काकडी लागवड 🥒
महाराष्ट्र मध्ये उन्हाळी हंगामामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये लावले जाणारे पीक म्हणजे काकडी. काकडी उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. कारण काकडीमध्ये 96 टक्के पाण्याचा💧 अंश असतो, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडी खाण्यासाठी थंड राहते. काकडी कच्ची खाली जाते किंवा काकडी चा उपयोग कोशिंबीर मध्ये केला जातो. काकडीमध्ये ब आणि क जीवनसत्वे मोठ्या प्रमाणामध्ये असतात.
तसेच पोटॅशियम, लोह, चुना, फॉस्फरस, सोडियम आणि इतर खनिजे मुबलक प्रमाणामध्ये आढळतात. काकडी खाल्ल्याने आपले शरीर हायड्रेटेड राहते. त्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमी भासत नाही आणि काकडीमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये कॅलरीज असतात. त्यामुळे वेटलॉस मध्ये सुद्धा काकडी मदत करते. काकडी रक्ता मधील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि मधुमेहाची लढण्यासाठी मदत करते.
लागणारी जमीन :
काकडी हे वेलवर्गीय पीक आहे. त्यामुळे काकडी रेताळ ते मध्यम किंवा भारी जमिनीमध्ये उत्तम प्रकारे येऊ शकते.
काकडीचे भरपूर उत्पन्न घेण्यासाठी उत्तम निचरा होणारी, जास्त प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थ असलेले गाळाची जमीन निवडणे गरजेचे आहे.
काकडी लागवडीसाठी जमिनीचा सामू 5.5 ते 6.7 पर्यंत असल्यास काकडी चे जास्त उत्पन्न मिळते.
लागणारे हवामान :
काकडी या पिकाला उष्ण हवामान वाढीसाठी लागते. कमी तापमानांमध्ये काकडीच्या बिया उगवत नाहीत.
18 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान बियांची उगवण शेतामध्ये चांगली होते. मध्यम उष्ण तापमान काकडी साठी पोषक ठरते.
हवामानामध्ये आद्रता आणि जास्त प्रमाणामध्ये पाऊस काकडीवर करपा किंवा केवड्या सारख्या रोगांना आमंत्रण देते.
काकडीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आणि कोरडी हवा असल्यावर उत्पन्न भरघोस मिळते.
सुधारित जाती :
1. शितल वाण :
काकडीची लागवड केल्यानंतर 45 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होते .या जातीचे सरासरी उत्पादन 30 ते 35 टन हेक्टरी मिळते. एका काकडीचे वजन सरासरी 200 ते 250 ग्रॅम पर्यंत असते आणि काकडीचा रंग मध्यम हिरव्या रंगाचा असतो.
2. पुना खिरा :
या जातीमध्ये दोन प्रकारचे बियाणे असतात. पिवळट व हिरवे काकडी आणि तांबड्या काकडी या काकडीचे सरासरी उत्पन्न 13 ते 15 टन हेक्टरी मिळते. ही काकडीची जात लवकर फळे देते. या काकडीची फळे लहान असतात उन्हाळी हंगामामध्ये या जातीची लागवड केली जाते.
3. हिमांगी :
काकडीची ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विकसित केलेली आहे .या जातीचे हेक्टरी उत्पन्न 170 ते 190 क्विंटल पर्यंत मिळते .एका काकदी चे वजन 150 ते 200 ग्रॅम पर्यंत असते. या काकडीमध्ये बियांचे प्रमाण खूप कमी असते आणि गराचे प्रमाण जास्त असते .त्यामुळे ही काकडी चवीला उत्तम लागते.
4. फुले शुभांगी :
काकडीची ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विकसित झालेले आहे. या जातीपासून काकडीचे 180 ते 190 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते. खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये ही जात पेरली जाते. या काकडीची स्थिती आठ ते दहा दिवसांपर्यंत चांगले राहते.
5. सलोनी :
काकडी च्या या जातीचे उत्पादन लागवडीनंतर 35 ते 40 दिवसांमध्ये सुरू होते. या जातीची लागवड आपण तिन्ही हंगामामध्ये करू शकतो. काढणी झाल्यानंतर काकडी खूप दिवस टिकते. काकडीचा रंग फिकट हिरवा असतो आणि रोगप्रतिकारक शक्ती या जातीमध्ये जास्त आहे.
6. मालिनी :
काकडीची ही जात किडी आणि रोगांना लवकर बळी पडत नाही. फळांचा रंग फिकट हिरवा असून पहिली काढणी लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांमध्ये केली जाते. फळाचे सरासरी वजन 200 ते 250 ग्राम पर्यंत असून, लांबी 19 ते 22 सेंटीमीटर पर्यंत असते.
7. एन. एस 404 :
काकडीच्या या जातीचे उत्पादन जास्त असते आणि काढणीनंतर ही काकडी जास्त दिवस टिकते. लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांमध्ये पहिली तोडणी होते. सरासरी फळाची लांबी 25 ते 28 सेंटीमीटर पर्यंत असते. त्या फळाचे सरासरी वजन 200 ते 220 ग्रॅम पर्यंत असते.
8. जिप्सी :
काकडीच्या या जातीचा रंग हिरवा असून फळावर पांढऱ्या रेषा असलेले पाहायला मिळते. लागवडीनंतर पहिली काढणी 45 ते 50 दिवसानंतर होते. फळाचे सरासरी वजन 200 ते 250 ग्राम पर्यंत असते आणि लांबी 18 ते 20 सेंटीमीटर पर्यंत असते. फळे काढणीनंतर जास्त काळ टिकतात.
लागवड :
काकडीसाठी निवडलेल्या जमिनीमध्ये खोल नांगरट करावी आणि कोळपे च्या साह्याने दोन ते तीन कोळपण्या कराव्या आणि जमीन एकसारखी करून घ्यावी.
जमिनीची मशागत करत असताना शेणखत किंवा घन जीवामृत जमिनीमध्ये मिसळून घ्यावे.
काकडीची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये केली जाते खरीप हंगामामध्ये जून ते जुलै महिन्यामध्ये लागवड करतात.
जास्त पावसाच्या भागांमध्ये हिवाळ्याच्या सुरुवातीलाच ऑक्टोबर महिन्यांमध्ये काकडीची लागवड केली जाते.
साधारणपणे जास्त थंडीचे दोन ते चार महिने वगळले तर काकडीची लागवड वर्षभर करता येते.
काकडीची लागवड मुख्यतः दोन पद्धतीने करता येते.
- सरी पद्धत : काकडीच्या बियांची लागवड सऱ्यामध्ये केली जाते. सरीच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला ठराविक अंतरावर तीन ते चार बिया टाकल्या जातात .त्यामुळे वेल आणि फळांना पाणी लागून ते खराब होत नाहीत. सुमारे 1.5 ते 2.किलो बियाणे पुरेसे होते. काकडीच्या लागवडीसाठी जास्त करून 1× 0.5 मीटर अंतर योग्य ठरते. बी टाकल्यानंतर लगेच पाणी सोडावे.
- आळे पद्धत : 2×1 मीटर अंतरावर आळे तयार केले जातात. अळ्यांमध्ये चांगल्या पद्धतीने कुजलेले शेणखत किंवा घन जीवामृत टाकले जाते आणि प्रत्येक अळ्यांमध्ये तीन vते चार बिया टाकल्या जातात आणि पाणी सोडले जाते.
खत आणि पाणी व्यवस्थापन :
जमीन तयार करत असताना शेतामध्ये शेणखत आणि घन जीवामृत मिसळून घ्यावे.
प्रत्येक आठवड्याला पाणी सोडताना त्यामधून जीवामृत सोडावे.
जमिनीमध्ये ओलाव्यानुसार पाण्याचे योग्य नियोजन करावे.
हिवाळ्याच्या काळामध्ये दहा दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सहा ते सात दिवसांच्या अंतराने काकडीला पाणी द्यावे.
आंतरमशागत :
काकडी हे वेलवर्गीय पीक आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला वळण देणे खूप गरजेचे आहे.
काही शेतकरी काकडीसाठी बांबूच्या काट्यांचा वापर करतात आणि तर काठी लावून सुद्धा काकडीच्या वेली तारेवर चढवला जातात.
आळे पद्धतीने काकडीची लागवड केल्यानंतर अळ्यामधील सर्व तन काढून द्यावे.
सऱ्यांमध्ये लागवड केल्यानंतर वेळोवेळी खुरपणी करावी आणि जमीन भुसभुशीत करून करावी.
महत्वाच्या किडी आणि रोग :
किडी :
1.मावा :
मावा ही रस शोषणारी कीड आहे. ही कीड पानांमधील रस मोठ्या प्रमाणामध्ये शोषते आणि पानावर असल्यावर स्वतःच्या शरीरामधून एक गोड चिकट पदार्थ स्त्रवते.
त्यामुळे काळी बुरशी त्या गोड पदार्थाला आकर्षित होऊन पूर्ण पान काळे पडते आणि प्रकाश संश्लेषण ची क्रिया थांबते. पाने निस्तेज होऊन पिकाची पूर्णपणे वाढ खुंटते.
या किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि शेतामध्ये चिकट सापळे लावावे.
2.पांढरी माशी :
पांढरी माशी रस शोषणारी कीड आहे. ही कीड मोठ्या प्रमाणामध्ये झाडाच्या पानातून आणि कोवळ्या शेंड्यातून रस शोषते.
त्यामुळे झाड कमकुवत बनते. पांढरी माशी वायरसचा प्रसार करते. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.
3.तुडतुडे :
ही सुद्धा काकडीवरील एक रस शोषणारी कीड आहे . ही कीड वेलीच्या कोवळ्या भागातून रस शोषते. त्यामुळे झाड कमकुवत बनते या रोगा वर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.
4.पाने खाणारी अळी किंवा फळातील अळी :
ही अळी फळ माशीची असते .या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर फळे वाकडे तिकडे होतात आणि आत पूर्णपणे सडतात. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी .प्रादुर्भावग्रस्त सर्व फळे काढून टाकावी.
रोग :
1.केवडा :
या रोगाला डाऊनी मिल्ड्यू असे देखील म्हटले जाते. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात.
वेळेनुसार या रोगाचा प्रसार झाल्यावर पानाच्या देठांवर सुद्धा पिवळ्या रंगाची ठिपके दिसू लागतात.
वातावरणामध्ये दमट हवामान असेल तर या रोगाचा प्रादुर्भाव झपाटाने वाढतो. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.
2. भुरी:
या रोगाला पावडरी मिल्ड्यू असे म्हणले जाते .या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पिठासारखे पांढरी बुरशी पानाच्या खालच्या बाजूला वाढलेली दिसते.
ढगाळ वातावरणामध्ये आणि दमट वातावरणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो .या रोगावर नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.
3. मोझैक व्हायरस :
या रोगाचा प्रसार मावा या किडीमुळे होतो. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी पिवळे व निळे चिकट सापळे शेतामध्ये लावावे आणि जैविक कीटकनाशकांची फवारणी वेळोवेळी घ्यावी .एकरी 20 सापळे शेतामध्ये लावावे.
4. फळकुज :
फळकुज पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर दिसतो .काकडी ओलसर जमिनीला टेकल्यावर ती फळे तिथे पाण्यामुळे कुजतात .या रोगा वर नियंत्रण करण्यासाठी फळांना जमिनीशी येणारा संपर्क कमी करावा.
काढणी आणि उत्पादन :
काकडीची लागवड केल्यानंतर 35 ते 40 दिवसांमध्ये पहिली तोडणी केली जाते दर तीन ते चार दिवसानंतर काकडी वेला वरून तोडावी.
काकडी ही कोवळी असताना तोडावी. जास्त जून झालेले काकडीला बाजारामध्ये भाव मिळत नाही.
त्यामुळे काकडी कोवळी लुसलुशीत असतानाच तोडावी.
काकडीचे उत्पन्न जातीनुसार बदलते. सरासरी काकडीचे उत्पादन 20 ते 25 टन पर्यंत मिळते.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi