Blogभाजीपाला

लसुण लागवड 🧄:

5/5 - (1 vote)

लसूण हे मसाला पिकातील महत्त्वाचे पीक म्हणून बऱ्याच भागांमध्ये वर्षभर घेतले जाणारे नगदी पीक मानले जाते. लसणामुळे जेवणाची चव आणि सुवास वाढला जातो. लसनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्मही असतात आणि लसणाचा उपयोग जैविक कीटकनाशके आणि बुरशीनाशके बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. लसणाचा उग्र वास अनेक जणांना आवडत नाही परंतु कमी प्रमाणात का असेना लसणाचा उपयोग दररोज आहारामध्ये केला तर त्याने आरोग्य चांगले राहते. लसणाचा उपयोग लोणचे, चटण्या, भाज्या आणि अनेक टिकाऊ पदार्थांमध्ये केला जातो. लसणामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. खोकला, रक्तदाब, पोट, कान व डोळ्यांच्या विकारावर लसूण चांगला गुणकारी असतो. लसणामध्ये स्फुरद, पालाश, चुना, फॉस्फरस, मॅग्नेशियम अशी जीवनसत्वे असतात.

लसूण मध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदा होतो. लसणामुळे शरीरात स्टॅमिना वाढतो. सर्क्युलेशन व्यवस्थित होते. फर्टिलिटी वाढवण्यासाठी सुद्धा लसून मदत करते. लसूण खाल्ल्याने हार्मोन बॅलन्स मध्ये राहतात. आयुर्वेदामध्ये लसणाला अँटीसेप्टिक, अंतीबॅक्टरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी मांनले जाते. बरेच शेतकरी लसणाची लागवड आंतरपीक म्हणून करतात. लसणाचे आंतरपीक हळद, ऊस अशा नगदी पिकांमध्ये केले जाते. त्यामुळे शेतकऱ्याचा दुप्पट फायदा होतो. लसूण लागवड ही शेतकऱ्याला नफ्याची ठरते.

लागणारे हवामान:

लसूण हे मुख्यतः रब्बी हंगामातील पीक आहे. महाराष्ट्र मध्ये लसणाची लागवड शक्यतो रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते.

थंडीच्या दिवसांमध्ये लसणाचा गड्डा चांगला पोसवतो.

लसणाच्या योग्य वाढीसाठी 25 अंश ते 28 अंश सेल्सिअस तापमान दिवसा आणि दहा ते पंधरा अंश सेल्सिअस तापमान रात्रीचे चांगले ठरते. उष्ण हवामानामध्ये लसणाचा गड्डा मोठा होत नाही आणि उत्पादनामध्ये सुद्धा घट होते.

लागणारी जमीन :

लसूण लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारे ,सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारी भुसभुशीत जमीन निवडावी.

चिकट भारी काळी जमिनीमध्ये लसूण ची लागवड करू नये. अशा मातीमध्ये लसणाचे गड्डे पोसत नाही आणि काढणीच्या वेळी लसूण तुटतो.

त्यामुळे अशा जमिनीमध्ये लागवड टाळावी. लसणाच्या लागवडीसाठी अति अम्ल युक्त जमीन निवडू नये.

जमिनीचा सामू सहा ते सातच्या दरम्यान असल्यास लागवड करावी.

सुधारित जाती :

1. गोदावरी :

लसणाची ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने विकसित केलेली आहे. या जातीचे सरासरी उत्पन्न 100 ते 150 क्विंटल पर्यंत मिळते. या जातीच्या लसणाची कालावधी 140 ते 150 दिवस आहे. या जातीच्या लसनाचा गड्डा जांभळा पांढरट असून मध्यम आकाराचा, चवीला तिखट असतो. एका गड्ड्या मध्ये सरासरी 24 पाकळ्या आढळून येतात. लसणाची ही जात जास्त काळापर्यंत टिकून राहते.

2. फुले नीलिमा :

लसणाची ही जात देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने विकसित केलेले आहे. ही जात जांभळा करपा, कोळी, करपा, फुलकिडे या किडी आणि रोगांना बळी पडत नाही. या जातीच्या गड्ड्यांचा आकार मोठा असतो आणि आकर्षक असून जांभळ्या रंगाची गड्डे असतात.

3. फुले बसवंत :

लसणाची ही जात देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कांदा संशोधन योजना पिंपळगाव बसवंत येथे निवड पद्धतीने विकसित करण्यात आलेली आहे. या जातीच्या गड्ड्यांना सर्वसाधारणपणे 25 ते 30 पाकळ्या एका गड्यामध्ये असल्याचे दिसते. गड्ड्याचा रंग जांभळा असतो आणि पाकळ्या देखील जांभळ्या रंगाच्या दिसून येतात. या जातीचे सरासरी उत्पन्न 140 ते 150 क्विंटल पर्यंत मिळते आणि एका गड्ड्याचे सरासरी वजन 30 ते 35 ग्रॅम पर्यंत असते.

4. ॲग्री फाउंड व्हाईट :

लसणाची ही जात एन. एच .आर .डी .एफ नाशिक येथून प्रसारित झालेली आहे. या जातीचे लागवड केल्यानंतर 120 ते 135 दिवसांमध्ये लसुन काढण्यासाठी तयार होतो. या जातीपासून हेक्‍टरी उत्पादन 130 ते 140 क्विंटल पर्यंत मिळते. ही जात रोग आणि किडींसाठी प्रतिकारक आहे. गड्ड्याचा रंग पांढरा असून, स्वाद मध्यम तिखट आणि गड्डे आकाराने मोठे असल्याचे दिसते. एका लसणाच्या गड्डया मध्ये 13 ते 28 पाकळ्या असतात आणि साठवणुकीसाठी ही जात उत्तम मानले जाते.

5. यमुना सफेद :

कृष्णाची ही जात राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान नाशिक येथे विकसित करण्यात आलेली आहे. लसणाची ही जात भारतामध्ये सर्व जागी लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे .या जातीचे सरासरी उत्पादन 150 ते 175 क्विंटल हेक्टरी मिळते आणि ही जात साठवणुकीसाठी उत्तम मानली जाते. या जातीच्या गड्डयाचा आकार मोठा आणि रंग हा पांढरा असलेला दिसून येतो. एका गड्ड्यामध्ये पाकळ्यांची सरासरी संख्या पंधरा ते सोळा पर्यंत असते.

6. जी 282:

लसणाची ही जात देखील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान नाशिक इथून प्रसारित करण्यात आलेली आहे. या जातीचे सरासरी उत्पादन 175 ते 200 क्विंटल पर्यंत मिळते. ही जात निर्यातीसाठी उपयुक्त असून गड्ड्याचा रंग पांढरा असतो आणि आकार मध्यम ते मोठा असून एका गड्ड्या मध्ये पंधरा ते सोळा पाकळ्या असतात.

7. श्वेता :

श्वेता ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने विकसित केलेली आहे. या जातीचा कालावधी 130 ते 135 दिवसांपर्यंत असतो. गड्ड्याचा रंग शुभ्र पांढरा आणि चवीला तिखट असून एका लसणाच्या गड्ड्या मध्ये 26 पाकळ्या असतात. या जातीचे सरासरी उत्पादन 100 ते 123 क्विंटल हेक्टरी मिळते.

अभिवृद्धी आणि हंगाम :

लसणाची लागवड लसणाच्या पाकळ्या पासून केली जाते. जाड, ठसठशीत, मोठ्या पाकळ्यांचा वापर लागवडीसाठी करावा. लसणाची लागवड रब्बी हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर च्या काळात केली जाते.

लागवड :

लसणाच्या लागवडीसाठी निवडलेली जमीन खोल नांगरून घ्यावी आणि कोळप्याच्या सहाय्याने दोन ते तीन पाळ्या मारून घ्याव्या.

जमीन तयार करत असताना शेणखत किंवा घन जीवामृत जमिनीमध्ये मिसळून घ्यावे आणि सपाट वाफे तयार करावे.

वाफ्यांमध्ये 10×10 सेंटिमीटर अंतरावर पाकळ्या टोकून लावाव्यात.

लागवड नेहमी कोरड्या जमिनीवर करावी आणि नंतर लागवड झाल्यानंतर पाणी सोडावे.हेक्टरी 600 किलो बियाणे लसणाच्या लागवडीसाठी लागतात.

खत आणि पाणी नियोजन :

जमीन तयार करत असताना शेणखत किंवा घन जीवामृत जमिनीमध्ये मिसळून घ्यावे एक ते दोन आठवडाच्या अंतराने पाण्यातून जीवामृत सोडावे आणि चुलीतील राख किंवा गौर्यांची राख लसणामध्ये टाकावे. लसणाची लागवड केल्यानंतर लगेच पाणी देणे गरजेचे असते.

त्यानंतर जमिनीतील ओलाव्याप्रमाणे तीन ते चार दिवसांनी पाणी द्यावे. सपाट वाफ्यांमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी आणि लसणाचा गड्डा पोसण्याच्या काळामध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये.

नाहीतर गड्डे फुटून त्यातून हिरवे कोंब बाहेर पडतात आणि साठवणूक काळामध्ये लसूण टिकत नाही.

आंतरमशागत : जमीन नांगरताना काडीकचरा काढून टाकावा आणि लागवड केल्यानंतर 20 ते 25 दिवसानंतर पहिली खुरपणी करावी. त्यानंतर लागवडीमध्ये कुठेही तन दिसल्यास ते काढून द्यावे.

जास्त तन वाढल्यानंतर गड्डा पोसण्यामध्ये अडथळा येतो. गड्डा भरवण्याच्या सुरुवात होण्याच्या काळात पिकाला मातीची चांगली भर द्यावी.

महत्त्वाच्या किडी आणि रोग :

किडी :

1. फुल किडे :

फुल किडे ही रस शोषक वर्गातील अतिशय लहान कीड असते .ही कीड कोवळ्या पातींमधून रस शोषते. त्यामुळे करप्यासारखे बुरशीजन्य रोग लसूण वर येतात. जास्त करून 25 ते 35 अंश सेल्सिअस या तापमानामध्ये या किडींची वाढ जोमाने होते. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी लसणाच्या सोबत गव्हाचे किंवा मक्याचे लागवड करावे आणि जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.

2. पिवळी कोळी :

पिवळी कोळी ही कीड अतिशय लहान पिवळ्या रंगाची असते .ही लसणाच्या पाती मधून मोठ्या प्रमाणामध्ये रस शोषते. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे पडलेले आपल्याला दिसते आणि लसणाचे गड्डे चांगले पोसत नाहीत. या किडीचा प्रादुर्भाव शेतामध्ये दिसल्यानंतर लगेच जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

रोग :

1. पिवळसर करपा :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लसणाच्या पाठीवर लहान लहान पिवळे डाग पडलेले दिसून येतात.

हे दाग वेळेनुसार वाढत जातात आणि पूर्ण पाने हळूहळू पिवळी पडतात आणि करपलेली दिसतात.

आद्रतेचे प्रमाण वातावरणामध्ये वाढल्यानंतर या रोगाचा प्रादुर्भाव जोमाने होतो.

या रोगाचा प्रसार फुल किड्यांच्या मार्फत वाढलेला दिसतो. या रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी शेतामध्ये येणाऱ्या फुल किडींचे योग्य नियोजन करावे.

त्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी आणि प्रादुर्भाव जास्त वाढल्यानंतर जैविक बुरशीनाशकांची फवारणी सुद्धा घ्यावी.

2. जांभळा करपा :

हा रोग बुरशीजन्य रोग असतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लसणाच्या पाती पिवळसर जांभळे काळपट डाग पडलेले दिसते.

प्रादुर्भाव वाढल्यानंतर पूर्ण लसणाची पात करपलेली दिसते. पानावर द्रव पडणे आणि आद्रता असणे या रोगाला वाढवण्याचे कारण बनते.

या रोगावर नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी लसणावर करावे.

काढणी आणि उत्पादन :

लसणाची लागवड केल्यानंतर 4 ते 5 महिन्यानंतर गड्डे काढण्यासाठी पूर्णपणे तयार होतात.

75% पेक्षा जास्त पाणी पिवळी पडल्यानंतर लसूण काढण्याला सुरुवात करावी.

कुदळीच्या साह्याने सर्व गड्डे इजा न होता खोदून काढावे आणि वेगळे करावे.

सर्व माती झाडून घ्यावी आणि तसेच चार ते पाच दिवस सुकवावे. नंतर पातीसह जुड्या बांधून घरी साठवावे.

गड्डे विक्रीसाठी पाठवण्यासाठी सर्व पाती कापून फक्त गड्ढे बाजारामध्ये पाठवावे.

लसणाची उत्पादन जातेनुसार बदलते परंतु हेक्‍टरी उत्पादन नऊ ते दहा टन सरासरी मिळते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/vegetables

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *