कलिंगड लागवड
महाराष्ट्र मध्ये कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. बागायती पीक म्हणून कलिंगड बरेच शेतकरी आपल्या शेतामध्ये लावतात. जवळपास नऊ महिने बाजारामध्ये कलिंगडाची उपलब्धता असते. कलिंगडाचा रंग आतून जेवढा लाल असेल तेवढी कलिंगडाला मागणी असते. कलिंगडाच्या कच्च्या फळांचा उपयोग भाजी आणि लोणचे तयार करण्यासाठी केला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कलिंगडाचे सरबत करून विकले जाते. कलिंगडाच्या बियांमध्ये तेल काढून ते दिव्यासाठी वापरले जाते. कलिंगडाच्या पेंडीचा वापर जनावरांच्या खाद्यासाठी केला जातो.
कलिंगड हे सर्वांना आवडणारे व परवडणारे फळ आहे. कलिंगडाच्या काही जातींमध्ये पेक्टीन चे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचा वापर जॅम, जेली तयार करण्यासाठी केला जातो. कलिंगड मध्ये अ, ब आणि क जीवनसत्वे जास्त प्रमाणामध्ये असतात. तसेच फॉस्फरस चुना अशी खनिजे सुद्धा असतात. कलिंगड च्या सालीपासून टूटीफ्रूटी बनवली जाते. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपण ते उन्हाळ्यामध्ये खाल्ल्याने आपले शरीर हायड्रेटेड राहते. कलिंगडामध्ये टोमॅटो सारखेच लायकोपिनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे कर्करोगापासून कलिंगड शरीराला लांब ठेवते. कलिंगड ची साल चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरचा तजेलपणा वाढतो आणि उन्हाने आलेला काळपटपणा सुद्धा निघून जातो.
लागणारी जमीन :
कलिंगडाची लागवड ही उत्तम निचरा होणाऱ्या आणि सुपीक जमिनीमध्ये चांगली होते. कलिंगडा साठी रेताळ जमीन असल्यास कलिंगडाचे उत्पन्न भरगोस मिळते.
कलिंगडाला निवडलेली जमीन ही सेंद्रिय पदार्थांनी भरपूर असावे आणि जमिनीचा सामू 5.5 ते 7 च्या दरम्यान असावा.
कलिंगडाची लागवड ही नदीच्या पात्रात किंवा शेतजमिनी मध्ये लावता येते. कलिंगडा साठी कमी क्षाराची जमीन निवडल्यास उत्पन्नात भर होते आणि फळावर डाग पडत नाही.
लागणारे हवामान :
कलिंगड हे उष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये चांगले येते. कलिंगडाची वेल वाढण्यासाठी कलिंगडाला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते.
कलिंगडाच्या उत्तम वाढीसाठी 24 अंश ते 27 अंश सेल्सिअस हे तापमान योग्य राहते. जास्त कडाक्याची थंडी किंवा तापमानात अति वाढ या गोष्टीचा अनिष्ट परिणाम कलिंगडाच्या वाढीवर होतो.
कमी तापमान असल्यानंतर कलिंगडाच्या बियांची उगवण क्षमता कमी राहते आणि वातावरणामध्ये दमट प्रमाण असल्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होतो.
सुधारीत जाती :
1. दुर्गापुर मीठा :
कलिंगडाची ही जात दुर्गापूर कृषी संशोधन केंद्र येथे विकसित केले आहे. या जातीच्या फळांची साल जाड असते.
फळांची साल जाड असल्यामुळे फळे जास्त काळ टिकतात. फळाच्या सालीचा रंग हलका हिरवा असतो, फळाचे सरासरी वजन 5 ते 7 किलो असते.
2. अर्का माणिक :
कलिंगडाची ही जात भारतीय फलोद्यान संशोधन संस्था बेंगलोर येथे विकसित केलेले आहे.
या जातीच्या फळांचा रंग गुलाबी असून गोड असतो आणि फळाच्या बाहेर फिकट हिरवा रंग असून त्यावर हिरव्या रंगाचे पट्टे असतात.
कलिंगडाच्या जातीपासून 300 ते 350 क्विंटल पर्यंत उत्पादन हेक्टरी मिळते.
फळांचा आकार लांबट असतो आणि फळांचे सरासरी वजन सहा ते आठ किलो पर्यंत असते.
कलिंगडाची ही जात केवडा आणि भुरी या रोगांना प्रतिकारक आहे.
3. शुगर बेबी :
कलिंगडाची ही जात महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय जात मानले जाते. या जातीच्या फळाचे वजन तीन ते पाच किलो पर्यंत असते आणि फळाचा रंग हा गडद हिरवा आणि फळाचा गर खुसखुशीत असतो.
फळाच्या गराचा रंग हा भडक लाल असून फळाला उत्तम गोडी आणि चव असते. महाराष्ट्रामध्ये या जातीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.
4. असाही यामाटो :
कलिंगडाच्या या जातीपासून सरासरी 250 ते 300 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते. या जातीच्या फळांचा रंग हा फिक्कट हिरवा आणि फळाचा गर गुलाबी रंगाचा असलेला दिसतो.
कलिंगडाच्या या जातीच्या फळांचे वजन सात ते आठ किलोपर्यंत भरते.
5. अर्का ज्योती :
कलिंगडाच्या या जातीचे उत्पन्न 500 ते 600 क्विंटल पर्यंत मिळते. या जातीच्या फळांना गोल आकार असतो आणि सरासरी वजन सहा ते आठ किलो पर्यंत मिळते.
या जातीचे फळ काढणी नंतर खूप काळ टिकून राहतात. फळांना फिकट हिरवा रंग असतो आणि गराचा रंग लाल असतो फळावर गर्द हिरव्या रंगाचे पट्टे असतात.
6. अर्का श्याम वाण :
कलिंगडाच्या ह्या जातीचे उत्पादन लागवड केल्यानंतर 60 ते 70 दिवसांमध्ये सुरू होते.
या जातीच्या फळांचा आकार लंबगोलाकार असतो आणि रंग हिरवा काळा गडद असतो.
फळाचे वजन तीन ते चार किलो पर्यंत भरते आणि फळ हे गोड कुरकुरीत लाल रंगाचे असते फळांमध्ये 12% साखर असते.
7. सिंजेंटा सिंबा :
या जातीचे कलिंगड दूर अंतरावर असलेल्या बाजारपेठेमध्ये पाठवण्यासाठी अतिशय चांगले ठरतात. कारण या जातीची टिकवण क्षमता जास्त आहे.
या जातीच्या फळाचा रंग काळपट हिरवा असतो आणि आकार उभट गोल असतो. फळाचे सरासरी वजन 3.5 ते 4 किलो पर्यंत मिळते आणि ही जात लवकर तयार होते.
लागवड :
निवडलेली जमीन खोल नांगरून घ्यावी आणि कोळप्याच्या सहाय्याने आडवी आणि उभी कोळपणी करून घ्यावे. जमिनीमध्ये शेणखत, घनजीवांवर टाकून घ्यावे. लागवडीसाठी सऱ्या पाडून घ्याव्या आणि ठराविक अंतरावर खड्डे काढावेत.
प्रत्येक खड्ड्यांमध्ये दोन ते तीन बिया लावाव्यात. 2.5 ते 3 किलो बियाणे हेक्टरी पुरतात.
कलिंगडाची लागवड शक्यतो जानेवारी ते मार्च महिन्यांमध्ये केली जाते.
या महिन्यांमध्ये लागवड केल्याने उन्हाळ्यामध्ये आपले पीक विकण्यासाठी तयार होते त्यामुळे चांगला बाजारभाव मिळतो.
खत आणि पाणी व्यवस्थापन :
लागवड करण्याच्या अगोदर जमीन तयार करत असताना शेणखत कोळप्याच्या सहाय्याने मिसळून घ्यावे आणि नीम पेंड किंवा भुईमुगाच्या पेंडीचा वापर करावा.
ठिबक सिंचनाचा वापर केल्यास कलिंगडाच्या वेलाला जीवामृत सोडावे. कलिंगडाच्या लागवडीसाठी नियमित पाणीपुरवठा खूप महत्त्वाचा असतो.
कलिंगडाला पाच ते सहा दिवसानंतर पाणी द्यावे. कलिंगडामध्ये पाण्याच्या अनियमितपुरवठ्यामुळे फळे तडकण्याची भीती राहते.
त्यामुळे पूर्ण लागवडीच्या काळामध्ये पाण्याची टंचाई भासणार नाही याची काळजी घ्यावी.
आंतरमशागत :
लागवड झाल्यानंतर काही दिवसांमध्ये वेली वाढू लागतात. वेली वाढल्यानंतर वेलीच्या बुंद्याजवळ तन वाढणार नाही याची काळजी घ्यावी.
तन वाढल्यास खुरप्याच्या सहाय्याने सर्व काढावे आणि तेथील माती भुसभुशीत करून घ्यावी. प्रत्येक खड्डामध्ये फक्त दोनच झाड ठेवावी आणि बाकीचे झाडे काढून टाकावे.
कलिंगडाच्या वेलीचा संपर्क पाण्यासोबत येणार नाही याची काळजी घ्यावी. फळे लागल्यानंतर ती फळे गवताच्या सहाय्याने झाकून घ्यावी. त्यामुळे सूर्यप्रकाशापासून बचाव होतो.
महत्त्वाच्या किडी आणि रोग :
किडी :
1. कलिंगडातील फळमाशी :
फळमाशीचा प्रादुर्भाव कलिंगडाच्या फळांवर दिसून येतो. फळमाशीची मादी ही कलिंगडाच्या सालीच्या खाली अंडी घालते उपयुक्त हवामान आणि वातावरण भेटल्यामुळे अंडी फुटतात आणि त्यानंतर फळमाशीची आळी अंड्यातून बाहेर आल्या आल्या फळाच्या आतील गर खाऊ लागते आणि तिथेच वाढते.
पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याच फळातून पोखरून बाहेर येते आणि जमिनीमध्ये कोश अवस्थेमध्ये जाते.
त्यामुळे या किडीवर नियंत्रण करणे थोडे कठीण असते. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी शेतामध्ये गंध सापळ्यांचा वापर करावा आणि रक्षक सापळ्यांचा सुद्धा वापर करावा.
2. मावा :
मावा ही कीड हिरव्या आणि काळ्या रंगाचे असते. या किडीचा आकार खूप लहान असतो आणि ही कीड मोठ्या प्रमाणावर कलिंगडाच्या पानातील रस शोषते. या किडी आक्रमण केल्यानंतर आपल्या शरीरातून एक गोड चिकट पदार्थ स्त्रवतात.
त्या पदार्थाला काळे बुरशी आकर्षित होते आणि पूर्ण पानावर पसरते. त्यामुळे प्रकाश संश्लेषण ची क्रिया खंडित होते आणि अन्न निर्मिती बंद होते. त्याचे अनिष्ट परिणाम पीकावर होतात.
या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करावा आणि चिकट सापळ्यांचा वापर करावा.
3. तांबडे भुंगेे :
लागवडीनंतर जेव्हा बी उगवतात त्यावर हे तांबडे भुंगे हल्ला करतात आणि तिथल्या तिथे ते रोप मरून जाते.
रोग :
1. भुरी :
या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सर्वप्रथम पानाच्या खालच्या बाजूला पावडर सारखी बुरशी वाढते आणि हळूहळू पानाच्या वरच्या बाजूला दिसते.
त्यामुळे प्रकाश संश्लेषण ची क्रिया खंडित होते आणि पाने पूर्णपणे पिवळे पडून गळतात. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.
2. मर रोग :
या रोगाचा प्रादुर्भाव पीक जोमदार वाडी मध्ये असताना होतो. या रोगामुळे वेलीचे सर्व पाने गळून पडतात.
फुले पण गळू लागतात आणि वेल पूर्णपणे सुकून जाते आणि शेवटी मरते. हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. त्यामुळे बीज प्रक्रिया केल्यानंतर बिया लावाव्या.
3. केवडा :
या रोगाचा प्रादुर्भाव पानांवर खालच्या बाजूला पिवळ्या बुकटी रंगाचे ठिपके दिसल्यानंतर झालेला आहे असे ओळखावे.
ही ठिपके हळूहळू पानाच्या देठावर आणि नंतर पूर्ण वेलीवर पसरतात त्यामुळे वेल सुकून जाते आणि उत्पादनामध्ये घट होते.
या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांचा फवारा घ्यावा.
काढणी आणि उत्पादन :
कलिंगडाची काढणे ही लागवडीनंतर 90 ते 120 दिवसानंतर कर केली जाते. कलिंगडाची काढणी नेहमी सकाळी करावी त्यामुळे फळावरती चकाकी आणि तेज चांगले राहते. फळे काढण्यासाठी खालील लक्षणे असल्यानंतर काढणीला सुरुवात करावी.
1. फळाच्या जमिनीलगत चा भागाला पांढरट पिवळसर रंग येतो .
2.फळाचा देठ हा गुळगुळीत होतो.
3.फळावर आपण जेव्हा बोटाने टिचकी मारू तेव्हा बदबध असा आवाज येतो जर फळ परिपक्व नसले तर टणटण असा आवाज येतो .
4.फळाच्या देठ जवळ असलेली बाळी पूर्णपणे सुकते .
5.फळ हाताने दाबल्यानंतर करकर असा आवाज येतो.
कलिंगडाचे उत्पादन हे जातीनुसार बदलत असते आणि जातीनुसार आकारांमध्ये आणि वजन मध्ये बदल असतो. सरासरी कलिंगडाचे 40 ते 50 टन उत्पादन हेक्टरी मिळते.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi