Blogभाजीपाला

गवार लागवड :

5/5 - (1 vote)

गवार ही महाराष्ट्र मध्ये अत्यंत लोकप्रिय भाजी आहे. गवारीच्या हिरव्या शेंगांची भाजी खाण्यासाठी वापरले जाते. गवारी पासून डिंक, जनावरांचा हिरवा चारा, हिरवळीची खते, म्हणून वापर केला जातो. गवारीच्या डिंकाचा उपयोग कागद आणि कापड उद्योगांमध्ये, रंग व रसायन, तेल उद्योग, सौंदर्यप्रसाधने, खाद्यपदार्थ बनविणे, स्फोटक द्रव्यांच्या उत्पादनामध्ये, मोठ्या प्रमाणावर केला जातो. हे पीक व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे कारण हे पीक काटक आहे. गवारीच्या शेंगांमध्ये अ, ब आणि क जीवनसत्वे तसेच लोह, फॉस्फरस, प्रथिने, चुना, मुबलक प्रमाणामध्ये आढळतात. गवार खाल्ल्यामुळे पोटाच्या समस्यांपासून शरीराचे संरक्षण होते. गवार खाल्ल्यामुळे त्वचेच्या समस्या सुद्धा दूर होतात. शरीरातील रक्तदाबावर नियंत्रण राहतो. मधुमेह देखील गवार खाल्ल्यामुळे नियंत्रित राहते.

गवार चे सेवन जेवणामध्ये केल्याने वजन कमी होते. गवार ही थंड, पौष्टिक, मधुर, पित्तहारक, वृक्ष सारक, जड कफ आणि वायू कारक असून खाण्यासाठी चवदार भाजी आहे. गवारीच्या पानांचा रस जर आपण जखम झाल्यावर जखमेच्या वर्णावर लावल्याने जखम पिकत नाही आणि वेळेच्या आधी लवकर भरून येते. दुध देणाऱ्या गुरांना गवार खाऊ घातले जाते. त्यामुळे त्यांना भरपूर दूध येते आणि बैलांना देखील गवार घातली जाते .त्यामुळे त्यांना चांगली शक्ती मिळते. गवार मध्ये कॅल्शियम आणि आयर्न जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे गवारीची भाजी गर्भवती महिलांसाठी अत्यंत उपयोगी असते.

गवारीमध्ये फॉलिक ऍसिड आणि विटामिन असल्यामुळे गर्भवती महिलांनी गवारीचे सेवन करावे. गवारीच्या भाजीचा रस सेवन केल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात .तसेच गवारी मुळे लठ्ठपणा दूर होतो. बरेच जण गवारीचा वापर सॅलड म्हणून देखील करतात. गवारीच्या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याचे सेवन केल्याने पोटांचे विकार दूर होण्यास मदत होते आणि पचनाची क्रिया चांगली होते. फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे जास्त वेळेपर्यंत पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे सारखी खाण्याची सवय बंद होते. त्यामुळे वजन आपोआप कमी होते.

लागणारी जमीन :

गवारी हे कोणत्याही जमिनीमध्ये चांगली येते .परंतु जास्त उत्पादन घेण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थ जास्त असणारे मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी योग्य ठरते. गवारीच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू 7.5 ते 8 च्या दरम्यान असल्यास गवारीच्या उत्पादनामध्ये वाढ होते. गवारीची लागवड शक्यतो भारी जमिनींमध्ये करू नये .कारण तिथे पाणी साठवून राहते ,त्यामुळे गवारीची उत्पन्न कमी येते .हलक्या जमिनींमध्ये शेणखत दिल्यानंतर गवारीची पीक उत्तम येते.

लागणारे हवामान :

महाराष्ट्र मध्ये सर्व विभागांमध्ये गवार उत्तम रित्या येते. हे उष्ण हवामानामध्ये येणारे पीक असून खरीप आणि उन्हाळी दोन्ही हंगामांमध्ये गवारीची लागण केली जाते.

गवारीची उत्पन्न उष्ण आणि दमट हवा हवामानामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे येते 18 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस या तापमानामध्ये गवारीची प्रत चांगली होते.

थंडीच्या दिवसांमध्ये अतिशय थंड हवामानाचा पिकावर अनिष्ट परिणाम दिसतात.

सुधारीत जाती :

1. सुरती गवार :

या जातीची लागवड ऑक्टोबर नंतर आणि उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेंगा पातळ ,लांब आणि जाडसर असतात आणि चवीला गुळचट असतात. या झाडावर शेंगा गुच्छ मध्ये येत नाहीत या जातीच्या झाडांना फांद्या अधिक असतात.

2. पुसा नवबहार :

गवारीच्या या जातीची लागवड आपण खरीप किंवा उन्हाळी अशा दोन्ही हंगामांमध्ये करून चांगले उत्पादन घेऊ शकतो.

या जातीच्या झाडांना पानाच्या बोचक्यात शेंगांचा घस येतो. शेंगांची लांबी साधारणपणे पंधरा सेंटीमीटर पर्यंत असते.

शेंगा हिरव्या रंगाच्या ,लांब, कोवळ्या असतात आणि झाड थेट सरळ वाढते.

3.पुसा सदाबहार :

या जातीच्या शेंगा लागवड केल्यानंतर 45 ते 55 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होतात. या जातीची झाडे सरळ आणि उंच वाढतात .आपण या जातीच्या गवारीचे उत्पन्न उन्हाळी आणि खरीप हंगामांमध्ये घेऊ शकतो. या जातीच्या शेंगांची लांबी 12 ते 15 सेंटीमीटर लांब असते आणि शेंगांचा रंग हिरव्या रंगाचा असतो.

4. देशी गवार :

या जातीच्या शेंगा आखूड ,निबार ,बिजियुक्त आणि केसा खाजवणारे पण चवीला छान असणारी गवार असते. या जातीच्या गवारीचे बी गावोगावी प्रचलित होते या जातीची व्यवहार खेडेगावांमध्ये चव देऊन खाल्ली जाते.सोलापूरकडील भागांमध्ये शहरात आणि खेड्यात या जातीच्या गवारीला मागणी असते.

5. नंदिनी (एन सी बी – 12) :

या जातीचे संशोधन निर्मल सीड्स कंपनी ने केलेले आहे .ही गवारीची संकरित जात आहे. या जातीच्या शेंगा कोवळ्या, आखूड आणि मऊ असतात.

या जातीच्या झाडांची उंची कमी असते. त्यामुळे पानांच्या बोचक्यातच भरपूर प्रमाणामध्ये शेंगा येतात. शेंगा खाण्यासाठी उत्कृष्ट लागतात.

त्यामुळे बाजारामध्ये या शेंगांची चांगली मागणी बघायला मिळते.

या जातीची झाडे रोगाला बळी पडत नाहीत, त्यामुळे व्यापारी दृष्टीने लागवडीसाठी ही जात फायद्याची ठरते.

6. पुसा मोसमी :

लागवड केल्यानंतर सरासरी 75 ते 80 दिवसांमध्ये शेंगा काढण्यासाठी तयार होतात .या जातीची लागवड खरीप हंगामामध्ये केल्यानंतर उत्पन्न जास्त मिळते .या जातीच्या शेंगांची लांबी सरासरी दहा ते बारा सेंटीमीटर असते आणि या जातीचे उत्पन्न जास्त असते.

खत आणि पाणी नियोजन :

गवारीची लागवड ही खरीप किंवा उन्हाळी हंगामामध्ये केली जाते.

लागवड करण्याच्या अगोदर निवडलेली जमीन नांगरून घ्यावी आणि त्याचवेळी जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये शेणखत किंवा घन जीवामृत घालावे.

मशागत करताना सर्व ढेकळे फोडून घ्यावे आणि कोळप्याच्या दोन ते तीन पाळ्या मारून जमीन एकसारखी करून घ्यावे.

त्यानंतर सरीवरंब्या वर प्रत्येक ठिकाणी दोन बिया टोकाव्या. बिया टोकण्याच्या अगोदर जर दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या तर उगवण चांगली होते.

पेरणीपूर्वी जमिनीला हलके पाणी द्यावे, वापसा आल्यानंतर शक्यतो पेरणी करावी.

त्यामुळे गवारीची उगवण चांगली होते. पेरणीनंतर देखील हलके पाणी द्यावे.

गवारीची लागवड ही 45 ×15 सेंटीमीटर किंवा 30 × 15 सेंटीमीटर या अंतरावर सरीवर केली जाते.

टोकून लागवड केल्यानंतर हेक्टरी 14 ते 24 किलो बियाणे गवारीचे लागतात.खत व्यवस्थापन आणि

पाणी नियोजन :

जमीन तयार करत असताना गवारीला शेणखत किंवा घन जीवामृत टाकावे आणि लागवड केल्यानंतर एका आठवड्यामध्ये 200 लिटर जीवामृत ठिबक सिंचनाच्या सहाय्याने सोडावे.

ठिबक सिंचनाचा वापर न केल्यास पाठ पाण्याने पाणी देत असताना जीवामृत सोडावे.

त्यामुळे गवारीचे उत्पादन चांगले येते, गवारीच्या पिकाला हंगाम जमिनीचा मगदूर बघून पाण्याचे योग्य नियोजन करावे.

फुले आल्यानंतर जवळपास शेंगांचा बहार पूर्ण होईपर्यंत पाण्याचा ताण पडणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.

खरीप हंगामांमध्ये जमिनीमध्ये ओलावा बघून पाणी द्यावे आणि उन्हाळ्यामध्ये सहा ते आठ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

गवारीच्या शेतामध्ये पाणी साठवून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

आंतरमशागत :

पेरणीनंतर दहा ते बारा दिवसांनंतर रोपांची विरळणी करावी आणि जोमदार आणि चांगली रोपे योग्य अंतरावर ठेवावे.

तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पिकाच्या वाढीच्या काळात दोन ते तीन वेळा हलक्या खुरपण्या कराव्या.

तणांचे नियोजन करण्यासाठी आपण आच्छादन करू शकतो.

त्यामुळे जमिनीमध्ये जास्त वेळ पर्यंत पाणी टिकून राहते आणि तणांचे देखील योग्य नियोजन होते.

महत्त्वाच्या किडी आणि रोग :

किडी :

1. मावा :

ही एक रस शोषक कीड आहे .या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पाने पिवळी पडतात. कारण ही कीड मोठ्या प्रमाणावर झाडाच्या कोवळ्या भागातून, पाण्यातून रस शोषण करते .ही कीड एक चिकट गोड पदार्थ स्वतःच्या शरीरातून स्त्रवते .त्या चिकट गोड पदार्थावर काळी बुरशी आकर्षित होते. त्यामुळे पाने काळी पडतात आणि प्रकाश संश्लेषण ची क्रिया मंदावते. परिणामी उत्पादन कमी येते. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि शेतामध्ये चिकट सापळ्या लावावे .एकरी वीस ते पंचवीस चिकट सापळे लावावे.

2. तुडतुडे :

ही देखील गवार पिकामध्ये रस शोषक कीड आहे. ही कीड झाडाच्या कोवळ्या फांद्यामधील आणि देटा मधील रस मोठ्या प्रमाणावर शोषते .त्यामुळे झाड कमकुवत बनते आणि परिणामी उत्पादनामध्ये घट होते. या किडीचे योग्य नियोजन करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

रोग :

1. भुरी रोग :

भुरी हा एक बुरशीजन्य रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानाच्या दोन्ही बाजूवर डाग पडतात. नंतर वेळेनुसार पूर्ण पान दोन्ही बाजूने पांढऱ्या रंगाचे होते आणि हा रोग हळूहळू पानापासून खोडावर आणि शेंगांवर देखील पसरतो .त्यामुळे उत्पादनामध्ये कमी येते .या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची आठवड्यातून एकदा फवारणी घ्यावे.

2. मर रोग :

हा रोग लागवड केल्यानंतर लगेच रोपांमध्ये दिसून येतो. रोपे कोलमडून पडतात पहिल्यांदा झाड हळूहळू पिवळे पडते आणि बुंध्याजवळ अशक्त बनते. प्रादुर्भाव जास्त वाढल्यानंतर झाड पूर्णपणे वाळून मरते. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बियाणांना बीजामृतची प्रक्रिया करावी आणि लागवड झाल्यानंतर जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.

काढणी आणि उत्पादन :

गवारीची शेंग हे गुच्छ मध्ये येते .गुच्छतील शेंगा अगोदर तोडणी साठी तयार होतात.

भाजीसाठी हिरव्या कोवळ्या परंतु वाढलेल्या शेंगांची नियमित तोडणी केली जाते.

तोडणीसाठी उशीर झाल्यास शेंगा अजून होतात. त्यासाठी वेळोवेळी तोडणी करावी.

जून झाल्यानंतर गवारीच्या शेंगांमध्ये रेषांचे प्रमाण वाढते आणि साल कडक होते.

त्यामुळे बाजारांमध्ये अशा गवारीची मागणी नसते. म्हणून तीन ते चार दिवसांनी नियमित शेंगांची तोडणी करावी.

प्रत्येक जातीनुसार गवारीचे उत्पादन वेगवेगळे येते. सरासरी गवारीच्या हिरव्या शेगांचे हेक्टरी उत्पादन पाच ते सहा टन पर्यंत मिळते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/vegetables

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *