मोसंबी लागवड :
दक्षिण चीन हे मोसंबी या पिकाचे मूळ स्थान मानले जाते. मोसंबी देखील संत्रा प्रमाणे लिंबूवर्गीय पीक आहे. या फळापासून प्रक्रिया करून वेग वेगळे पदार्थ बनवले जातात. या पिकाखाली नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, परभणी ,जालना, औरंगाबाद, यवतमाळ, अहमदनगर, नाशिक, पुणे, जळगाव, धुळे, हे शहर येतात. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोसंबीची लागवड केली जाते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोसंबीची लागवड घेतली जाते. मोसंबी मध्ये विटामिन ए आणि विटामिन सी चे प्रमाण चांगल्या प्रमाणे मध्ये असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मोसंबी मध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्यामुळे पचन संबंधित समस्या लांब होण्यासाठी मदत होते आणि पोटाचे आरोग्य देखील चांगले राहते. मोसंबी मध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वजन नियंत्रण करायचे असेल तर मोसंबी आपल्या आहारामध्ये घ्यावे. मोसंबी मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याचा वापर आहारामध्ये केल्यामुळे पोट जास्त काळापर्यंत भरल्यासारखे वाटते.
त्यामुळे सारख्या सारख्या खाण्याची सवय कमी होते आणि त्यामुळे आपोआप वजन कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. मोसंबी खाल्याने मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहते. मोसंबी मध्ये क्लीनिंग आणि ब्लिचिंग गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यासाठी खूप मदत होते. मोसंबी खाल्ल्यामुळे केस देखील मजबूत होतात आणि केसांमध्ये चांगली चमक येते. मोसंबी हे आम्लयुक्त आहे. त्यामुळे शरीरामध्ये असणारे विषारी पदार्थ मोसंबी खाल्ल्यामुळे बाहेर टाकण्यास मदत होते. मोसंबी मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोसंबी खाल्ल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. मोसंबी मध्ये असलेली खनिजे आणि जीवनसत्वे इलेक्ट्रॉनिक्स म्हणून शरीरामध्ये काम करतात. त्यामुळे निर्जलीकरण होण्यापासून वाचते. मोसंबी खाल्ल्यामुळे रक्तदाबाच्या समस्या लांब होतात. लहान मुलांना दात येण्याच्या काळामध्ये मोसंबी घालण्यासाठी दिल्याने त्या गोष्टीचा अतिशय फायदा होतो. विटामिन सी चे प्रमाण जास्त असल्यामुळे हिरड्यांमधून येणारे रक्त लगेच थांबते आणि दात हिरड्यांमध्ये बसण्यासाठी मोसंबी खाणे फायदेशीर होते. हाडांच्या मजबूती साठी देखील मोसंबी खाणे उपयुक्त ठरते.
लागणारी जमीन :
मोसंबी लागवड करण्यासाठी मध्यम हलक्या प्रकारची जमीन चांगली ठरते.
अशा जमिनीमध्ये मोसंबीचे उत्पन्न चांगले मिळते. ज्या जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असते.
अशा जमिनी मोसंबी लागवडीसाठी योग्य ठरतात. ज्या जमिनीमध्ये चुन्याचे प्रमाण पाच पेक्षा जास्त असते, त्या जमिनीमध्ये मोसंबीची लागवड करू नये.
मोसंबीची लागवड करण्यासाठी सेंद्रिय पदार्थ जास्त असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम काळी जमीन आपण लागवडीसाठी निवडू शकतो.
लागणारे हवामान :
मोसंबीची वाढ सम शितोष्न वातावरणामध्ये आणि ज्या भागांमध्ये कमी पाऊस पडतो आणि वातावरण कोरडे असते अशा ठिकाणी खूप चांगली होते.
मोसंबी लागवडीसाठी 12 ते 35 अंश सेल्सिअस हे तापमान उत्तम मानले जाते.
ज्या भागांमध्ये असे वातावरण असते. अशा भागांमध्ये मोसंबीची फळे चांगली पोसली जातात आणि उत्पन्न देखील चांगले मिळते.
मोसंबीच्या झाडांना जास्त प्रमाणामध्ये पाऊस लागत नाही. कमी पावसामुळे देखील मोसंबीचे झाड चांगले उत्पन्न देते.
सुधारित जाती :
महाराष्ट्र मधील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2008 यावर्षी मोसंबीची एक जात विकसित केलेली आहे.
त्या जातीचे नाव फुले मोसंबी असे आहे. या जातीची वैशिष्ट्ये म्हणजे ही जात निवड पद्धतीने विकसित केलेली आहे.
या जातीचे झाडं रंगपुर लाईम या खुंटावर कलम केल्यानंतर उत्पादनक्षम आणि भरपूर दिवस त्यांचे आयुष्य राहते.
जातीची झाडे अधिक उत्पादन क्षम असतात आणि कीड आणि रोगासाठी सहनशील असतात .या जातीच्या फळांचा आकार मोठा असतो.
सरासरी एका फळाचे वजन 240 ग्रॅम पर्यंत असते. त्या फळांमध्ये रसाचे प्रमाण 47% पर्यंत असून झाडांमध्ये 0.40 टक्के पर्यंत अंमलता असते.
एका झाडापासून 72 किलो आणि बाग लावल्यानंतर हेक्टरी वीस टन पर्यंत उत्पन्न मिळते.
अभिवृद्धी आणि लागवड पद्धती :
मोसंबीची कलमे तयार केली जातात, त्यासाठी जम्बेरी किंवा रंगपुर लाईम खुंटावर मोसंबीचे डोळे भरले जातात.
कलमे तयार करत असताना डोळे हे निरोगी आणि चांगले उत्पन्न देणाऱ्या झाडांपासून निवडावे.
ज्या रोपांचे वय 18 ते 21 महिन्यापर्यंत असते अशा रोपांची लागवड करावी.
मोसंबीची लागवड शक्यतो चौरस पद्धतीने केली जाते. उन्हाळ्यामध्ये शेत पूर्णपणे नांगरून घ्यावे.
ढेकळे फोडावी आणि कोळप्याच्या सहाय्याने जमीन एकसारखी करून घ्यावी.
नांगराच्या साह्याने उभे आडवे नांगरावे आणि वखराच्या पाळातून शेत समपातळीत आणल्यानंतर शेतामध्ये पाणी साचू नये या दृष्टीने शेतामध्ये चर खानावेत आणि त्यानंतर चौरस पद्धतीने आखणी करावी.
संत्र्याची लागवड चौरस पद्धतीमध्ये 6×6या अंतरावर केली जाते.
आखणी केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये 1×1×1 मीटर च्या आकाराचे खड्डे खोदावेत आणि चांगली पोयटा माती दोन ते तीन घमेली शेत आणि गांडूळ खत मिक्स करून खड्डा भरावा आणि चांगला पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यामध्ये मोसंबीच्या रोपांची लागवड करून घ्यावी.
भारी जमिनीसाठी रंगपुर लाईम या खुंटावर बांधलेली कलमे चांगले उत्पन्न देतात आणि मध्यम जमिनींमध्ये जंबेरीच्या खुंटावर बांधलेली कलमे चांगली उत्पन्न देतात.
वळण आणि छाटणीच्या पद्धती :
लागवड केल्यानंतर मोसंबीच्या झाडाला एक मीटर पर्यंत सरळ वाढवून द्यावे.
त्यानंतर चार ते पाच जोमदार फांद्या सर्व दिशांना विभागून पसरतील अशा तऱ्हेने वाढून द्याव्यात.
म्हणजे झाडाला डेरेदार आकार येतो .त्यामुळे बागेमध्ये अंतर मशागत करणे सोपे जाते आणि फळ काढणी करताना सुद्धा सोयीस्कर ठरते.
झाडाच्या खुंटावर येणाऱ्या सर्व फुटी सुरुवातीच्या वेळी काढून टाका,व्या.
त्यानंतर झाड पूर्णपणे वाढून झाले की, फळांची काढणी केल्यानंतर रोगट फांद्या, कुजलेल्या फांद्या नको असलेल्या फांद्या या वेळोवेळी काढून टाकून द्यावे.
छाटणी केल्यामुळे उत्पन्न मध्ये भर होण्यास मदत होते.
खत आणि पाणी व्यवस्थापन :
नांगरट करताना जमिनीमध्ये शेणखत टाकले जाते. त्यावेळेस जमिनीमध्ये गांडूळ खत किंवा घन जीवामृत टाकू शकतो.
ठिबक सिंचनाचा वापर केल्यास मोसंबीच्या झाडाला आठवड्यातून एकदा जीवामृत सोडावे.
त्यामुळे जमिनीमधील सूक्ष्मजीवांची संख्या चांगली वाढते आणि उत्पन्न चांगले येते.
मोसंबीच्या झाडाला फळे वाढीच्या वेळी पाणी देणे खूप गरजेचे असते.
त्यावेळी फळाला पाण्याचा ताण पडून नये याची योग्य काळजी घ्यावी.
उन्हाळ्यामध्ये तीन ते चार दिवसानंतर आणि हिवाळ्यामध्ये आठ ते नऊ दिवसांच्या कालांतराने मोसंबीच्या झाडाला पाणी द्यावे.
मोसंबीच्या बागेमध्ये पाणी मुळांपाशी साठणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.
नाहीतर मूळ कुज या रोगाचे प्रादुर्भाव होऊ शकतो.
बहार धरणे :
ज्या पद्धतीने किंवा ज्यावेळी झाडाला फुले येतात त्या कालावधीनुसार बहाराला नावे दिली जातात.
जून -जुलै महिन्यामध्ये येणाऱ्या बहाराला मृग बहार असे म्हटले जाते.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या येणाऱ्या बहाराला आंबिया बहार म्हणून ओळखले जाते.
आंबियाबहारासाठी डिसेंबर महिन्यामध्ये झाडांना पाणी बंद करावे लागते.
नंतर वीस जानेवारीच्या सुमारास जमीन उकरून पाणी आणि खते देण्यासाठी आळे तयार केले जातात.
मृगबहारासाठी मे महिन्यामध्ये पाणी बंद करून झाडांना विश्रांती दिली जाते आणि जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतरच झाडाला मुबलक प्रमाणामध्ये खते दिली जातात.
अंतर पिके आणि अंतर मशागत :
लागवड केल्यानंतर सुरुवातीचे चार ते पाच वर्ष मोसंबीच्या झाडाला फळ लागत नाही.
त्या काळामध्ये फक्त मोसंबीच्या फांद्यांची वाढ होते. अशा कालावधीमध्ये झाडांमधल्या जागेमध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो.
आंतरपीके घेतल्यामुळे बागेची चांगली मशागत होते शिवाय बागेमध्ये तणांचा प्रादुर्भाव देखील कमी होतो.
अंतर पिके घेतल्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फायदा होतो आंतरपीक यांची निवड करताना आंतरपिके लवकर येणारी असावीत, उथळमुळे असणारी व भाजीपाल्यासारखी कमी उंचीची पिके घेणे शेतकऱ्याला नफ्याचे ठरते.
जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी चवळी, भुईमूग, मूग, उडीद चणा, वाटाणा इत्यादी शेंगा वर्गीय पिके घेणे फायदेशीर ठरते.
आपण आंतरपीक म्हणून मिरची, टोमॅटो, कोबी, बटाटे, पपई ही पिके देखील घेऊ शकतो.
आपण आंतरपीक म्हणून हिरवळीचे खते देखील घेऊ शकतो. त्यामुळे जमिनीमध्ये सुपीकता वाढते आणि झाडांना पोषक द्रव्य देखील भेटतात आणि तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
मोसंबीला नियमित पाणीपुरवठा करावा लागतो त्यामुळे बागेमध्ये तणांचा प्रादुर्भाव आढळतो.
तणांचे प्रमाण जास्त दिसल्यावर लगेच खुरप्याच्या सहाय्याने अळ्यामधील सर्व तण काढून घ्यावे आणि जमीन भुजबुशीत ठेवावे.
त्यासाठी बागेमध्ये पाच ते सहा वेळा वखरणी आपण करू शकतो.
फळे तोडल्यानंतर वर्षातून एकदा तरी दहा ते पंधरा सेंटीमीटर खोल नांगरणी करावी.
महत्त्वाचा किडी आणि रोग :
महत्वाच्या किडी :
मोसंबी या झाडावर पाने कुरतडणाऱ्या अळ्या ,पिठ्या ढेकूण ,पाने पोखरणारे आळी ,मावा ,खवले कीड, झाडांची साल पोखरणारे ,अशा किडींचा प्रादुर्भाव दिसून येतात.या किडींवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.
महत्वाचे रोग :
मोसंबी या झाडावर खैऱ्या ,मर ,डिंक या मूळकुजव्या या रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. या रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.
काढणी आणि उत्पादन :
मोसंबीची फळे गडद हिरव्या रंगापासून फिकट हिरव्या रंगाचे झाल्यावर फळ काढण्यासाठी तयार झालेले आहेत असे समजावे.
फळे काढताना डेटा सोबत काढावे आणि फळे काढल्यानंतर त्यांची प्रतवारी करून ती विकण्यासाठी बाजारामध्ये पाठवावे.
फळे काढताना फळांच्या सालीला कोणत्या इजा होणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.
इजा झाल्यास फळांची बाजारांमध्ये मागणी कमी होते. वेगवेगळ्या जातीनुसार आणि हवामानानुसार मोसंबीच्या एका झाडापासून वेगवेगळे उत्पन्न भेटते.
सरासरी चांगल्या झाडापासून 800 ते 1000 पर्यंत फळे मिळू शकतात.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi