फुलकोबी लागवड:
हे कमी जागेमध्ये जास्त उत्पादन देणारे पीक आहे. महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुलकोबीची लागवड केली जाते. फुलकोबीला फ्लॉवर असेही म्हणले जाते. फुल कोबीमध्ये प्रथिने, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, लोह आणि चुना ही इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणामध्ये आढळतात .फुल कोबी मध्ये जीवनसत्वे असतात. फुल कोबी मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो खाल्ल्याने मधुमेह, हृदयरोग अशा विविध आजारांचा धोका शरीरासाठी कमी होतो. फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनामध्ये उपयोग होतो. कोबीमध्ये जास्त प्रमाणामध्ये विटामिन सी असल्यामुळे शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोलीन नावाचा घटक कोबीमध्ये असतो जो मज्जा संस्थेच्या कार्यामध्ये आणि चयापचय प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे स्थान बजावतो. फ्लॉवर मध्ये कोलिन मिळते फ्लॉवर खाल्ल्याने पुरेशा प्रमाणामध्ये कोलिन शरीराला मिळते. फ्लावर मध्ये कमी प्रमाणामध्ये कॅलरीज असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा फ्लॉवर उपयोगी ठरते .फ्लॉवर मध्ये विटामिन के चे प्रमाण जास्त असते .त्यामुळे कॅल्शियमची पातळी नियंत्रित करणे, रक्त गोठणे हे सर्व कार्य शरीरातील चांगले राहते. फ्लावरच्या पानांचा उपयोग जनावरांच्या खाद्यासाठी केला जातो.
लागणारी जमीन :
फुल कोबीची लागवड ही वेगवेगळ्या जमिनीमध्ये होऊ शकते. चांगले उत्पन्न घेण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थ पूर्ण असणारी, जमीन योग्य ठरते. उशिरा येणार जातींसाठी लागवड भारी जमिनीमध्ये करावे आणि लवकर येणाऱ्या मातींची लागवड हलक्या व मध्यम जमिनीमध्ये करावी. चांगले उत्पन्न घेण्यासाठी जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 पर्यंत असावा.
लागणारे हवामान :
कोबीच्या लागवडीसाठी थंड आणि कोरडे हवामान उपयोगी असते. कोबीचे पीक तापमाना साठी खूप संवेदनशील पीक आहे. हवामानामध्ये थंड आणि आद्रतेचे प्रमाण पिकाला चांगले प्रतिसाद करते .तापमान मध्ये वाढ झाल्यानंतर गड्ड्यांची वाढ चांगली होत नाही .उष्ण आणि कोरडे हवामानामध्ये गड्डे घट्ट आणि लहान तयार होतात .जास्त कमी तापमानामध्ये गड्डे उशिरा तयार होतात .15 ते 25 अंश सेल्सिअस मध्ये कोबीची वाढ उत्तम होते . वेगवेगळ्या तापमानामध्ये येणाऱ्या फुलकोबीच्या ठराविक जातींची निवड करणे शेतकऱ्याला महत्त्वाचे आहे.
सुधारित जाती :
1. सुहासिनी :
या जातीची लागवड रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते .लागवड केल्यानंतर 65 ते 70 दिवसांमध्ये पिक काढायला तयार होते. गड्ड्याचे वजन साधारणपणे दीड ते अडीच किलो पर्यंत असते आणि गड्डा घट्ट असतो गड्डा पानांनी झाकलेला असतो.
2. किमया :
या जातीची लागवड खरीप आणि उन्हाळी दोन्ही हंगामामध्ये केली जाते. या जातीच्या गड्डयचा आकार साधारणपणे एक किलोचा असून गड्डा मोठा आणि गोलाकार असतो. लागवड केल्यानंतर 65 ते 70 दिवसांमध्ये पिक काढण्यासाठी तयार होते.
3. रेगाल व्हाईट :
या जातीची लागवड रब्बी हंगामामध्ये केली जाते. लागवड केल्यानंतर 75 ते 80 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. गड्ड्याचा रंग पांढरा शुभ्र असून पाणी हिरवी आणि पूर्णपणे गडाला झाकून ठेवतात.
4. पुसा स्नोबॉल 1 :
या जातीचे सरासरी उत्पादन 90 क्विंटल पर्यंत मिळते. लागवड केल्यानंतर 100 ते 120 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. गड्ड्याचा रंग स्नो व्हाईट असतो. गड्डा घट्ट आणि मध्यम आकाराचा असतो.
5. पंत शुभ्रा :
सरासरी उत्पन्न 80 क्विंटल एकरी मिळते. या जातीची लागवड उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. बाकी जातींच्या तुलनेमध्ये ही जात लवकर परिपक्व होते. गड्डा शुभ्र पांढरा रंगाचा असतो.
6. पुसा दिपाली :
फुल कोबीची ही जात आय .ए .आर .आय दिल्ली येथे विकसित केलेली आहे. ही जात उत्तर भारत या विभागासाठी लागवडीसाठी योग्य मानली जाते. या जातीचे सरासरी उत्पन्न 48 क्विंटल पर्यंत मिळते आणि काढण्यासाठी लवकर तयार होणारी जात आहे.
7. अर्ली कुंवरी :
ही जात पंजाब हरियाणा आणि दिल्ली या विभागांमध्ये लागवडीसाठी योग्य मानले जाते. या जातीचे सरासरी उत्पन्न 32 क्विंटल एकरी पर्यंत मिळते लवकर पक्व होणारी जात आहे.
8. स्लोबॉल 16 :
जातीची सरासरी उत्पन्न शंभर ते 125 क्विंटल एकरी पर्यंत मिळते. ही जात काढण्यासाठी उशिरा तयार होते . गड्ड्याचा रंग आकर्षक असतो आणि गड्डा घट्ट असतो.
लागवड :
कोबी लागवडीसाठी निवडलेली जमीन खोल नांगरून घ्यावी आणि कोळप्याच्या सहाय्याने दोन ते तीन कोळप्याच्या पाळ्या माराव्या. रोपे तयार करण्यासाठी बी पेरणी करावी लागते. गादीवाफा तयार केल्यानंतर बारा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर बियाणे बियाणे पातळ पेरावे. पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे. उशिरा येणाऱ्या जातींसाठी 350 ते 400 ग्राम आणि लवकर येणाऱ्या जातींसाठी 600 ते 750 ग्राम प्रती हेक्टर बियाणे लागते. गादीवाफ्यावर बियाणे पेरल्यानंतर चार ते पाच आठवड्यांमध्ये रोपे लागवडीसाठी तयार होतात. कोबीची लागवड सरी वरंबा किंवा सपाट वाफेवर केली जाते. रूपांची लागवड 45 ×45 किंवा 60× 25 सेंटीमीटर अंतरावर जमिनीवर केली जाते .
खत आणि पाणी व्यवस्थापन :
जमीन तयार करत असताना 20 टन शेणखत हेक्टरी शेतामध्ये घालावे.
घन जीवामृत सुद्धा टाकावे. वेळोवेळी ठिबक सिंचनाच्या मदतीने जीवामृत सोडावे.
आठवड्यातून एक वेळा जीवामृताची आळवणी करावी. फुलकोबीच्या पिकासाठी जमिनीच्या मगदूराप्रमाणे पाणी सोडावे.
रब्बी हंगामामध्ये आठ ते दहा दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चार ते सहा दिवसांच्या अंतराने फुलकोबीला पाणी द्यावे.
ठिबक सिंचन केल्याने 40 टक्के पाण्याची बचत होते आणि खते द्यायला सुद्धा सोयस्कर ठरते.
आंतरमशागत :
फुलकोबी मध्ये खोल मशागत केली जात नाही. लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांच्या अंतराने हलकी खुरपणी करावी.
खुरपणी करताना मुळांना इजा होणार नाही. याची पूर्णपणे काळजी घ्यावी रोपांना मातीची भर घालावी.
ब्लांचींग :
ब्लांचिंग ही गड्ड्यावर प्रत्यक्ष सूर्यप्रकाश पडू नये म्हणून केली जाते.
गडाच्या बाहेरील पाने रबरच्या साह्याने गड्ड्यावर झाकली जातात.
प्रत्येक दिवशी नवीन वेगवेगळ्या रंगाचे रबर बँड वापरले जातात.
त्यामुळे अगोदर बांधलेले गड्डे व्यवस्थित ओळखता येतात.
गड्डे एकदा पक्व झाले की त्यावर ब्लांचिंग करावे.
त्यामुळे गड्डे आकर्षक पांढरे व दुधाळ राहतात आणि अशा गड्ड्याना बाजारामध्ये चांगला भाव मिळतो.
महत्त्वाच्या किडी आणि रोग :
1. डायमंड बॅक मोथ :
कोबी पिकामधील सर्वात नुकसान करणारी कीड आहे. या किडीचे प्रौढ कोबीच्या पानाच्या खाली अंडी घालतात.
पोषक वातावरण मिळल्यामुळे अंडी फुटतात आणि त्यातून हिरव्या रंगाच्या आळ्या बाहेर पडतात.
आळ्या अंड्यातून बाहेर पडल्या पडल्या कोबीच्या पानांना खायला सुरुवात करतात आणि छिद्र पाडतात.
वेळेवर नियंत्रण झाल्यानंतर उत्पादनामध्ये घट येते आणि 80 ते 90 टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते.
या किडी चे नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
एकरी दहा कामगंध सापळे लावावे आणि जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.
2. मावा :
कोबी वरील ही एक रस शोषक कीड आहे. या किडीचे प्रौढ आणि पिले दोन्हीही पिकाला नुकसान करतात.
किडे मोठ्या प्रमाणामध्ये पानातून रस शोषतात मावा ही कीड शरीरामधून चिकट आणि गोड पदार्थ स्त्रवते. त्या पदार्थाला काळी बुरशी आकर्षित होते आणि पूर्ण पानावर पसरते.
त्यामुळे प्रकाश संश्लेषण ची क्रिया मंदावते आणि उत्पादनामध्ये घट होते.या किडीचे नियोजन करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि चिकट सापळ्यांचा वापर शेतामध्ये करावा एकरी 20 ते 22 चिकट सापळे लावावे.
3. कटवर्म :
लागवड केल्यानंतर ही अळी रोपांना खालून कट करते .त्यामुळे या आळीला कटवर्म असे म्हणले जाते. रोप कट केल्यामुळे रोपांची संख्या राखता येत नाही .त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते .या किडी चे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.
4. तंबाखू आळी :
ही कीड कोबीचे कोवळी पाणी खाऊन टाकते. त्यामुळे पाने पांढरी पडतात आणि प्रकाश संश्लेषण ची क्रिया मंदावते. त्यामुळे अन्नपुरवठा कमी होतो. परिणामी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते .या किडीचे नियंत्रण करण्यासाठी पंधरा दिवसाच्या अंतराने कीटकनाशकाची फवारणी घ्यावी.
रोग :
1. घाण्या किंवा ब्लॅक रॉट :
कोबी वर्गीय सर्व पिकांमध्ये हा रोग घातक आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर इंग्रजीमधील V आकाराचे ठिपके आलेले दिसते.
प्रादुर्भाव झाल्यानंतर पान पिवळे पडते आणि हळूहळू ठिपके झाडावर सगळीकडे पसरू लागतात.
रोपांच्या अन्नद्रव्य वाहिन्यांमध्ये या जिवाणूंची वाढ होते आणि त्यामुळे पाणी खोड आणि मुळे काळे पडतात.
रोगग्रस्त होऊन झाडे शेवटी सडतात. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी घ्यावी.
2. करपा /पानावर येणारे ठिपके :
कोबीच्या पानावर लहान आकाराचे ठिपके पडतात .सुरुवातीच्या काळामध्ये हे ठिपके पिवळे करड्या रंगाचे असतात.
वेळेनुसार हे ठिपके मोठे होतात आणि रंगाने काळे पडतात. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी पंधरा दिवसांच्या अंतराने जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.
3. डावणी मिल्ड्यू :
या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानाच्या खालच्या बाजूला जांभळे तपकिरी ठिपके पडतात आणि राखाडी पांढरा थर पानावर दिसतो .पान गळून पडते या रोगावर नियंत्रण करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.
काढणी आणि उत्पादन :
पांढरा शुभ्र , घट्ट आणि पूर्णपणे तयार झालेल्या गड्ड्याची काढणी सुरुवातीला करावी.
गड्ड्यांच्या काढणी तीन ते चार पाने गड्डा सोबत ठेवून करावे .त्यामुळे वाहतुकीमध्ये होणारे नुकसान होत नाही. गड्डे तसेच राहतात.
फुलकोबीच्या जातीनुसार उत्पादनामध्ये बदल होत राहतो .सरासरी फुल कोबीचे उत्पादन 20 ते 25 टन पर्यंत मिळते.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi