्यंत असावी. त्यापेक्षा अधिक खोल पेरू नये. सर्वसाधारणपणे उपट्या प्रकारातील शेंगांना तरी 80 ते 100 किलोग्राम प्रति हेकटरी, निमपसऱ्या जातील करिता 60 ते 80 किलोग्राम आणि पसरल्या जातींसाठी हेक्‍टरी 40 ते 60 किलोग्राम बियाणे पुरेसे ठरते .बियांची उगवण क्षमता चांगली असावी. पेरणीपूर्वी शेंगा फोडून बी पेरणी करिता वापरावे .शेंगा फोडताना इजा झालेले बी पेरणी करता घेऊ नये. भुईमुगाचे बी शुद्ध आणि रोगमुक्त असावेत.

खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन :

जमिनीची मशागत करत असताना कुजलेले शेणखत जमिनीमध्ये टाकावे आणि जमिनीमध्ये गांडूळ खत किंवा घन जीवामृत टाकून घ्यावे.

पाठ पाण्याने पाणी सोडत असताना जीवामृत देखील भुईमुगाला सोडावे.

त्यामुळे जमीन भुसभुशीत राहते आणि जमिनीमध्ये जिवाणूंची संख्या वाढते. त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते.

खरीप हंगामामध्ये पिकाच्या नाजूक अवस्थेमध्ये पावसाचा खंड पडल्यानंतर पाणी देण्याची गरज असते, त्याकरिता पिकाला पाण्याची पहिली पाळी फुलोरा अवस्थांमध्ये आणि दुसरी पाळी शेंगा भरायच्या अवस्थेमध्ये देणे गरजेचे आहे.

उन्हाळी हंगामामध्ये सर्वसाधारणपणे आठ ते दहा पाळा द्याव्यात .जमिनीच्या प्रकारावर पिकाला पाणी देणे अवलंबून असते.

योग्य अवस्थेमध्ये जसे की फुलोरा, शेंगा निर्मिती व पक्वता अवस्था या अवस्थांमध्ये पाणी देणे गरजेचे असते .त्यावेळी जमिनीमध्ये ओलावा असल्यानंतर पीक चांगले येते.

आंतर मशागत :

भुईमूग हे सहा ते सात आठवड्याचे होईपर्यंत शेतामध्ये तण येऊन देऊ नये.

पेरणीच्या 35 दिवसांपर्यंत तण भरपूर वाढतात .त्यामुळे खुरपणी करणे महत्त्वाचे असते.

पेरणीनंतर पंधरा दिवसांनी खुरपणी करावे आणि दोन ते तीन वेळा कोळपणी करून घ्यावे .

परत पिकाच्या अंतर मशागत मध्ये फुले लागण्याच्या सुरुवातीला मातीची भर द्यावी.

ज्यावेळी पिकाला आरा लागण्याची सुरुवात होते.त्यावेळी 200 लिटरचा ड्रम भुईमुगाच्या पिकावरून तीन ते चार दिवसाच्या अंतराने दोन ते तीन वेळा फिरवावा.

ही मशागत करताना जमिनीमध्ये साधारणपणे ओलावा असावे .त्यामुळे भुईमुगाच्या पिकाचे पंधरा टक्के पर्यंत उत्पादनामध्ये वाढ झालेली बघायला मिळते.

महत्वाच्या किडी व रोग :

1.मावा :

मावा ही कीड भुईमुगाचे कोवळे शेंडे, पाने, फुलाच्या कळ्या आणि आरे मधील रस शोषण करतात आणि त्यांच्या शरीरामधून येणार साखरेसारखा चिकट पदार्थ त्यावर बुरशीची वाढ झाल्यामुळे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते .या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा.

2.तुडतुडे :

तुडतुडे हे कीड पानांमध्ये रस शोषते. त्यामुळे पानांच्या कडा या पिवळा पडतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे पाने गळून पडतात .पानांच्या शेंड्यावर इंग्रजी Vआकाराचे पिवळे चट्टे पडलेले दिसून येतात. प्रादुर्भाव जास्त वाढल्यानंतर झाडाचे वाढ पूर्णपणे थांबते .या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा.

3.पाने पोखरणारे अळी :

या अळीचा रंग करडा असतो .ही अळी प्रथम भुईमुगाची पाने पोखरते आणि पानाच्या दोन कडा एकत्र करून पाण्याची गुंडाळी करून पाने खाते .त्यामध्ये कोष अवस्था पूर्ण करते. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

4.हुमनी :

या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान जास्त दिसून येतो .या किडीच्या प्रौढ अळ्या जमिनीमध्ये राहून भुईमुगाच्या झाडाच्या मुळा खातात. त्यामुळे पीक वाळते आणि उत्पादनामध्ये घट होते. या किडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि बीज प्रक्रिया देखील करावी.

रोग :

1. टिक्का :

हा रोग या पिकावर येणारा बुरशीजन्य रोग आहे .या रोगाचा प्रादुर्भाव पिकातला खालच्या पानावर दिसून येतो.

सर्वप्रथम पानाच्या खालच्या बाजूवर ठिपके असतात. हे ठिपके रंगाने पिवळसर असतात ,वेळेनुसार हे ठिपके करड्या किंवा काळपट रंगाचे होतात.

लवकर येणारे ठिपके आकाराने थोडे लहान ,गोलाकार ,गर्द तपकिरी ते काळसर रंगाचे असतात.

या ठिपक्याभोवती पिवळे वलय दिसतात .उशिरा येणारे ठिपके हे मोठे गोलाकार आणि अनियमित आकाराचे, लालसर तपकिरी, ते काळपट रंगाचे असून ठिपक्याभोवती सुरुवातीपासून पिवळी वलय असतात. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया करावे.

शेतातील रोगग्रस्त झाडांच्या अवशेष जमा करावे आणि जाळून टाकावे. रोगप्रतिकारक जातींचा वापर करावा आणि जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.

2. मूळकूज :

हा रोग जमिनीमधून उद्भवणाऱ्या बुरशीमुळे होतो .मूळ कुज या रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या मुळावर आणि खोडावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो .रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडे मलुल बनतात आणि शेवटी कोलमडून पडतात.

रोग झालेल्या झाडांच्या जमिनी लगतचा भाग मुळे व खोड सडल्यामुळे काळा रंगाचे दिसतात. अशी रोगग्रस्त झाडे जमिनीतून सहजपणे उपटली जातात.

रोगट भागां भोवती पांढऱ्या बुरशीची वाढ झालेली दिसून येते आणि मोहरीच्या आकाराची काळी बुरशी देखील दिसून येतात.

या रोगावर नियंत्रण करण्यासाठी लागवडीपूर्वी शेताची खोल नांगरणी करावी आणि जमीन चांगली उन्हामध्ये तापून द्यावी.

मागील पिकाचे सर्व अवशेष वेचून नष्ट करून टाकावे .रोगग्रस्त झाडे उपटून जाळून टाकावे आणि बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.

काढणी आणि मळणी :

भुईमुगाची काढणी करण्यासाठी खालील पक्वतेची लक्षणे दिसल्यावर काढणी करावी.

1. पिकाची पाने पिवळसर होतात .

2. जुनी पाने गळून पडलेली दिसतात.

3. शेंगा टनक होतात परिपक्व शेंगा हाताच्या बोटाने दाबल्यास लवकर फुटत नाहीत.

4. शेंगा वरील शिर स्पष्ट दिसू लागतात .तसेच शेंगाच्या टरफलाच्या आतील बाजू काळसर दिसते.

5. शेंगांमधील दाणे पूर्णपणे भरतात.

सर्वसाधारणपणे पसरट प्रकारातील वाणांची काढणी 150 दिवसांमध्ये केली जाते. उपट्या प्रकाराच्या वाणाची काढणी 100 ते 120 दिवसांमध्ये केली जाते. पिकाची काढणी करण्याअगोदर आठ ते दहा दिवस अगोदर पिकाला पाणी देणे बंद करावे. उपट्या प्रकाराच्या वाहनाची काढणी ही हाताने केली जाते आणि पसरा प्रकारातील भुईमुगाची काढणी नांगराने किंवा खोदून केली जाते .पिकाची काढणी केल्यानंतर गट्टे बांधून उन्हात वाळवावे . त्यानंतर लाकडी फळे वर झोपाडून शेंगा वेगळ्या कराव्या.काढणीच्या वेळी शेंगांमध्ये साधारणपणे 40% ओलावा असतो. शेंगा साठवणीच्या पूर्वी चांगल्या वाळवणे गरजेचे असते. ओलाव्याचे प्रमाण दहा टक्के पर्यंत ठेवावे. शेंगा पूर्णपणे वाळल्याची खात्री करण्याकरिता शेंगा हाताने वाजवून पाहिली तर त्यातून विशिष्ट आवाज येतो .दाणे अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये ठेवून दाबल्यास तो सहज दोन दले वेगळी होतात. दाण्यावर साल सहज निघते .अशी लक्षणे दिसल्यानंतर शेंगा चांगल्या वाळलेल्या आहेत असे समजावे.

साठवणूक :

भुईमूग शक्यतो शेंगांच्या स्वरूपात साठवली जातात. बियांची अंकुरण क्षमता ही वेगाने कमी होत जाते. शेंगा तरटाच्या पोत्यात किंवा मातीच्या भांड्यात साठवल्या जातात. साठवणुकी पूर्वी शेंगा दहा टक्के ओलाव्यापर्यंत वाळवाव्यात .साठवणुकीमध्ये शेंगांची वरचेवर तपासणी करून किडी व रोगांपासून बचाव करावा.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/vegetables

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *