पानकोबी लागवड
पान कोबी ही भाजी वर्षभर बाजारामध्ये दिसते .महाराष्ट्र मध्ये पान कोबीची लागवड ही रब्बी हंगामामध्ये केली जाते. कोबीमध्ये अ, ब आणि क हे जीवनसत्वे जास्त प्रमाणामध्ये असतात. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, आणि लोह ही खनिजे सुद्धा आढळतात. कोबीचा वापर भाजी, लोणचे, सॅलेड, कोशिंबीर बनवण्यासाठी केला जातो. कोबीचे सूप सुद्धा तयार केले जाते. पत्ता गोबी चा वापर चायनीज जेवण मध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. कोबीमध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीर रोग प्रतिकारक बनते. कोबिमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे कोबी पचनासाठी चांगला असतो, त्यामुळे पोटाचे विकार होत नाही. फायबर असल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी राहते. लाल कोबी हा पोटॅशियम चा उत्तम स्तोत्र मानला जातो. त्यामुळे उच्च रक्तदाबात कमी होतो. कोबीमध्ये विटामिन के आढळते जे की हाडे मजबूत करण्यासाठी, रक्त गोठण्यासाठी चांगले असते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोबी चा वापर आपल्या आहारात करावा. त्यामुळे शरीर चांगले राहते.
लागनारी जमीन :
कोबीसाठी सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, नदीकाठच्या सुपीक जमिनी योग्य ठरतात.
हलक्या जमिनीमध्ये सुद्धा सेंद्रिय खते टाकून लागवड केली जाते.
पानकोबीच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 च्या दरम्यान असल्यास उत्पन्न चांगले येते.
आम्लयुक्त जमिनी आणि क्षारयुक्त जमिनी पानकोबी या पिकासाठी मानवत नाहीत.
लागणारे हवामान :
कोबी हे रब्बी हंगामामध्ये घेतले जाणारे पीक आहे.
कोबी पिकासाठी थंड वातावरण हे चांगले राहते.
जास्त उष्ण आणि कोरडे वातावरण असल्यास कोबीचा गड्डा चांगला पोसवत नाही आणि घट्ट बनत नाही.
कोबीचा गड्डा पोसण्यासाठी 15 अंश ते 25 अंश सेल्सिअस तापमान पोषक असते.
हवामानामध्ये होणारा अचानक बदल या पिकाला मानवत नाही.
वातावरणामध्ये जास्त आद्रता असल्यास हे पीक रोगांना बळी पडते.
सुधारित जाती :
लवकर येणार जाती (हळव्या जाती) :
1.क्रांती :
कोबीच्या ह्या जातीचे उत्पन्न हेक्टरी 50 ते 55 पर्यंत मिळते. लागवड केल्यानंतर 93 ते 95 दिवसांमध्ये कोबी काढण्यासाठी तयार होतो .या जातीच्या कोबीचे वजन एक किलो पर्यंत असते.
2. श्री गणेश गोल्ड :
या जातीच्या कोबी पासून सरासरी 75 ते 80 टन हेक्टरी उत्पादन मिळते. हा कोबी वजनामध्ये जास्त असतो ,सरासरी अडीच किलो पर्यंत एका कोबीचे वजन भरते. लागवड केल्यानंतर साधारणपणे 90 ते 95 दिवसांमध्ये कोबी काढण्यासाठी तयार होतो .कोबीच्या पानाचा रंग निळसर हिरवा असतो.
3. हरीराणी गोल :
या जातीच्या कोबीच्या पानांचा रंग हिरवा निळसर असतो. लागवड केल्यानंतर सरासरी 95 दिवसांमध्ये कोबी काढण्यासाठी तयार होतो .एका कोबीचे सरासरी वजन दीड किलो पर्यंत भरते. या जातीपासून साधारणपणे 55 ते 60 टन उत्पादन मिळते.
4. गोल्डन एकर :
या जातीच्या कोबीची लागवड केल्यानंतर सरासरी 70 ते 80 दिवसांमध्ये कोबी काढण्यासाठी तयार होतो .गड्ड्याचे वजन एक ते दीड किलो पर्यंत भरते .हे कोबी आकाराने लहान असतात आणि लवकर पक्व होतात.
5. कावेरी :
कोबीच्या या जातीची लागवड उन्हाळ्यात करता येते. सरासरी कोबीचे वजन दोन किलोपर्यंत भरते. लागवड केल्यानंतर 65 दिवसांमध्ये कोबी काढण्यासाठी तयार होतो. कोबीची ही जात इंडो अमेरिका हायब्रीड सीड्स या कंपनीने प्रसारित केलेली आहे.
6. प्राईड ऑफ इंडिया :
या जातीच्या कोबींचा आकार मोठा आणि वजन सुद्धा जास्त असते. कोबीच्या एका गड्डयाचे वजन सरासरी दीड ते दोन किलो पर्यंत मिळते . ही जात लवकर परिपक्व होते आणि काढण्यासाठी तयार होते.
उशिरा तयार होणाऱ्या जाती (गरव्या जाती):
1. पुसा ड्रम हेड :
या जातीच्या कोबीची पाने फिकट हिरव्या रंगाची असतात आणि गड्ड्याचे वजन तीन ते पाच किलो पर्यंत असते .गड्डा चपटा आणि सैल असतो. लागवड केल्यानंतर साधारणपणे 75 ते 80 दिवसांमध्ये कोबी काढण्यासाठी तयार होतो .कोबीची ही जात सड रोगासाठी प्रतिकारक्षम आहे.
2. लेट लार्ज ड्रमहेड :
लागवड केल्यानंतर सर्वसाधारणपणे 110 ते 115 दिवसांमध्ये हे पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीच्या कोबीचे गड्डे मोठे आणि वजनाला जास्त असतात .हे गड्डे चपटे असून थोडे सैल असतात.
3. सप्टेंबर :
लागवड केल्यानंतर सर्वसाधारणपणे 105 ते 110 दिवसांमध्ये या कोबीचे गड्डे काढण्यासाठी तयार होतात .या जातीच्या रोपांची पाने निळसर हिरव्या रंगाची असून गड्डे लंबागोलाकर असतात . गड्ड्याचे सरासरी वजन चार ते सहा किलो पर्यंत असते.
लागवड :
पान कोबीची लागवड ही शक्यतो हिवाळ्यामध्ये केली जाते.
पण काही जातींची लागवड आपण खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा तिने हंगामांमध्ये करू शकतो.
लागवड करण्यासाठी कोबीचे रोपे तयार करणे गरजेचे असते.
त्यासाठी सर्वप्रथम गादीवाफे तयार करावे. कोबीचे बी बारा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर रेषा ओढून पातळ पेरावे आणि हाताच्या साह्याने मातीने झाकून द्यावे.
एक हेक्टर कोबी लागवडीसाठी 600 ते 750 ग्रॅम बी पुरेसे होते.
पेरणी केल्यानंतर लगेच पाणी द्यावे. पेरणी झाल्यानंतर चार ते पाच आठवडे नंतर रोपे स्थलांतर करण्यासाठी तयार होतात.
रोपांची काढणी करताना रोपांना पाणी द्यावे. जेणेकरून रोपे तुटणार नाहीत आणि व्यवस्थित बाहेर निघतील.
कोबीच्या लागवडीसाठी सर्वप्रथम खोल नांगरट करावी आणि सर्व ढेकळे फोडून घ्यावे.
कोळप्याच्या पाळ्या मारताना शेणखत किंवा घन जीवामृत मिसळून घ्यावे.
कोबीची लागवड सरी वरंबा किंवा सपाट वाफेवर केली जाते.
कोबीच्या रोपांची लागवड 45 × 30 सेंटिमीटर या अंतरावर केली जाते.
गड्ड्याणा आकार लहान असल्यास गड्डांना जास्त मागणी असते.
लागवड दाट केल्यामुळे झाडांची संख्या जास्त असते, त्यामुळे उत्पन्न जास्त निघते. लागवड केल्यानंतर लगेच पाणी द्यावे.
खत व्यवस्थापन आणि पाणी नियोजन :
जमीन तयार करण्यासाठी जमिनीमध्ये शेणखत किंवा घन जीवामृत मिसळून घ्यावे.
ठिबक सिंचनाचा वापर केल्यास आठवड्यातून एकदा कोबीला जीवामृत सोडावे.
जीवामृत सोडल्यामुळे जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांची संख्या वाढते, त्यामुळे जमीन सुपीक बनते आणि उत्पन्नही चांगले मिळते.
कोबीची मुळे हे उथळ असतात, त्यामुळे कमी अंतराने पाणी द्यावे लागते.
हिवाळ्यामध्ये पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
लागवड केल्यानंतर पाण्याचा ताण पडून देऊ नये, जर पाण्याचा ताण पडला आणि आपण लगेच पाणी दिले तर गड्डे तडकण्याची शक्यता असते.
त्यामुळे योग्य नियोजन करून कोबीला पाणीपुरवठा करावा.
ठिबक सिंचन केल्याने पाण्याची बचत होते आणि जीवामृत सोडण्यासाठी सुद्धा ठिबक सिंचनाचा वापर चांगला होतो.
आंतरमशागत :
कोबीची लागवड केल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर पहिली खुरपणी करावी.
खुरपणी करताना मुळांना इजा होणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.
खुरपणी करताना कोबीच्या रोपांना मातीची भर द्यावी आणि खालच्या बाजूला पिवळी झालेली पाने खुरप्याच्या सहाय्याने कापून टाकावे.
जेणेकरून रोपांवर घाण्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.
महत्वाच्या किडी आणि रोग :
किडी
1.रंगीत ठिपक्यांचे ढिंकून :
या किडीमुळे कोबीची पाने पिवळी पडतात कारण, हे ढेकूण मोठ्या प्रमाणावर पानातून रस शोषून घेतात. ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांमध्ये हे किडे क्रियाशील असतात .या किडींवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी कोबीवर करावी.
2. मावा :
कोबी वर मावा या किडीचा मोठा उपद्रव होतो. मावा ही कीड मोठ्या प्रमाणात पानातील सर्व रस शोषून घेते आणि त्यावेळी स्वतःच्या शरीरामधून एक चिकट गोड पदार्थ स्त्रवते. त्या पदार्थावर काळी बुरशी आकर्षित होते आणि पूर्ण गडावर ती काळी बुरशी पसरते. त्यामुळे बाजारामध्ये कोबीला चांगला दर मिळत नाही आणि उत्पादनामध्ये सुद्धा घट होते .या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा.
3. कोबी पोखरणारी अळी :
या अळीचा प्रादुर्भाव या आळीचा प्रादुर्भाव सूर्यास्तानंतर दिसून येतो. ही अळी गड्ड्यांना छिद्र पाडते आणि त्यामध्ये राहते .गड्डे तयार व्हायला लागल्यानंतर ही अळी शेतामध्ये दिसायला सुरुवात होते. त्यामुळे गड्यांची प्रत ढासळते आणि गड्डा आतून पोकळ होतो. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.
रोग :
1. करपा रोग :
हा रोग अल्टरणाऱ्या ब्रेसीकीकोला या कवकामुळे पसरतो .या कवकाचे बीजाने रोगट पानांमध्ये मध्ये असतात. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कोबीच्या पानावर काळ्या रंगाचे ठिपके पडलेले दिसतात . वेळेनुसार हे ठिपके मोठे झाल्यानंतर वर्तुळाकार होतात .जेव्हा आपण गड्डे साठवतो तेव्हा या रोगामुळे गड्डे काळे पडतात .या रोगाचा प्रसार हवेतून होतो.
2. मुळावरील गाठी :
या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कोबीच्या मुळांना वाटोळ्या व लांबट गाठी दिसतात. पाने कमजोर होऊन शेवटी झाड मरते .या रोगापासून नियंत्रण करण्यासाठी शेतामध्ये पिकांचे फेरपालट करावे आणि जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी. रोपांच्या मुळा बुरशीनाशकांमधून बुडवून शेतामध्ये लावाव्या.
काढणी आणि उत्पादन :
कोबीची काढणी ही हंगाम आणि जातींवर अवलंबून असते.
कोबीचा गड्डा पूर्ण पक्व झाल्यानंतर तो बोटाने दाबला तरी दाबत नाही.
अशा कोबींची काढणी करावी .गड्ड्यांचा आकार हा जातीनुसार वेगवेगळ्या असतो.
काढणी वेळेवर नाही झाली तर गड्डा तडकण्याची संभावना असते.
गड्डा काढल्यानंतर धारदार चाकूने किंवा विळीने बाहेरचे तीन ते चार पाने कापून टाकावे आणि गड्ड्याचा आकार, घट्टपणा आणि वजनानुसार गडाची प्रतवारी करावी.
विक्रीसाठी बाजारामध्ये पाठवावे. कोबीचे उत्पन्न जातीनुसार वेगवेगळे येते.
सरासरी कोबीचे प्रती हेक्टर 25 ते 30 टन पर्यंत उत्पादन मिळते.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi