Blogभाजीपाला

नैसर्गिक शेवगा लागवड तंत्रज्ञान :

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र मध्ये शेवगा लागवड क्षेत्र हळूहळू वाढत आहे. व्यापारी दृष्ट्या शेवग्याची लागवड करण्यात येते. मोठ्या फळबागेमध्ये शेवग्याचे झाड हे आंतरपीक म्हणून घेण्याचे प्रमाण जास्त असते. शेवग्याच्या पानांची भाजी केली जाते व फुलांची कोशिंबीर करतात. शेवग्याच्या शेंगांमध्ये अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. शेवग्याच्या वाळलेल्या बियांपासून तेल काढतात व त्याचे बेन ऑईल बनवतात .ज्याला घड्याळ दुरुस्त करण्यासाठी वापरतात. शेवग्याच्या पानांची पावडर करून सुद्धा औषध बनवण्यासाठी वापरली जाते. अस्थमा, मधुमेह या रोगासाठी औषध बनवण्यासाठी शेवग्याचा पानांचा वापर केला जातो. शेवग्याच्या पानांमध्ये उच्च रक्तदाब नियंत्रण करण्याचे गुणधर्म असतात . या पिकाचे आयुष्य सुमारे दहा ते बारा वर्षे असते या वर्षांमध्ये शेतकऱ्यांना फायदा होत राहतो. तसेच वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगेचं उपयोग केला जातो शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने संधिवात , नेत्ररोग कफ आणि पचन क्रिया यासारख्या व्याधींना दूर करते शरीर कमजोर असेल तर दररोज शेवग्याची शेंगा आहारात घ्याव्यात.

लागणारे हवामान :

२५ अंश ते ३० अंश सेल्सिअस तापमान शेवग्याला जास्त मानवते. हे पीक सर्व प्रकारच्या हवामानात येते उत्तम वाढीसाठी सम आणि दमट हवामान असावे. कमी पावसात सुद्धा याची लागवड चांगले ठरते. सम व दमट हवामानात या पिकाची वाढ चांगली होते.

लागणारी जमीन:

माळरानाला व डोंगराच्या उताराच्या जमिनीला शेवग्याची लागवड योग्य ठरते. जमिनीचा सामू ६-७.५ पर्यंत असावा. सेंद्रिय कर्ब जास्त असल्यास उत्पन्न जास्त मिळते. निचरा न होणाऱ्या भारीजमिनीत शेवग्याची लागवड करू नये जमिनीत पाण्यामुळे झाडांची मुळे कुजू लागतात आणि झाडे मरण पावतात जमीन भुसभुशीत सेंद्रिय पदार्थ असलेली निवडावी शेवग्याची लागवड महाराष्ट्र मध्ये सर्व विभागात करता येते.

शेवग्याच्या सुधारित जाती:

१.जाफना : ही शेवग्याचा स्थानिक जात आहे .या शेंगा चवीला असतात या वाणाला वर्षातून एकदाच मार्च अमीनएप्रिल मध्ये शेंगा येतात .या वाणाला देशी शेवगा म्हणून ओळखले जाते. याची लांबी 20 ते 30 सेंटीमीटर असते.

२.कोकण रुचिरा : शेवग्याची ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. कोकण या भागामध्ये कोकण रुचिरा या शेवग्याच्या जातीची शिफारस विद्यापीठाने केलेली आहे .या जातीच्या शेंगा गर्द हिरव्या रंगाच्या असतात. शेंगांची लांबी ही दीड ते दोन फूट असते. शेंगांचा आकार त्रिकोणी असतो. या झाडाची उंची पाच ते सहा मीटर असते.

३.पी. के .एम-१ : शेवग्याची ही जात तमिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे.रोप लावल्यानंतर सहा महिन्यात शेंगा यायला सुरुवात होते .या शेंगा लवकर येतात आणि चवदार असतात .शेंगांची लांबी दोन ते अडीच फूट लांब असते .शेंगांचा रंग हा पोपटी असतो याचा गर चविष्ट असतो. महाराष्ट्र मधील वातावरणामध्ये या शेंगांचे दोन वेळा उत्पन्न मिळते. झाडाची उंची साधारण साडेचार ते पाच मीटर उंच असते.

४. पी. के. एम -२: तमिळनाडू कृषी विद्यापीठाने पी के एम 2 ही शेवग्याची जात विकसित केलेली आहे. ही जात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन देणारी आहे. या जातीच्या शेंगा रुचकर आणि स्वादिष्ट असतात. या शेंगा लांब आणि वजनदार असतात. त्यामुळे यांना बाजारात चांगला भाव मिळतो निर्यातीसाठी सुद्धा या जात्याच्या शेंगा वापरल्या जाते.

५. रोहित -१: शेवग्याची ही जात सुद्धा निर्यातीसाठी वापरली जाते. लागवड केल्यापासून सहा महिन्यात या जातीचे उत्पन्न सुरू होते ,या फळा शेंगांचा रंग गर्द हिरवा असून चव थोडी गोडसर असते .वर्षाभरात एका झाडापासून सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस किलो शेंगांचे उत्पन्न मिळते. या जातीच्या झाडांची उत्पादन क्षमता सात ते आठ वर्षाची असते.

शेवग्याची लागवड :

शेवग्याच्या लागवडीसाठी उन्हाळ्यात खड्डे काढून घ्यावे आणि त्या खड्ड्यांमध्ये शेणखत किंव्हा घन जीवामृत भरून घ्यावे.रोपांची लागवड करताना खड्ड्यांमध्ये ४×४ किंव्हा ५×५ मीटर अंतर ठेवावे. जर आपण बुटकी जात लावणार असून तर त्यांचा अंतर २.५ ×२.५ ते ३×३ मीटर ठेवावे .जून ते जुलै महिन्यात लागवड करावी. आपण शेवग्याच्या रोपांची सुद्धा लागवड करू शकतो.

खत आणि पाणीपुरवठा :

शेवग्याला दरवर्षी घन जीवामृत घालावे आणि प्रत्येक महिन्याला जीवामृत द्यावे. शेवग्याच्या झाडाला सुरुवातीच्या काळात पाणी द्यावे. झाडाची शाकीय वाढ झाल्यानंतर पाणी नाही दिले तरी चालते. परंतु जर पाण्याचे व्यवस्थापन बरोबर केलं तर उत्पादनात वाढ होते. घन जीवामृत हे झाडाला आहे करावे आणि मग त्या आळ्यांमध्ये घन जीवामृत टाकावे आणि त्याच अळ्यांमध्ये जीवामृत दर महिन्याला थोडे थोडे ओतावे. ही खते नैसर्गिक असल्यामुळे याचा जमिनीवर कोणताही प्रादुर्भाव होत नाही आणि जमिनीतील सूक्ष्म जीवांची संख्या वाढते. सूक्ष्मजीवांची संख्या जास्त असल्यामुळे जमीन सुपीक बनते आणि आपल्या उत्पादनात वाढ होते.

शेवग्याची छाटणी:

शेवगा हे खूप झपाट्याने वाढणारे पीक आहे .झाड सरळ वाढू नये म्हणून त्याला आकार देणे खूप गरजेचे आहे .जेणेकरून शेंगा काढायला आपल्याला अडचण होणार नाही. लागवड नंतर दोन ते अडीच महिने नंतर मुख्य खोड तीन ते चार फूट झाल्यानंतर आपल्याला पहिली छाटणी करणे गरजेचे असते. १मीटर अंतरावर खोड छाटावे .खोडावर चारी बाजूला चारी दिशांनी फांद्या वाढू द्यावेत .त्यामुळे झाडाची उंची ही कमी राहील .त्यानंतर तीन ते चार महिन्यांनी चारही फांद्या मुख्य खोडापासून एका मीटर अंतरावर परत छाटाव्या .त्यामुळे झाडाला गोलाकार आकार येण्यास मदत होईल . झाडाचे उंची कमी राहील जेणेकरून शेंगा काढणे आपल्याला सोपे जाईल. त्यानंतर एप्रिल ते मे महिन्यानंतर शेंगा काढल्यानंतर दरवेळी छाटणी करावी. जेणेकरून आपल्याला शेवग्याचे नियमित उत्पादन भेटत राहील.

आंतर मशागत आणि अंतर पिके :

त्याच्या बुडक्यातील गवत वेळोवेळी खुरपणी करून काढून घ्यावे. लहान कालावधीची पिके आपण आंतर पिके म्हणून घेऊ शकतो.भाजीपाला घेणे योग्य ठरते. द्विदल पिकांना आंतरपीक म्हणून घेणे खूप फायद्याचे ठरते कारण त्यांच्या मुलांना असलेल्या गाठी हवेतील नायट्रोजन घेऊन जमिनीत फिक्स करतात त्यामुळे जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण वाढते. सुरुवातीच्या काळामध्ये आंतरपीक घेतल्यामुळे आपोआप जमिनीची मशागत होते परंतु झाडांची पुरेपूर वाढ झाल्यानंतर अधून मधून चांगली नांगरट करावी आणि त्यांना काढून टाकावे.

काढणी आणि उत्पादन :

शेवग्याच्या कलमांना पहिल्या वर्षी पासूनच शेंगा येण्यास सुरुवात होते. शेंगांचा रंग हिरवा असतो. रोपांना दुसऱ्या वर्षीपासून शेंगा यायला सुरुवात होते आणि बुटक्या जातींना सहा महिन्याने शेंगा येतात. लागवडीनंतर साधारणतः आठ ते दहा महिन्यांनी शेंगा काढण्यासाठी तयार होतात. पूर्ण वाढलेल्या कोवळ्या शेंगा झाडावरून तोडून त्याची गड्डी बांधून विक्रीस पाठवावे. पूर्णपणे वाढ झालेल्या शेवग्याच्या प्रत्येक झाडापासून दरवर्षी २५ ते ५० किलो शेंगा मिळतात. काढणी करताना शेंगा तुटणार नाही याची काळजी घ्यावी ज्या शेंगांची आम्ही जास्त असते त्या शेंगा तुटण्याची शक्यता जास्त असते आणि तशा शेंगांना बाजारात चांगला भाव भेटत नाही.

रोग आणि कीड व्यवस्थापन:

शेवग्यावरील किडी :

पाने गुंडाळणारी अळी : ही आळी शेवग्याची पाने गुंडाळून त्यावर उपजीविका करते .त्यामुळे उत्पादनात घट होते. पानांची आणि फुलांची मोठ्या प्रमाणात गळ होते. याच्या नियंत्रणासाठी झाडाच्या भोवती नांगरट करावी आणि प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.

फांद्या व खोड पोखरणारी अळी : ज्या झाडाच्या बुंध्याजवळ लाकडाचा भुसा दिसून येतो .त्या ठिकाणी या अळीचा प्रादुर्भाव असतो . ही आळी शेवग्याच्या झाडाचे खोड पोखरून आत शिरते .त्यामुळे झाड खूप प्रमाणात कमकुवत बनते आणि त्यामुळे उत्पादनात घट होते .प्रादुर्भाव जास्त असल्यास झाड मरते या किडीचे नियंत्रणासाठी नुकसान झालेल्या फांद्या छाटून टाकाव्यात आणि त्या पूर्णपणे नष्ट कराव्या.

शेवग्यावरील रोग :

शेवगा कँकर,: पावसाळ्याच्या दिवसात या रोगाचा प्रादुर्भाव शेवग्याच्या झाडावर जास्त दिसून येतो. पावसाच्या दिवसात पिकाची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे . प्रादुर्भाव जास्त वाढल्यास झाड मारण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीच्या वेळेस लक्षणे दिसून आल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करावी.

उपाय योजना :

शेवग्यावर कीड आढळल्यास दशपर्णी अर्क ,ब्रह्मास्त्र किंवा अग्निअस्त्र याची फवारणी घ्यावी आणि कोणतीही बुरशी जन्य रोग चे लक्षण आढळल्यावर जीवामृत किंवा आंबट ताकाची फवारणी घ्यावी. पिकावर फवारणी ही सकाळी दहापर्यंत आणि दुपारी चार नंतरच करावे.

शेवग्याचे इतर उत्पादने:

१. शेवग्याच्या पानांची पावडर :

पाणी झाडावरून काढून स्वच्छ धुऊन घ्यावेत त्यानंतर पाणी स्वच्छ पुसून दोन ते तीन दिवस सावलीत वाळून द्यावी उन्हामुळे उन्हामध्ये वाळवू नये वाळलेल्या पानांची पावडर तयार करावी साधारण 50 किलो शेवग्याच्या पाल्यापासून १२ ते १५ किलो पावडर मिळते. पावडर ठेवण्यासाठी सुकलेल्या काचेच्या बाटली चा वापर करावा.

२.शेवग्याच्या पानाची कॅप्सूल :

शेवग्याची सर्वप्रथम पावडर तयार करून घेतात आणि जिलेटिन पासून तयार केला रिकामे कॅप्सूल मध्ये त्याच्या पानांची पावडर भरून कॅप्सूल तयार करतात.

३.शेवग्याच्या बियांची पावडर :

सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगांमधून बिया काढाव्यात आणि त्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे उकळून घ्याव्यात पाण्यात उकळल्यानंतर त्याच्यावरचा पारदर्शक भाग काढावा आणि सूर्यप्रकाशात बिया वाळवून घ्याव्यात वाळवून घेतल्यानंतर बियांची पावडर करावी शेवग्याच्या बियांमध्ये विविध प्रकारचे पोषक तत्त्व असतात त्याचा उपयोग सीजनिंग मध्ये आणि सॉसेस मध्ये केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *