Blogफळ

डाळींब लागवड

5/5 - (1 vote)

इराण देश हा डाळिंबाचे उगम स्थान समजला जातो. डाळिंब महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रावर पसरलेले पीक आहे. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये डाळिंबा खाली क्षेत्र आणि उत्पादन च्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. डाळिंबामध्ये प्रथिने, खनिज द्रव्य, चुना, स्फुरद आणि लोह हे अन्नघटक असतात. डाळिंबाची साल अमांश आणि अतिसार या रोगावर गुणकारी असून तिचा उपयोग कपडे रंगवण्यासाठी करता येतो. डाळिंबाचा रस काढून बाटलीमध्ये भरून अधिक काळपर्यंत टिकवता येतो. डाळिंबाचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा जास्त केला जातो. महाराष्ट्र मध्ये सोलापूर, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये डाळिंबाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

लागणारी जमीन :

मध्यम प्रतीची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन डाळिंबाच्या लागवडीसाठी योग्य ठरते.

हलक्या जमिनीमध्ये डाळिंबाची लागवड केल्यानंतर फळांना उत्तम रंग येतो परंतु उत्पादन थोडे कमी मिळते.

पण काळ्या आणि भारी जमिनीमध्ये डाळिंबाची लागवड केल्यास फळांना चांगला रंग येत नाही.

डाळिंबामध्ये पाण्याचा पुरवठा कमी झाल्यास फळे तडकली जातात.

अशा डाळिंबांना बाजारामध्ये चांगला भाव भेटत नाही.

त्यामुळे मध्यम प्रकाराची आणि उत्तम निचरा होणारी, मुरमाड प्रकारची जमीन डाळिंब या पिकासाठी निवडावी.

लागणारे हवामान :

डाळिंबाला सर्वसाधारणपणे समक्षीतोष्ण आणि कोरड्या वातावरणामध्ये फळे चांगली मिळतात.

चांगल्या गुणवत्तेची फळे मिळण्यासाठी आणि जास्त उत्पादन क्षमतेसाठी डाळिंबाला आद्रतेचे प्रमाण कमी लागते.

वातावरण दमट असल्यामुळे झाडावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते आणि फळांना तडे देखील पडतात.

डाळिंबाला हिवाळ्यातीलकडाक्याची थंडी आणि उन्हाळ्यातील कोरडी हवा आणि ऊन उपयुक्त ठरते.

अशा वातावरणामध्ये डाळिंबाची लागवड योग्य ठरते आणि उत्पादन ही जास्त मिळते.

डाळिंबाच्या सुधारित जाती :

1.गणेश :

डाळिंबाची ही जात फळ संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे येथे विकसित केलेली आहे. ही डाळिंबाची सर्वोत्तम जात मांडली जाते .या जातीच्या फळांचा आकार मध्यम असतो आणि फळाच्या आतील बिया मऊ असतात. डाळिंबाच्या दाण्याचा रंग गुलाबी असतो आणि चव गोड असते.

2.मृदुला :

ही डाळिंबाची संकरित जात आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ही जात विकसित केलेली आहे .फळांची गोडी ही गणेश जातींच्या फळांसारखीच असते .फळांचा सालीचा रंग चमकदार आणि गडद लाल असतो .जातींच्या फळांचा आकार मध्यम असतो डाळिंबाच्या बिया अतिशय मऊ आणि आकाराने मोठे असतात.

3.फुले अरक्ता :

डाळिंबाची ही जात सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने विकसित केले असून ही जात गणेश व गृ -शाहू- रेड जातीच्या संकरित पिठ्ठी पासून निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. या जातीच्या फळांचा आकार मोठा असतो . दाणे टपोरे असतात आणि फळांची साल चमकदार आणि गडद लाल रंगांची असते.

4.भगवा :

डाळिंबाच्या ह्या जातीची शिफारस महाराष्ट्र मध्ये सर्व विभागांमध्ये घेण्यासाठी केलेली आहे .कारण हा वाण अतिशय उत्पादक क्षम आहे. या वाहनांची फळे लागवडीनंतर 180 ते 190 दिवसांमध्ये परिपक्व होऊन बाजारामध्ये येतात. या फळांचा आकार मोठा असतो आणि सालीची जाडी जास्त असल्यामुळे दूरवरच्या बाजारासाठी हे फळ योग्य ठरते. डाळिंबाच्या ह्या जातीला काळ्या ठिपक्या च्या रोगाला आणि फुलकिडी साठी जास्त रोगप्रतिकारक मांडले जाते.

5.फुले भगवा सुपर :

महाराष्ट्र मध्ये लागवडी मध्ये सर्वात जास्त घेतला जाणारा वाण म्हणजे भगवा या जातीमध्ये आढळणाऱ्या विविधतेमधून निवड करून या तिला विकसित केले आहे .या जातीच्या फळांचा रंग गर्द केशरी असून फळांची साल जाड असते आणि दाणे मऊ असतात .फळांमध्ये रसाचे प्रमाण जास्त असते आणि सरासरी एका झाडापासून 24 किलो पर्यंत फळे मिळतात .या जातीची फळे तयार होण्यासाठी 175 ते 185 दिवसांचा कालावधी लागतो आणि दुसऱ्या देशांमध्ये निर्यातीसाठी हा उत्तम मानला जातो.

6.जी 137 :

पश्चिम भागामध्ये असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या जातीला विकसित केले आहे. ही जात गणेश या जातीमधून निवड पद्धतीने विकसित करण्यात आलेली आहे .या जातीच्या फळांमध्ये दाण्याचा आकार गणेश या जातीपेक्षा मोठा असतो आणि आतील दाणे मऊ असतात. फळाचा रंग हा गडद असतो.

डाळिंबाची अभिवृद्धी आणि लागवड पद्धती :

डाळिंबाची लागवड मुख्यतः छाट कलम आणि गुटी कलम यापासून केली जाते.

गुटी कलम केलेल्या कलमांना बाजारामध्ये जास्त मागणी आहे आणि शेतकरी मुख्यतः गुटी कलमाने केलेल्या कलमांची लागवड करतात.

बियांपासून लागवड केली जात नाही कारण बियांपासून तयार झालेल्या झाडांना फळे उशिरा येतात आणि फळांचा दर्जा आणि उत्पादन मूळ झाडापासून वेगळे येते.

भरपूर दर्जेदार आणि उत्तम फळे देणाऱ्या मातृवृक्षापासून गुटी कलम करून किंवा छाट कलम करून रोपे तयार करावी आणि मग लागवड करावी.

निवडलेल्या जमिनीमध्ये उभी आडवी नांगरट करून घ्यावी.

कोळपणी करून खोल मशागत करावी. लागवडीनंतर 4.5 × 3.0 मीटर या अंतरावर खड्डे पाडून घ्यावे.

खड्ड्यांचा आकार 60 ×60 ×60 सेंटीमीटर असावा.

खड्ड्यांमध्ये पंधरा ते वीस किलो शेणखत किंवा घन जीवामृत आणि चांगली गाळाची माती भरून घ्यावी.

पावसाळा सुरू झाल्यानंतर जुलै च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लागवड करावे.

लागवड करताना प्रत्येक खड्ड्यांमध्ये एकच कलम लावावे.

वळण आणि छाटणीच्या पद्धती :

डाळिंबाची सुरुवातीला तीन ते चार वर्ष खूप जोमदार वाढ होते.

त्यामुळे यावेळेस डाळिंबाला योग्य वळण देणे झाडाच्या उत्पादनासाठी खूप आवश्यक असते.

कलम लावल्यानंतर त्याची वाढ एका मजबूत खोडावर होऊन द्यावी.

मुख्य खोडाच्या अर्धा मीटर उंचीपर्यंत कोणतीही फूट वाढू देऊ नये.

त्या उनंतर चार ते पाच निरोगी जोमदार चारी बाजूने उगणाऱ्या फांद्या झाडाला ठेवाव्यात.

डाळिंबाच्या झाडाला बुंध्यापासून खूप फुटवे फुटतात त्या फुटव्यांना योग्य वेळी काढावे नंतर पुढे त्या फांद्या वाढवून द्याव्यात आणि फक्त वाळलेल्या, रोगाट, किडेने पोखरलेल्या जमीन लगतचे फुटवे काढत राहावे.

डाळिंबाच्या झाडावर जून फांद्यांवरील नवीन फुटेयांवर तीन ते चार वर्षे फळे येतात.

नंतर थोडी हलकी छाटणी करून घ्यावी आणि चांगल्या जोमदार नवीन फांद्या तयार होऊन द्याव्यात अशी छाटणी फळांची काढणी केल्यानंतर करावी.

खते आणि पाणी व्यवस्थापन :

झाडांची योग्य वाढ होण्यासाठी नियमित पाण्यात पुरवठा हा गरजेचा असतो.

डाळिंबासाठी हलक्या जमिनीमध्ये चार ते सहा दिवसांनी आणि मध्यम भारी जमिनीमध्ये आठ ते दहा दिवसानंतर पाणी द्यावे.

पाणी देण्यासाठी झाडाच्या खोडापासून एक मीटर अंतरावर चर खांदून पाणी द्यावे.

झाडाला फुले आल्यानंतर फळधारणा होईपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन करावे.

फळांची वाढ होत असताना आणि फळ पोसत असताना पाण्याचा ताण पडू नये याची योग्य काळजी घ्यावी.

पाण्याचा ताण पडल्यास फळे गळतात आणि फळांना तडे पडतात त्यामुळे उत्पादन कमी होते.

सुरुवातीच्या काळामध्ये चार ते पाच वर्ष आणि डाळिंबाला काढणी झाल्यानंतर घन जीवामृत आणि शेणखत द्यावे आणि महिन्यातून एकदा डाळिंबाला जीवामृत सोडावे.

बहार धरणे :

महाराष्ट्र मध्ये समजशीतोष्ण हवामानामध्ये डाळिंबाला वर्षातून तीन वेळा फळे येतात.

मृगबहार हस्त बहार आणि आंबे बहार असे मुख्य तीन बहार आपण डाळिंबामध्ये घेऊ शकतो.

बहार धरण्यासाठी बाजार भाव, मनुष्यबळ, पाण्याचे उपलब्धता, हवामान, आर्थिक आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची तयारी, इतर बाबींचा विचार आपल्याला करावा लागतो.

डाळिंबामध्ये उन्हाळ्यामध्ये आपण आंबेबहार घेऊ शकतो.

कारण मार्च ते मे महिन्यामध्ये हवा कोरडी आणि उष्ण असते आणि जेव्हा फळे पक्व होतात म्हणजेच जून ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये तापमान कमी असते.

त्यामुळे फळाला आकर्षक रंग आणि चव चांगली येते आणि फळांचा दर्जा उत्कृष्ट बनतो.

आंबे बहार मध्ये किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा कमी राहतो.

जर पाण्याची व्यवस्थित उपलब्ध असेल तर उन्हाळ्यामध्ये आंबे बहार घेणे योग्य ठरते.

बागेमध्ये अंतर पिके आणि अंतर मशागत :

डाळिंबाची लागवड केल्यानंतर फळे येण्यासाठी चार ते पाच वर्ष लागतात.

त्यामधील पहिले दोन ते अडीच वर्षापर्यंत डाळिंबाच्या झाडाच्या मधील ओळींमध्ये अंतर असल्यामुळे बरेच जागा मोकळी राहते.

या काळा मध्ये आपण आंतरपीके घेऊ शकतो जसे की उडीद, हरभरा, भुईमूग, कांदा, लसूण, कोबी तसेच शेंगावर्गीय पिके घेऊ शकतो.

आंतरपीके घेताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण जी पिके आंतरपिके म्हणून निवडत असतो त्या पिकांची उंची ही कमी वाढणारी असावी.

सर्वसाधारणपणे भाजीपाल्याची पिके घेणे आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्याला फायदेशीर ठरते.

लागवड झाल्यानंतर प्रत्येक झाडाला काठीचा आधार द्यावा बागेमध्ये आंतरपीक असल्यास झाडाच्या आळ्यामधील गवत वेळोवेळी खुरपून घ्यावे.

महत्त्वाच्या किडी आणि रोग :

कीड – मावा, लाल कोळी, खवले कीड, फळे पोखरणारी अळी, साल पोखरणारी अळी, काळे ढेकूण, पाने खाणारे अळी.

रोग – फळकुज, पानांवरील ठिपके, फळांना तडे पडणे, मर व तेल्या रोग, फळांवरील ठिपके.

फळांची काढणी आणि उत्पादन :

डाळिंबाचे झाडांना फुले लागल्यानंतर तिथून पुढे चार ते पाच महिन्यांमध्ये फळे काढण्यासाठी तयार होतात.

आंबिया बहार धरल्यानंतर फळे जून ते ऑगस्टमध्ये तयार होतात आणि मृगव्हार धरल्यानंतर नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यांमध्ये फळे काढण्यासाठी तयार होतात.

फळ काढण्यासाठी तयार झालेले आहे हे ओळखण्यासाठी पुढील लक्षणे फळांमध्ये दिसतात.

फळाची साल पिवळसर करड्या रंगाची दिसू लागते आणि फळ हाताने दाबल्यानंतर फळांमधून करकर असा आवाज येतो.

अशी लक्षणे दिसल्यानंतर फळ काढणीस तयार झालेले आहे असे समजावे.

मुख्यतः डाळिंबाच्या झाडापासून तीन ते पाच वर्षापर्यंत कमी फळे मिळतात.

झाडे सात ते आठ वर्षानंतर व्यापारी दृष्ट्या उत्पादन देऊ लागतात.

प्रत्येक झाडापासून साधारणपणे 100 ते 150 फळे मिळतात.

डाळिंबाची बाग लावल्यानंतर 25 ते 30 वर्षापर्यंत उत्तम दर्जाचे उत्पादन मिळते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/fruits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *