Blogधान्य

अशी करा गहू लागवड

5/5 - (1 vote)

गहू हे सर्व जगामध्ये प्रमुख अन्नधान्याचे पीक आहे. गव्हाचे लागवडीचे क्षेत्र हे इतर अन्नधान्यांच्या तुलनेमध्ये अधिक आहे. भारतामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये गव्हाचे पीक घेतले जाते. गहू हे भारतामधील महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असून जगातील गहू पिकाचे एकूण क्षेत्र व उत्पादनामध्ये भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. गव्हापासून रवा, मैदा असे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. गव्हाच्या पेंढ्याचा वापर जनावरांच्या खाद्यासाठी केला जातो किंवा आच्छादन म्हणून शेतामध्ये वापरला जातो. गव्हाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्याला गव्हाचे पीक घेणे नेहमी फायद्याचे ठरते.

लागणारी जमीन :

गव्हासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भारी व खोल जमीन निवडावी.

हलक्या जमिनीमध्ये गव्हाचे उत्पन्न घेण्याचे टाळावे. जिरायती गव्हासाठी मात्र जास्त पाऊस पडणार्‍या व जमिनी मध्ये ओलावा टिकून धरणारी, भारी अशा जमिनीमध्ये लागवड घ्यावी.

ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. अशा जमिनीमध्ये लागवड केल्यामुळे उत्पन्न चांगले मिळते.

महाराष्ट्र मध्ये गहू चे उत्पादन मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये घेतले जाते. त्यामुळे उत्पादन कमी मिळते.

लागणारे हवामान :

गहू या पिकाला उगवण्याचा काळामध्ये 15 ते 20 अंश सेल्सिअस आणि पीक तयार होण्याच्या अवस्थेमध्ये 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.

गहूच्या पिकाला थंड आणि कोरडे वातावरण चांगले मानवते. उष्ण आणि दमट वातावरणामध्ये पिकाचे नुकसान होते.

तापमानामध्ये वाढ झाल्यानंतर फुटवे कमी येतात.

तसेच उगवण झाल्यानंतर उष्ण व ढगाळ असेल तर मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव दिसतो.

गहू या पिकाला सर्वसाधारणपणे 500 मिमी पाऊस पुरेसा होतो.

सुधारीत जाती :

1.डी. डब्लू. आर.-162 :

हा गव्हाचा सरबती वाण असून या जातीच्या गव्हाला भरपूर फुटवे येतात.तांबेरा या रोगासाठी कमी प्रमाणामध्ये प्रतिकारक्षम असून लागवड केल्यानंतर सरासरी 120 दिवसानंतर पीक काढण्यासाठी तयार होते.या जाती पासून सरासरी 40 ते 45 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.

2. एम. ए. सी. एस. 2846 :

लागवड केल्यानंतर सरासरी 120 दिवसानंतर पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीपासून सरासरी 40 ते 45 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते. गव्हाची ही जात तांबेरा या रोगाला कमी प्रमाणामध्ये बळी पडतो. भरपूर उत्पादन असणारा ,सरबती वाण आहे.

3. एच. डी.2189 :

या जातीच्या गव्हाचे दाणे मोठे, तेजदार आणि पिवळसर असून हा वाण सरबती आहे. हा नारंगी तांब्यासाठी प्रतिकारक असून लागवड केल्यानंतर सरासरी 120 दिवसानंतर पीक पूर्णपणे काढण्यासाठी तयार होते या जातीपासून हेक्‍टरी 35 ते 40 क्विंटल उत्पन्न मिळते.

4. एन.आय.ए.डब्लु( त्र्यंबक ) – 301 :

ही जात भरपूर उत्पादन देते या जातीचे दाणे उत्तम जाड तेजदार असूनही जात तांबेरा या रोगास प्रतिकारक असून सरबती वाण असून लागवड केल्यानंतर सरासरी 115 दिवसांमध्ये पक्व होते या जातीपासून हेक्‍टरी 45 क्विंटल उत्पन्न मिळते.

5. एच. डी – 2501 :

या जातीच्या गव्हाची वाढ मध्यम असून भरदार उभी आणि या जातीचे दाणे हे तेजदार असून पिवळसर असतात लागवड केल्यानंतर रासरी 110 दिवसानंतर पीक काढण्यासाठी तयार होते या जातीपासून हेक्‍टरी 35 ते 40 क्विंटल उत्पन्न मिळते.

6. एन.आय.ए.डब्लु – 34 :

या जातीपासून सरासरी 40 ते 42 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते. या जातीपासून भरपूर उत्पन्न मिळते ,लागवड केल्यानंतर सरासरी 100 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते .ही जात चपाती बनविण्यासाठी योग्य असून या जातीला भरपूर फुटवे येतात. ही जात मध्यम उंच वाढते या जातीची लागवड आपण सर्व हंगामांमध्ये करू शकतो .तांबेरा या रोगासाठी ही जात प्रतिकारक आहे.

7. एच.आय -977 :

ही जात लागवड केल्यानंतर सरासरी 105 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होते. गव्हाची ही जात मध्यम उंचीची असते .या गव्हाचे दाणे पिवळसर आणि मोठे असतात ही जात तांबेरा या रोगासाठी प्रतिकारक असून हेक्‍टरी 30 ते 35 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.

8. एन.आय.डी.डब्लु – 15 ( पंचवटी ) :

या जातीच्या गव्हांचा वापर शेवया आणि कुरड्यासाठी बनवण्यासाठी केला जातो. या जातीचे दाणे जाड व तेजदार असून, ही जात तांबेरा या रोगासाठी प्रतिकारक आहे .या जातीपासून सरासरी 12 ते 15 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते .ही जात लागवड केल्यानंतर सरासरी 120 दिवसाच्या कालावधीमध्ये काढण्यासाठी तयार होते.

9. एन – 8233 :

ही जात लागवड केल्यानंतर सरासरी 120 दिवसाच्या कालावधीमध्ये काढण्यासाठी तयार होते. या जातीपासून हेक्‍टरी 12 ते 15 क्विंटल उत्पन्न मिळते .या जातीचे दाणे मध्यम पिवळसर व तेजदार असतात .पाणीचे योग्य नियोजन केल्यावर या जातीपासून भरपूर उत्पन्न मिळते.

10. एन 5439 :

गव्हाची ही जात तांबेरा या रोगाला बळी पडते. या जातीची कापणी वेळेवर करावी लागते. लागवड केल्यानंतर सरासरी 115 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीपासून सरासरी दहा ते बारा क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते. ही जात सरबती वाण असून चपातीसाठी उत्तम आहे.

पूर्व मशागत :

गव्हाची लागवड करण्यासाठी पेरणीपूर्वी सर्व जमीन 15 ते 20 सेंटीमीटर खोल नांगरून घ्यावी.

त्यानंतर कुळवाच्या तीन ते चार पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी.

ह्याचवेळी हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत टाकून कुळवाची पाळी द्यावी.

नंतर सर्वजमीन एकसारखी सम करून घ्यावी. कोरडवाहू गहू पेरणीसाठी राखून ठेवलेल्या क्षेत्रांमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी प्रत्येक चांगला पाऊस झाल्यानंतर कोळप्याची पाळी द्यावी आणि सर्व काडीकचरा गोळा करून जमीन स्वच्छ करावी.

पेरणीची वेळ :

कोरडवाहू गहूची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात केली जाते.

जमिनीमध्ये चांगला ओलावा असणे उगवणीच्या दृष्टीने चांगले असते.

बागायती गहू साठी पेरणी शक्यतो नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये करावी.

जेणेकरून थंडीचे जास्तीत जास्त दिवस गव्हाच्या पिकाला मिळतात.

सर्वसाधारणपणे दहा ते वीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असते तेव्हा बियाणांची उगवण चांगली होते.

पेरणीची पद्धत आणि बियाणे :

पेरणीसाठी दोन ओळींमध्ये अंतर 22 सेंटीमीटर आणि बागायती पेरणीसाठी 18 सेंटीमीटर अंतर ठेवावे.

शक्यतो पेरणी ही दक्षिण उत्तर करून बियांची खोली पाच ते सहा सेंटीमीटर पर्यंत ठेवावे.

जिरायती पेरणीसाठी 30 ते 40 किलो बियाणे पुरेसे ठरते आणि बागायती पेरणीसाठी 40 किलो बियाणे पुरेसे ठरते.

बागायती उशिरा पेरणीसाठी 50 ते 60 किलो बियाण्याची गरज असते.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

गहू साठी जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे किंवा गांडूळ खत किंवा घन जीवामृत जमिनीमध्ये टाकून घ्यावे.

पाणी देत असताना जमिनीमध्ये जीवामृत सोडावे. त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढतात.

परिणामी उत्पादनामध्ये चांगली वाढ होते. मध्यम ते भारी जमिनीमध्ये 21 दिवसाच्या अंतराने गहू या पिकाला पाणी सोडले जाते.

एकच पाणी देणे शक्य असल्यास ते पेरणीनंतर 45 दिवसानंतर द्यावे.

दोन पाणी देणे आवश्यक असल्यावर पेरणीनंतर 20 ते 22 दिवसाच्या अंतराने दुसरे पाणी साठ ते 65 दिवसानंतर द्यावे.

पाणी देत असताना जमिनीमध्ये पाणी साचून राहणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.

आंतर मशागत :

गहू पिकामध्ये लागवड केल्यानंतर शेत तन विरहित ठेवणे गरजेचे असते.

गहू पिकांमध्ये चांद वेल व हराळी या तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

यासाठी पीक 20 ते 21 दिवसाच्या झाल्यानंतर लहान कोळप्याच्या सहाय्याने पिकाच्या दोन ओळी मधील एक पाळी देऊन तन पूर्णपणे काढून घ्यावे .

जरुरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी करून घ्यावी .

जमीन मोकळी होऊन हवा खेळती राहते व पिकांच्या मुळाची वाढ भरपूर होते. त्यामुळे उत्पादनामध्ये चांगले भर होते.

महत्वाच्या किडी आणि रोग :

गहू या पिकावरील वरील किडी :

1.मावा :

मावा ही रस शोषक कीड असून मोठ्या प्रमाणावर पानांमधील रस शोषते. ही कीड स्वतःच्या शरीरामधून एक चिकट गोड पदार्थ स्त्रवते. त्या गोड पदार्थावर काळी बुरशी आकर्षित होते. त्यामुळे पूर्णपणे पान काळे पडते आणि प्रकाश संश्लेषण ही क्रिया मंदावते .त्यामुळे रोप कमकुवत बनवून उत्पादनामध्ये घट येते .या किडीवर नियंत्रण करण्यासाठी शेतामध्ये चिकट सापळ्यांचा वापर करावा व जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.

रोग :

1. तांबेरा :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर गव्हाची पाने आणि खोडावर नारंगी रंगाच्या गोलाकार व आकाराने लहान पुरळ दिसून येतात.

सर्वप्रथम या फक्त वरच्या पृष्ठभागावर दिसून येतात, त्यानंतर दोन्ही भागावर ही लक्षणे दिसतात.

रोगग्रस्त पानांवरून हलके बोट फिरवल्यानंतर नारंगी रंगाची भुकटी बोटाला लागते.

तांबेरा या रोगाची वाढ होण्यासाठी तापमानामध्ये वाढ झाल्यावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो.

पिवळा काळा व नारंगी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तांबेरा गव्हावर आढळून येतो.

काढणी आणि उत्पादन :

गव्हाची काढणी ही सर्वसाधारणपणे 110 ते 120 दिवसानंतर केली जाते.

काढणीचा काळ हा जातीनुसार वेगवेगळ्या असू शकतो.

पिकाची कापणी ही पीक परीपक्व झाल्यावर केली जाते. परिपक्व झाल्यानंतर पीक पूर्णपणे वाळते. कापणी करता वेळी दाण्यांमधील ओलाव्याचे प्रमाण 15% पर्यंत असावे.

गव्हाची कापणी ही विळ्याने जमिनीलगत केली जाते. त्यानंतर गव्हाच्या लहान लहान पेंढ्या बांधून दोन ते तीन दिवस शेतामध्येच चांगले वाळवून द्यावेत.

पेंडीच्या बुडक्याची माती झाडावी आणि त्यानंतर मळणी यंत्राच्या साह्याने गव्हाची मळणी करावी.

गव्हाचे उत्पादन घेतल्यावर एकरी 16 ते 18 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.

गव्हाचे उत्पादन जमिनीच्या मगदूराप्रमाणे, जातीनुसार, हवामानांमधील बदल, खत आणि पाणी व्यवस्थापन या गोष्टींवर अवलंबून असते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/grain

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *