Blogभाजीपाला

मिर्ची लागवड :

5/5 - (1 vote)

मिरची हे पीक महाराष्ट्र मध्ये वर्षभर घेतले जाणारे नगदी पीक आहे. या पिकाची मागणी वर्षभर बाजारात असते .मिरची ही आपल्या दररोजच्या जेवणात वापरली जाते. मिरचीमध्ये अ ,ब ,क आणि इ ही जीवनसत्वे पुरेशा प्रमाणात आढळतात. मिरचीमुळे जेवणाला चव आणि स्वाद येतो. मिरचीचा उपयोग भाजी, ठेचा, मसाले, द्रव मसाले, लोणचे, सॉस व वाळलेली पावडर तयार करण्यासाठी केला जातो. मिरचीला सुकवून मिरची पावडर बनवली जाते. मिरची पावडर चा उपयोग बऱ्याच मसाला उद्योगांमध्ये केला जातो. तसेच मिरचीचे आरोग्यदायी खूप फायदे आहेत.

मधुमेह रुग्णांसाठी मिरचीचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण मध्ये राहते. तसेच हिरव्या मिरच्या सेवनामुळे कॅन्सरच्या प्रादुर्भाव कमी होतो. मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंट चे प्रमाण जास्त असल्यामुळे कर्करोग होण्यापासून मिरची शरीराचे संरक्षण करते. मिरचीमध्ये विटामिन सी चे प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मिरची योग्य ठरते.

लागणारी जमीन :

मिरची ही मध्यम व भारी जमिनीत दोन्हीमध्ये चांगले येते .मिरचीची लागवड उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये केल्यास उत्पन्न चांगले मिळते.

जमीन सेंद्रिय पदार्थांनी भरपूर असावी मध्यम भारी ओल धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये मिरचीचे पीक कोरडवाहू पीक म्हणून घेतले जाऊ शकते.

अल्कलीयुक्त किंवा जास्त अतिआम्ल जमिनीमध्ये मिरचीची लागवड करू नये. मिरचीसाठी जमिनीचा सामू 6 ते 7 दरम्यान असल्यास उत्पन्न चांगले मिळते.

लागणारे हवामान :

मिरचीची वाढ उष्ण आणि दमट अशा वातावरणामध्ये चांगली होते.मिरचीच्या बियांची उगवण 18 ते 27 अंश सेल्सिअस मध्ये चांगली येते.

मिरची या पिकाची लागवड आपण हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा ह्या तिन्ही हंगामांमध्ये करू शकतो.

जास्त कडाक्याची थंडी आणि जास्त पावसाळा आणि ढगाळ वातावरण मिरचीला योग्य ठरत नाही.

मिरचीच्या झाडांची वाढ 25 ते 30 अंश सेल्सिअस मध्ये चांगले ठरते.

वातावरणामध्ये जास्त बदल झाल्यास मिरचीच्या फुलांची आणि फळांची मोठ्या प्रमाणावर गळ होते, त्यामुळे उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतात.

मिरचीच्या जाती :

1.अग्निरेखा :

अग्निरेखा या जातीच्या मिरच्या साधारणपणे 11 सेंटीमीटर लांबीच्या असतात आणि फळ मोठे असतात .या जातीच्या मिरचीची काढणी हिरवी असताना केली जाते.

फळांचा रंग हिरवा असून फळावर थोड्याफार प्रमाणामध्ये सुरकुत्या असलेल्या आढळतात .या जातीचे सरासरी उत्पादन 25 ते 26 क्विंटल असून ही जात भूरी आणि मर ह्या रोगाला जास्त बळी पडत नाही.

2. ज्वाला :

मिरचीच्या या जातीच्या फळांची लांबी सुद्धा 10 ते 12 सेंटीमीटर पर्यंत असते .मिरचीची काढणी झाल्यानंतर साठवणूक करत असताना फळाचा रंग चांगला टिकतो .चवीला मिरची अतिशय कमी तिखट असते व फळाची साल ही जाड राहते.

3. पंत सी – १ :

पंत सी -१ या जातीच्या मिरच्या लांबीने खूप लहान म्हणजेच तीन ते चार सेंटीमीटर इतक्या असतात .ह्या मिरचीची चव अतिशय तिखट असते .ह्या जातीच्या मिरचीची वैशिष्ट्ये म्हणजे ही मिरची झाडाला उलटी लागते आणि ही जात हिरवी व लाल दोन्ही मिरची साठी चांगली ठरते.

4. संकेश्वरी – 32 :

या जातीला एस- 32 म्हणून ही ओळखले जाते. या जातीची लागवड जास्त प्रमाणामध्ये लाल मिरचीसाठी केली जाते ,या जातीची साठवणूक क्षमता कमी असून मिरचीला मध्यम तिखट अशी चव असते. या जातीची लागवड कोरडवाहू विभागांमध्ये जास्त केली जाते मिरचीच्या फळाचा रंग गडद तांबडा असतो.

5. ब्याडगी :

ह्या मिरचीच्या फळांचा रंग हा गडद लाल असून फळाची लांबी 10 ते 12 सेंटीमीटर पर्यंत असते व फळांवर सुरकुत्यांचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असते. फळांची साल जाड असते आणि ह्या मिरचीचा वापर लाल तिखट बनवण्यासाठी केला जातो .फळाचा तिखटपणा अतिशय कमी प्रमाणामध्ये असतो.

6. फुले ज्योती :

मिरचीची ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही जात विकसित केलेली आहे. या जातीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे घोसात लागतात.

एका घोसामध्ये जवळपास चार ते पाच फळे असतात .ही जात पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी विकसित केलेली आहे.

या जातीच्या फळांची लांबी सहा ते आठ सेंटीमीटर पर्यंत असते सूखलेल्या मिरचीचे उत्पन्न हेक्‍टरी 28 ते 30 क्विंटल पर्यंत मिळते.

ही जात भुरी या रोगाला कमी प्रमाणामध्ये बळी पडते.

हंगाम आणि लागवड :

मिरचीची लागवड महाराष्ट्र मध्ये तिन्ही हंगामामध्ये केली जाते. खरीप हंगामासाठी बियांची पेरणी करण्यासाठी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते जुलै पर्यंत केली जाते.

रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर पर्यंत केले जाते आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये बी पेरले जातात.

मिरचीच्या एक हेक्टर लागवडीसाठी रोप तयार करण्यासाठी एक किलो बियाणे लागतात.

रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करावे. दहा ते पंधरा दिवसाची रोपे झाल्यानंतर ती स्थलांतरित करावी.

लागवड करण्यासाठी जमीन खोल नांगरून घेतली जाते .नांगरून घेतल्यानंतर उभ्या आडव्या कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी आणि मग लागवड करावी.

पंधरा ते वीस दिवसांची निरोगी रोपे लागवडीसाठी निवडावी.

मिरचीची लागवड 45 ×45 किंवा 60× 60 सेंटीमीटर वर केली जाते.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

जमीन तयार करत असताना जमिनीमध्ये वीस ते तीस गाड्या कुजलेले शेणखत घालावे किंवा जमिनीमध्ये घन जीवामृत घालावे.

लागवड केल्यानंतर मिरचीला जीवामृताची आळवणी द्यावी आणि आठवड्याला 200 लिटर प्रति एकर जीवामृत सोडावे.

मिरचीच्या लागवडीमध्ये जमिनीच्या मगदूराप्रमाणे पाणी द्यावे. या पिकाला जास्त किंवा कमी दोन्ही प्रमाणात पाणी देऊ नये.

सुरुवातीच्या काळामध्ये रोपांचा जम बसू पर्यंत जमिनीत ओलावा बघून पाणी द्यावे.

उन्हाळ्यामध्ये 6 ते 8 दिवसांच्या अंतराने आणि हिवाळ्यामध्ये 10 ते 15 दिवसाच्या अंतराने पिकाला पाणी द्यावे.

आंतरमशागत :

मिरचीच्या लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी पहिली खुरपणी केली जाते. त्यानंतर जमिनीमध्ये तणांचा प्रादुर्भाव बघून खुरपण्या केल्या जातात .फुले येण्याच्या काळामध्ये कोळपणी करून मिरचीच्या झाडांना मातीची भर द्यावी.

महत्त्वाच्या किडी व रोग :

किडी :

1.फुल किडे :

या किडीला थ्रिप्स असेही म्हटले जाते .या किडींचा आकार खूप लहान असतो.

ह्या किडी रंगाने फिकट पिवळ्या रंगाच्या असतात .हे कीटक कोवळ्या पानावर ओरखडे पाडून त्यामध्ये असणारा रस मोठ्या प्रमाणामध्ये शोषण करतात. त्यामुळे पानाच्या ज्या कडा असतात त्या वरच्या बाजूला सुरकुतू लागतात.

ह्या किडे खोडातील रस सुद्धा शोषून घेतात त्यामुळे मिरचीच्या झाडाचे खोड कमजोर बनवून पानाची मोठ्या प्रमाणावर गळ होते .

कीटकाचे नियंत्रण करण्यासाठी शेतामध्ये पिवळा व निळ्या रंगाचे चिकट सापळ्यांचा वापर करावा.

एकरी 20 ते 22 चिकट सापळे लावावे आणि जैविक कीटकनाशकांची पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.

2.मावा :

ही किड मिरचीच्या कोवळ्या पानातील आणि शेंड्यांमधील रस शोषते. त्यामुळे मिरचीच्या झाडाला नवीन पालवी येणे बंद होते .ही की गोड चिकट पदार्थ स्तळवतात. त्यामुळे अन्य कीटक आणि बुरशी पिकावर प्रादुर्भाव करतात आणि काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव पानांवर दिसून येतो .त्यामुळे प्रकाश संश्लेषण ची क्रिया खंडित होते आणि झाडाला अन्न न मिळाल्यामुळे झाड कमकुवत बनते. ह्या कीटकाच्या नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.

रोग :

1. मर रोग :

ह्या रोगामध्ये बुरशीमुळे झाडांच्या फांद्या शेंड्या काढून खाली वाळू लागतात. कोवळे शेंडे सर्वात आधी मरतात .हा रोग बुरशीमुळे होतो ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला असल्यास मिरचीच्या झाडावर वर्तुळाकार हिरव्या व लाल रंगाचे चट्टे दिसू लागतात .दमट वातावरणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो .अशी काळपट चट्टे पडलेले असल्यास तशी फळे लवकर कुजतात आणि गळून पडतात .रोगाचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर पूर्ण झाडावर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात आणि झाड हळूहळू पूर्णपणे सुकून जाते या रोगाची लक्षणे झाडावर दिसल्यास तीन ते चार दिवसांच्या अंतराने जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

2. भुरी :

भुरी हा रोग देखील बुरशीजन्य रोग आहे .या रोगामुळे मिरचीच्या पानावर वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला पांढऱ्या रंगाची भुकटी दिसून येते. जर या रोगाचा प्रादुर्भाव झाडावर जास्त झाला तर नुकसान झालेल्या पाने आणि कोवळे शेंडे गळून पडतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव झालेला भाग झाडावरून काढावा आणि पंधरा दिवसातून दोन वेळा जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

3. बोकड्या :

महाराष्ट्र मध्ये विविध विभागांमध्ये ह्या रोगाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की चुरडा मुरडा,, बोकड्या,, घुबड्या हा रोग पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे पसरला जातो. एक विषाणूजन्य रोग असल्यामुळे या रोगावर आपण नियंत्रण करणे अशक्य होते .या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शेतातील पांढऱ्या माशीवर नियंत्रण आणणे खूप गरजेचे आहे. पांढऱ्या माशीचे नियंत्रण करण्यासाठी शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा. एकरी 18 ते 20 चिकट सापळे लावावेत आणि वेळोवेळी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

काढणी :

मिरचीची लागवड केल्यानंतर साधारणपणे 75 ते 80 दिवसांमध्ये मिरची काढण्यासाठी तयार होते. हिरव्या मिरचीसाठी फळे ही लांबट हिरव्या रंगाची झाल्यानंतर काढणी करावी.

काढणी करताना मिरची देठासहित झाडावरून तोडावी . प्रत्येक दहा दिवसानंतर मिरचीचा एक तोडा घ्यावा.

काढण्याचा काळ साधारणपणे तीन महिन्यापर्यंत राहतो त्यामध्ये 8 ते 10 तोडण्या होतात.

वाळलेल्या मिरचीसाठी त्या पूर्ण लाल झाल्यानंतर झाडावरून काढाव्यात आणि मग सुखायला ठेवाव्या.

उत्पादन :

मिरचीचे उत्पादन जातीनुसार वेगवेगळे असते.. सर्वसाधारणपणे मिरचीचे हेक्टरी उत्पन्न 15 ते 20 टनापर्यंत मिळते .वाळलेल्या मिरचीचे उत्पन्न 2 ते 4 टन पर्यंत येते आणि कोरडवाहू मिरचीचे उत्पन्न 6 ते 7 क्विंटल पर्यंत भेटते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/vegetables

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *