आले लागवड
आल्याची लागवड ही जगभरामध्ये केली जाते .भारत ,वेस्टइंडीज ,चीन व आफ्रिकेत आल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्र मध्ये लातूर, रायगड, नांदेड, सांगली, सातारा, औरंगाबाद, ठाणे या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने लागवड झालेली दिसते. आले हे मसाला पीक म्हणून उपयोगामध्ये आणले जाते. आल्याचा उपयोग स्वयंपाक काळात पदार्थाची चव वाढवण्यासाठी केला जातो. आल्याचा उपयोग औषधी वनस्पती म्हणून देखील होतो. यामध्ये जिंजर ऑइल हा घटक असतो. त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात त्याचा उपयोग सर्दी, खोकल्यावरील औषध बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. आल्यामधील फिनोलिक या घटकामुळे अपचन, दाह व पित्त कमी होण्यास मदत होते.
आल्यामुळे भूक वाढते. आल्याचा वापर काढा बनवण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. आले हे मळमळ कमी करण्यासाठी देखील वापरले जाते. मॉर्निंग सिकनेस म्हणजेच सकाळी उठल्या उठल्या अशक्तपणा येणे यावर नैसर्गिक उपाय म्हणून देखील आल्याच्या डिंकाचा वापर केला जातो. रिकाम्या पोटी आले खाल्ल्यामुळे पचन सुधारण्यासाठी मदत होते आणि आले वजन कमी करण्यास देखील सुद्धा मदत करते आले खाल्ल्यामुळे जास्त कॅलरीज जळतात त्यामुळे वजन हळूहळू कमी होते आणि आले खाल्ल्यामुळे कमी भूक लागते त्यामुळे देखील सतत खाण्याच्या सवयी पासून लांब राहण्यास मदत होते त्यामूळे वजन आपोआप आटोक्यामध्ये येते. अळ्याचा वापर हा चहा मध्ये जेवणामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.
ज्या लोकांना गॅस चा त्रास असतो, अशा लोकांना आले आहारात घेणे चांगले ठरते. संधिवातामध्ये सुद्धा वेदना कमी करण्याचे काम आले करते आल्याला पारंपारिक पेन किलर देखील आपण म्हणू शकतो. आले हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी देखील सुद्धा भरपूर फायदा देतो. शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगले होण्यासाठी सुद्धा आले मदत करते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्यापासून आपण वाचू शकतो. आल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. आल्याला सुकवून त्याच्यापासून सुंठ पावडर बनवली जाते. सुंठ पावडरला मसाला मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते त्याचा उपयोग गोड पदार्थ बनवण्यासाठी जास्त केला जातो. बाजारामध्ये आल्याला भरपूर मागणी असते. त्यामुळे आले हे पीक घेणे शेतकऱ्यांसाठी कायम नफ्याचे ठरते.
लागणारी जमीन :
आल्याची लागवड करण्यासाठी चांगली भुसभुशीत जमीन निवडावी ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होतो, सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणामध्ये असतात.
अशा जमिनींमध्ये आल्याची लागवड उत्तम ठरते. क्षार असलेले जमिनीमध्ये आल्याची लागवड करू नये.
हलक्या प्रकारच्या जमिनींमध्ये शेणखत आणि कंपोस्ट खताचा योग्य वापर केल्यावर आपण तशा जमिनीमध्ये सुद्धा आल्याचे चांगले उत्पन्न घेऊ शकतो.
आल्याची लागवड करण्यासाठी जमिनीचा सामू 6.5 ते 7 च्या दरम्यान असल्यास उत्पन्न चांगले मिळते.
लागणारे हवामान :
आले हे उष्ण कटिबंधातील पीक आहे. याच्या वाढी साठी दमट आणि उष्ण हवामान योग्य असते.
या पिकला जेवढी सावली असेल तेवढे हे पीक चांगले वाढते.या पिकाला पाण्याची भरपूर आवश्यकता असते.
सरासरी 30 ते 35 अंश सेल्सिअस या तापमानामध्ये आल्याची उगवण चांगली होते आणि वाढीच्या काळामध्ये 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असल्यावर योग्य असते.
आल्याला वार्षिक 150 ते 380 सेमी पर्जन्यमान लागते.
पूर्व मशागत :
आल्याची लागवड करण्यासाठी सर्वप्रथम नांगराने जमीन 15 ते 20 सेंटिमीटर खोल नांगरावे.
ढेकळे फोडून घ्यावे आणि आडवी नांगरट करून घ्यावी. त्याच्या दोन उभ्या आडव्या पाळ्या मारून जमीन सपाट आणि भुसभुशीत करून घ्यावी.
कुळवाच्या शेवटच्या पाळीच्या वेळी जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत टाकून घ्यावे.
उन्हामध्ये चांगली तापून द्या जेणेकरून मातीमध्ये असलेल्या किडींचा व रोगांचा नाश आल्याची लागवड ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते.
आल्याची लागवड सपाट वाफे, सरी वरंबा किंवा रुंद वरंबे यावर केली जाते.
सुधारीत जाती :
1.महिमा :
आल्याच्या ह्या जातीचे हेक्टरी 23 टन पर्यंत उत्पन्न मिळते . या जातीच्या आल्याला सरासरी 12 ते 13 फुटवे असतात. पिकाचा कालावधी 200 दिवसांपर्यंत असून ही जात सूत्रकृमी याला प्रतिकारक आहे. सुंठ्याचे प्रमाण 19% पर्यंत मिळते.
2.रिजाथा :
आल्याच्या ह्या जातीमध्ये फुटव्याचे प्रमाण सरासरी आठ ते नऊ असून सुगंधी द्रव्याचे प्रमाण 2.3% आहे. पिकाचा कालावधी 200 दिवस असून तंतुचे प्रमाण 4 टक्के आहे .या जातीपासून सरासरी 22.4 हेक्टरी उत्पन्न मिळते.
3. वरदा :
आल्याची ही जात रोग आणि किडींसाठी सहनशील असून पिकाचा कालावधी 200 दिवस आहे. आल्यामध्ये तंतूचे प्रमाण तीन ते चार टक्के असून, सुंठाचे प्रमाण 20% पर्यंत असते. या जातीच्या आल्यांना नऊ ते दहा फुटवे असतात .हेक्टरी 22.3 टन पर्यंत उत्पन्न मिळते.
4. माहीम :
या जातीची लागवड महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते .ही जात मध्यम उंचीची असून सरळ वाढते. या जातीला सहा ते बारा फुटवे येतात.पिकाचा कालावधी 210 दिवसांचा असतो .आल्यामध्ये सुंठाचे प्रमाण 18.60% पर्यंत असते आणि या जातीपासून हेक्टरी 20 तन पर्यंत उत्पन्न मिळते.
5. IARI वरडा :
हे पीक 200 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होते. कोरडया आल्याचे उत्पन्न जास्त मिळते. एका एकरामध्ये या जातीपासून 90 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.
6. रियो डी जानेरो
7. चायना
8. वैनाड
9. कलिकत
तेलाचे प्रमाण जास्त असणाऱ्या जाती : चेरणाड , एरणाड , कुरुप्पमवाडी , नरस्पटलम , स्लिवा स्थानिक, रियो- डी – जानेरो .
लागवड :
आल्याची लागवड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्या मध्ये किंवा मे महिन्याच्या अखेर पर्यंत केली जाते.
आल्याची लागवड सपाट वाफ्यावर ,सरीवरंबा पद्धत आणि रुंद वरंबा पद्धत या तिन्ही पद्धतीने केली जाते.
सुधारित पद्धतीने रुंद वरंबा किंवा गादी वाफेवर आल्याची लागवड केली जाते.
या पद्धतीमध्ये 75 ते 90 सेंटीमीटर रुंद आणि 22.5 × 22.5 सेमी वर लागवड केली जाते.
सपाट वाफे यावरील लागवडीपेक्षा या पद्धतीने 50 टक्के जास्त उत्पन्न मिळते.
आल्याची लागवड करण्यासाठी बियाणे निरोगी वापरावे.
शक्यतो कंदकुज रोगास बळी न पडलेले, शेतातूनच नऊ ते दहा महिने पूर्ण झालेले कंद, बियाणे म्हणून वापरावे.
बियाणांचे वजन 24 ते 25 ग्राम पर्यंत, डोळे फुगलेले 18 ते 20 क्विंटल हेक्टरी बियाणे आले लागवड साठी लागतात.
खत आणि पाणी व्यवस्थापन :
आल्याला सेंद्रिय खतांचे प्रमाण जास्त द्याव्या .कोळप्याच्या पाळ्या मारताना जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत टाकावे.
ठिबक सिंचनचा वापर केल्यास आल्याला आठवड्यातून एक वेळा 200 लिटर एकरी जीवामृत सोडावे.
जीवामृत सोडल्यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि आले चांगले वाढत.
पाट पाण्याच्या पद्धतीमध्ये पहिली पाळी लागवडीनंतर लगेच देतात.
त्यानंतर जमीन व हवामानानुसार आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या दिल्या जातात.
पिकाला पाण्याच्या सोळा ते अठरा पाळ्या पूर्ण कालावधीमध्ये होतात.
ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची चांगली बचत होते आणि तणांचा प्रादुर्भाव देखील कमी होतो.
ठिबक सिंचन चा वापर केल्यामुळे मातीतील रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
आंतरमशागत :
आल्या मध्ये पाट पाण्याच्या पद्धती असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तणांची वाढ होते.
तण नियंत्रणासाठी जवळपास तीन ते चार वेळा खुरपणी करावी लागते. तसेच मातीची भर देखील घालावी लागते.
जमिनी मध्ये हवा खेळती रहावी ,म्हणून खुरपणी करताना सर्व माती मोकळी करून घ्यावी. जेणेकरून जमिनीमध्ये हवा खेळती राहील.
महत्त्वाच्या किडी आणि रोग :
किडी :
1.कंद माशी :
ह्या माशीच्या आळ्या उघड्या पडलेल्या गड्ड्या मध्ये शिरतात आणि त्या गड्ड्यावर आपली पूर्ण उपजीविका करतात. या किडीचे नियोजन करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा आणि जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.
2.पाने गुंडाळणारी अळी :
ही अळी पानाची गुंडाळी करते आणि त्याच्या आत मध्ये राहून पाने खाते .प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर सर्व पाणी कुरतडलेली दिसतात .या किडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रादुर्भाव झालेले सर्व पाने तोडून टाकावी. तसेच पिकावर जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.
3.खोड पोखरणारी अळी :
ही आळी आल्याच्या रोपाचे खोडामध्ये छिद्र करून आत जाऊन पूर्ण खोड पोखरते आणि त्यावर आपली उपजीविका करते .किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर खोड पिवळे पडून वाळून जाते त्यामुळे पूर्ण झाड सुकते. या किडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.
रोग :
1.कंदकुज :
या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पाणी शेंड्याकडून आणि कंदाकडून पिवळी पडून वनस्पती पूर्णपणे वळतात. खोडाच्या जमिनीलगतचा सर्व भाग काळपट पडतो आणि आल्याचा गड्डा देखील निस्तेज आणि काळा झालेला बघायला मिळतो. या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी रोगप्रतिकारक वाणाचा वापर लागवडीसाठी करावा .तसेच जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.
2. पानावरील ठिपके :
या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पहिल्यांदा पानावर लहान लहान असंख्य ठिपके दिसतात आणि वेळेनुसार प्रादुर्भाव वाढल्यानंतर हेच ठिपके मोठे होऊन पूर्ण पान करपल्यासारखे दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.
काढणी आणि उत्पादन :
हिरव्या ओल्या आल्याला बाजारामध्ये मागणी असल्यानंतर सात महिन्यांमध्ये आल्याची काढणी केली जाते.
सुंठा साठी आल्याची काढणी आठ ते नऊ महिन्यांनी जेव्हा पाणी पिवळी पडतात आणि वाळू लागतात तेव्हा केली जाते.
सुरुवातीला आल्याचा पाला कापून घ्यावा व नंतर कुदळीच्या साह्याने खणून गड्डे काढले जातात.
खणताना गड्ड्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर आले काढून स्वच्छ धुऊन गड्डे आणि बोटे वेगवेगळे केले जातात.
सरासरी आल्याचे प्रती हेक्टरी 18 ते 20 टन उत्पादन मिळते.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi