कापूस लागवड :
कापूस हे जगातील महत्त्वाचे धाग्याचे पीक आहे. त्याचा उपयोग कापड निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. जगामध्ये जवळपास 60 देशांमध्ये कापसाची लागवड केली जाते .कापूस पिकाला धाग्यांचा राजा असे म्हटले जाते. कापसाच्या बियांपासून तेल तयार केले जाते .सरकी मध्ये प्रथिने ,कार्बोहायड्रेट्स ,जीवनसत्वे व क्षार असतात. कापसाच्या तेलापासून सौंदर्य प्रसाधने, स्फोटके ,कीटकनाशके, साबण ,बुरशीनाशके तयार केले जातात. सरकीची पेंड जनावरांना खाद्य म्हणून वापरली जाते. कापसाचा उपयोग फर्निचरचे कुशन बनवण्यासाठी आणि ड्रेसिंगसाठीही होतो .सर्दीची टरफले सिंथेटिक रबर आणि प्लास्टिक तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. कापसाची लागवड रशिया ,अमेरिका ,चीन, ब्राझील, पाकिस्तान, तुर्की, इजिप्त, मेक्सिको आणि सुदान या देशांमध्ये केली जाते. महाराष्ट्र मध्ये कापसाची लागवड ही कोरडवाहू भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते.
लागणारी जमीन :
कापूस लागवड ही वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये करता येते. बागायती कापूस हलक्या ते गाळाच्या सुपीक जमिनीमध्ये घेऊ शकतो आणि जिरायती कापूस हा मध्यम ते खोल काळ्या जमिनीमध्ये चांगला येतो.
कापसासाठी लागणारी जमीन ही पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी.
जिरायती कापसाची लागवड साठी लागणारे जमिनीचा दुय्यम स्तर कठीण नसावा.
कापूस लागवडीसाठी जमिनीचा सामू 5.5 ते 6 पर्यंत असल्यास चांगले उत्पन्न मिळते.
कापूस या पिकासाठी 8.5 पर्यंत सामू असल्यास देखील पीक चांगले येते.
लागणारे हवामान :
कापूस लागवडीसाठी उबदार ,कोरडे हवामान उत्तम ठरते.
कापूस लागवडीमध्ये जास्त वेळ कोरडे हवामान आणि सतत पडणारा पाऊस हानिकारक ठरतो.
अशा वातावरणामध्ये फुल आणि बोंडे गळण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. कापूस या पिकाला बीजअंकुरण साठी 18 ते 20 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते.
कापूस हे 35 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान सहन करू शकते कापसाची शाकीय वाढ ही 21 ते 27 डिग्री सेल्सिअस मध्ये चांगली होते आणि बोंडे फुटण्याच्या वेळी 27 ते 31 डिग्री सेल्सिअस तापमान असल्यानंतर योग्य ठरते.
कापसाला वार्षिक 600 ते 700 मी.मी पाऊस पुरेसा ठरतो.
सुधारीत जाती :
1. मनी मेकर KCH – 100 BG ll ( कावेरी सिड्स )
2. मोक्ष KCH – 15K39 BG ll ( आदित्य सिड्स )
3. धनदेव प्लस MRC73 73 BG ll ( मायको सिड्स )
4. सुपरकोट PCH – 115 BT -2 ( प्रभात सिड्स )
5. अजित 155 BG ll ( अजित सिड्स )
6. अंकुर हरीश ANKUR 216 BG ll ( अंकुर सिड्स )
7. राशी आरसीएस 659 RASI RCH BG ll ( रासी सिड्स)
8. भक्ती NCS 245 BG ll ( निजुविदू सिड्स )
9. जंगी MRC 7017 plus BG ll ( मायको सिड्स)
10. तुलसी ले पंगा TULSI – 118 BG ll ( तुलसी सिड्स )
जमिनीची पूर्व मशागत :
लागवड करण्यासाठी जमीन चांगली नांगरून घ्यावी आणि कोळप्याच्या तीन ते चार पाळ्या घालाव्या आणि सर्व ढेकळे फोडून घ्यावे.
जमिनीमध्ये पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा आणि तन वेचून शेत पूर्णपणे स्वच्छ करावे आणि कोळपायाच्या शेवटच्या पाळी पूर्वी जमिनीमध्ये उच्च प्रतीचे कुजलेले शेणखत टाकावे.
हेक्टरी आठ ते दहा टन शेणखत शेतामध्ये टाकावे.
कपाशीसाठी सरीवरंबे पद्धतीचे वाफे तयार करून त्यामध्ये लागवड केली जाते.
लागवड :
कापूस लागवड खरीप हंगामांमध्ये केली जाते. कापूस हा जिरायती पिकासाठी पाऊस पडल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लावला जातो .बागायती कापसाची पेरणी ही मार्च ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये केली जाते .कापूस हे तीन पद्धतीने पेरले जाते.
1. पाभरणी : कापूस दुफण किंवा तिफन च्या साह्याने जमिनीमध्ये बी पेरून नंतर कोळप्याच्या सहाय्याने झाकले जातात.
2. टोकने: बिया वरंब्यावर योग्य अंतरावर हाताने टोकले जातात.
3. चौफुली पद्धत : या पद्धतीमध्ये दोन्ही दिशेने ठराविक अंतरावर उभ्या आडव्या रेषा आखून प्रत्येक रेशाच्या ठिकाणी दोन बिया लावल्या जातात ही पद्धत अमेरिकन जातीच्या कपाशीसाठी वापरतात.
कापूस लागवडीसाठी जातीनुसार अंतर बदलते .देशी कापूस साठी सरासरी 45 × 30 सेंटिमीटर या अंतरावर लागवड केली जाते आणि संकरित वाणांसाठी 90×45 या अंतरावर लागवड केली जाते. बागायती कापूस साठी देखील 90 ते 100 × 45 ते 50 सेंटीमीटर या अंतरावर लागवड केली जाते.कापसाला जिरायती लागवडसाठी 10 ते 12 किलो देशी बियाणे आणि अमेरिकन कापूस 8 ते 10 किलो पर्यंत हेक्टरी पुरतो .बागायती लागवडीसाठी देशी कापूस 6 ते 8 किलो आणि संकरित कापूस 2 ते 2.5 किलोग्राम हेक्टरी पुरेशी ठरते.
आंतरमशागत :
विरळणी : कापूस चे योग्य उत्पन्न मिळवण्यासाठी वनस्पतींची संख्या विशिष्ट ठेवण्याच्या दृष्टीने विरळणी करावी लागते .कापूस या पिकामध्ये पेरणीनंतर दोन ते तीन आठवड्यात विरळणी केली जाते .विरळणी करत असताना रोगट वनस्पती ,अशक्त वनस्पती काढून टाकाव्या आणि निरोगी दणकट वनस्पती ठेवाव्या.
शेंडे खुडणे : बागायती पिकांमध्ये शेंडे खुडणे ही प्रक्रिया केली जाते .पीक अंदाजे तीन महिन्याचे असताना मुख्य फांदीचा शेंडा खुडला जातो .त्यामुळे पिकाची अवास्तव शाकीय वाढ थांबते आणि त्यामुळे बोंडे चांगले वाढतात आणि कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
तन व्यवस्थापन : लागवड केल्यानंतर सरासरी सात ते आठ आठवड्याच्या कालावधीपर्यंत कपाशीला तनविरहित ठेवणे गरजेचे असते .या कालावधीमध्ये पिकाला एक ते दोन खुरपण्या आणि दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्या लागतात .
खत आणि पाणी व्यवस्थापन :
कापूस लागवड करताना जमिनीची मशागत तिच्या वेळी जमिनीमध्ये चांगल्या प्रतीचे कुजलेले शेणखत टाकावे.
पाण्याची सोय असल्यास जमिनीमध्ये जीवामृत पाठ पाण्याने सोडावे आणि ज्या भागांमध्ये पाण्याची कमतरता असते.
अशा भागांमध्ये शेणखत सोबत घन जीवामृत घालावे. त्यामुळे कापूस या पिकामध्ये उत्पन्न वाढते. कापसासाठी पाण्याचे योग्य नियोजन करावे लागते.
जिरायती कापूस मध्ये पाते धरण्याची अवस्था, फुलधारणा अवस्था आणि बोंडे परिपक्वता अवस्था, ह्या तीन महत्त्वाच्या अवस्था असतात.
या वेळी कापसाला पाणी न दिल्यामुळे उत्पादन कमी होऊ शकते .बागायती कापूस साठी आठ ते दहा दिवसाच्या सुमारे पाणी द्यावे आणि उन्हाळ्यामध्ये सात दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
महत्त्वाच्या किडी आणि रोग :
किडी :
1.रस शोषक किडी :
या सर्व किडी कापूस या पिकांमधून सर्व रस शोषून घेतात. पीक फुलावर येण्याच्या अगोदर यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या किडी कोवळ्या फांद्या, पाने, देठ आणि बोंडामधून रस शोषतात, त्यामुळे पाने आणि बोंडे गळून पडतात आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली दिसून येते .या किडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी चिकट सापळे ,कामगंध सापळे ,यांचा वापर शेतामध्ये करावा आणि कीड प्रतिकारक जातींची लागवड करावी.
2.ठिपक्यांची बोंड आळी :
ही आळी पहिला शेंडा पूर्णपणे पोखरते .नंतर कळ्या व बोंडे हळूहळू गळू लागतात आणि बोन्डांवर छिद्र्य दिसतात आणि ते सर्व बोंडे सडून जातात .त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन ही पद्धत वापरावी आणि कीडग्रस्त फांद्या आणि बोंडे गोळा करून त्यांचा नाश करावा.
3.गुलाबी बोंड अळी :
ही आळी कापसाच्या बोंडात शिरून आतील पूर्ण भाग खाऊन टाकतो .या अळ्यांचा प्रादुर्भाव झालेल्या कळ्या फुले व गोंडे गळून पडतात .त्यामुळे उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट येते. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे धाग्यांचा रंग बदलतो. या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्ट महिन्यापासून ते कापसाच्या वेचणी पर्यंत मोठ्या प्रमाणावर दिसून येते. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी बी टी कापूस जातीची लागवड करावी आणि पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
रोग :
1. भूरी :
भुरी हा रोग कापूस पिकावर आढळणारा बुरशीजन्य रोग आहे. पावसामुळे आणि हवेत मोठ्या प्रमाणात आद्रता असल्यावर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो .या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानाच्या खालच्या बाजूस पांढऱ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते . बुरशीची प्रमाण जास्त असल्यावर पाने,फुले आणि कळ्या अपक्व बोंडे गळून पडतात .या रोगावर नियंत्रण करण्यासाठी रोग प्रतिकारक जातींची लागवड करावी आणि जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.
2. करपा :
करपा हा रोग प्रामुख्याने अमेरिकन जातींवर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानावर कोणाकृती तेलकट तपकिरी ठिपके दिसतात, पानांच्या शिरांजवळ ते लालसर काळपट होतात . खोडावरील ठिपके लांबट आणि काळसर असतात .बोंडावर सुद्धा काळे ठिपके दिसतात .त्यामुळे आतील कापूस खराब होऊ शकते .या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी आणि देशी कापूस जातींची लागवड करावी.
काढणी आणि उत्पादन :
कापसाची काढणी बोंडे उमलतील तशी तशी वेचणी करून करावी लागते.
पूर्ण पिकांमध्ये दहा टक्के बोंडे उमल्यानंतर पहिली वेचणी केली जाते. पूर्ण उमलेल्या बोंडातील कापुस वेचले जातात.
बोंडे ओले असताना कापूस वेचू नये. तसेच कापसाबरोबर पाणी अथवा साल येणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.
वेचणीला कालावधी दोन ते तीन महिन्यापर्यंत जातो. महाराष्ट्र मध्ये अंदाजे ऑक्टोबर डिसेंबर या कालावधीमध्ये कापसाचे वेचणी केली जाते.
उत्पन्न :
बागायती कापूस :
1. अमेरिकन कापूस – 20 ते 25 क्विंटल / हेक्टर
2. संकरीत – 30 ते 40 क्विंटल / हेक्टर
3. सुधारीत वान – 20 ते 25 क्विंटल / हेक्टर
जिरायती कापूस :
1. अमेरिकन वान – 10 ते 25 क्विंटल / हेक्टर
2. देशी वाण – 8 ते 10 क्विंटल / हेक्टर
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi