अशी करा चवळीची लागवड
चवळी च्या पिकाची लागवड ही महाराष्ट्र मध्ये केली जाते.चवळी ही शेंग वर्गातील भाजी आहे. भाजीचे पीक म्हणून चवळीची लागवड ग्रामीण भागामध्ये आणि मोठ्या शहरांच्या आसपास केली जाते, पण ती मर्यादित स्वरूपामध्ये केली जाते. कडधान्य म्हणून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्व जिल्ह्यामधून थोड्याफार प्रमाणावर चवळीची लागवड केली जाते. चवळी हे पीक बहुतेक जणांच्या आहारामध्ये रोज वापरले जाते. या पिकाची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी या सर्व हंगामामध्ये केली जाते. कमीत कमी पाण्याच्या ठिकाणी सुद्धा आपण चवळीची लागवड करू शकतो. चवळीचा सालीसकट कोवळ्या शेंगा आणि कोवळे दाणे अशा स्वरूपामध्ये भाजीमध्ये, आमटी मध्ये, उसळीमध्ये वापर केला जातो. चवळीच्या झाडांचा वापर जनावरांचा चारा म्हणून देखील केला जातो, मक्यामध्ये मिसळून चवळीला पशुखाद्य म्हणून वापरले जाते. चवळीची लागवड शेतकऱ्यांसाठी नेहमी फायदेशीर ठरते कारण त्यापासून त्याला चांगला नफा होतो. चवळीच्या पिकाचे आपण शेतामध्ये आच्छादन करू शकतो. त्यामुळे जमिनीची परिस्थिती सुधारते आणि सेंद्रिय कर्ब देखील वाढतो.
लागणारी जमीन :
चवळी या पिकाची लागवड हलक्या ते मध्यम किंवा भारी जमिनीमध्ये होऊ शकते. चवळी लागवडीसाठी मात्र पाण्याचा उत्तम निचरा न होणारी भारी चिकन माती निवडू नये. अशा मातीमध्ये लागवड केल्यावर उत्पन्न कमी मिळते. पाण्याचा चांगला निचरा होणारी ,सेंद्रिय पदार्थ जास्त असणारी जमीन चवळीच्या लागवडीसाठी निवडावी. चवळीची लागवड करण्यासाठी जमिनीचा सामू 6 ते 8.5 असल्यास उत्पन्न चांगले मिळते.
लागणारे हवामान :
चवळी हे उष्ण हवामानांमधील पीक आहे. त्यामुळे कोरड्या आणि दमट दोन्ही वातावरणामध्ये चवळी चांगली येते.
चवळीला कडाक्याची थंडी हानिकारक ठरते, 20 अंश सेल्सिअस खाली तापमान गेल्यावर चवळीच्या झाडांना शेंगा आणि फुले येत नाहीत.
जास्त तापमानामध्ये म्हणजेच 35 अंश सेल्सिअसच्या वरती तापमान गेल्यावर चवळीचे पीक चांगले तग धरते.
पाण्याचा चांगला पुरवठा झाल्यावर, जास्त तापमानामध्ये चवळीचे पीक जोमाने वाढते आणि उत्पन्न देते.
सुधारीत जाती :
1. पुसा कोमल :
या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 90 दिवसानंतर पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीची उंची मध्यम असून ही जात करपा या रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. या जातीपासून सरासरी 90 ते 100 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.
2. पुसा फाल्गुनी :
या जातीची लागवड उन्हाळी हंगामामध्ये केल्यावर चांगले उत्पन्न देते. ही जात झुडूपा सारखी वाढते. या जातीच्या शेंगा गडद हिरव्या रंगाच्या असतात आणि दहा ते बारा सेंटीमीटर पर्यंत लांब असतात.शेंगांचे दोन बहार येतात, लागवड केल्यानंतर सरासरी 60 दिवसानंतर शेंगांची काढणी सुरू होते. या जातीपासून हेक्टरी 90 ते 110 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.
3. पुसा सरबती :
ही चवळीची लवकर परिपक्व होणारी जात आहे.लागवड केल्यानंतर सरासरी 45 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. ही जात खरीप आणि पावसाळी हंगामासाठी उपयुक्त असून या जातीच्या शेंगा 15 ते 25 सेंटीमीटर लांब असतात आणि ह्या जातीमध्ये सुद्धा दोन बहार येतात. या जातीपासून हेक्टरी 85 ते 90 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.
4. पुसा दो फसली :
चवळीची ही जात पावसाळी आणि उन्हाळी हंगामामध्ये लावली जाते. ही जात झुडप सारखी वाढते. शेंगांची लांबी सुमारे 18 सेंटीमीटर असून लागवड केल्यानंतर सरासरी 70 दिवसांमध्ये काढणी सुरू होते. या जातीपासून हेक्टरी 100 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.
5. ऋतुराज :
ही जात देखील झुडप सारखी वाढते .खरीप दिवसांमध्ये 30 दिवसानंतर पीक फुलावर येते आणि उन्हाळ्यामध्ये 40 दिवसांनी पीक फुलावर येते. या जातीच्या झाडांची फुले ही जांभळ्या रंगाची असतात. शेंगांची लांबी 22 ते 24 सेंटीमीटर लांब असून खरीप हंगामामध्ये पहिली तोडणी 40 ते 45 दिवसानंतर मिळते.या जातीमध्ये हिरव्या शेंगा आणि बिया दोन्हींसाठी उपयुक्त असून हेक्टरी शेंगांचे 85 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते . खरीप हंगामामध्ये 60 ते 65 दिवसांनी उन्हाळी हंगामामध्ये 75 ते 80 दिवसांमध्ये पिक काढण्यासाठी तयार होते.
6.असीम :
या जातीची लागवड खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. लागवड केल्यानंतर सरासरी 80 ते 85 दिवसानंतर पीक काढण्यासाठी तयार होते. पहिली तोडणी 45 दिवसांमध्ये मिळते या जातीपासून एकूण आठ ते दहा तोडण्या मिळतात. या जातीच्या शेंगांची लांबी पंधरा ते अठरा सेंटीमीटर पर्यंत असून बिया पांढऱ्या रंगाच्या असतात आणि फुले देखील पांढरे असतात. खरीप हंगामामध्ये हिरव्या शेंगांचे हेक्टरी उत्पादन 75 क्विंटल आणि उन्हाळ्यामध्ये 60 क्विंटल पर्यंत मिळते.
पुर्व मशागत आणि पेरणी :
निवडलेली जमिनीचे क्षेत्र नांगरून घ्यावे, सर्व ढेकळे फोडून घ्यावे आणि कोळप्याच्या तीन ते चार पाळ्या मारून घ्याव्या.
ह्याच वेळी जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे.
भाजीसाठी पीक घ्यायचे असेल तर सरी वरंबावर दोन रोपामध्ये नंतर पंधरा सेंटीमीटर आणि दोन सरींमधील 45 सेंटिमीटर ठेवून वरंबाच्या मध्यावर बी टोकावे.
कडधान्याच्या पिकासाठी जमिनीची मशागत झाल्यानंतर 60 सेंटिमीटर रुंद 30 सेंटीमीटर उंच आणि दोन गादीवाफ्यांमधील अंतर 4 सेंटीमीटर अंतर ठेवून गादीवाफे तयार करून घ्यावे.
दोन ओळींमध्ये नंतर 45 सेंटीमीटर ठेवून आणि दोन रोपांमध्ये 15 सेंटीमीटर अंतर ठेवून बिया ठोकून घ्याव्या.
अश्या पद्धतीने लागवड केल्यानंतर पंधरा किलो हेक्टरी बियाणे लागते.
लागवडीचा हंगाम :
चवळीची लागवड उन्हाळी आणि खरीप या दोन्ही हंगामांमध्ये मोठ्या प्रमाणावर केले जाते.
महाराष्ट्र मध्ये हिवाळ्यामध्ये कडाक्याची थंडी जास्त प्रमाणामध्ये पडत नाही.
त्यामुळे चवळीचे पीक आपण वर्षभर घेऊ शकतो.
उन्हाळी पिकाची लागवड फेब्रुवारी मार्चमध्ये तर खरीप हंगामा मधील लागवड जून ते जुलै महिन्यामध्ये केली जाते.
हिवाळी हंगामांसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये लागवड केली जाते.
विदर्भ या भागांमध्ये ज्वारीच्या पिकामध्ये मिश्र पीक म्हणून चवळीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.
खत आणि पाणी व्यवस्थापन :
पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीमध्ये चांगले शेणखत मिसळून घ्यावे.
त्यासोबत घन जीवामृत आणि गांडूळ खत देखील मिसळून घ्यावे.
पाणी व्यवस्थापना सोबत जमिनीमध्ये जीवामृत सोडावे.
चवळी लागवडसाठी पाण्याचे योग्य नियोजन केल्यावर उत्पन्नामध्ये भर होते.
चवळी या पिकांमध्ये ठिबक सिंचनाचा वापर केल्यावर पाण्याचे योग्य नियोजन होते.
जमिनीच्या मगदूराप्रमाणे पाण्याचे नियोजन करावे पाठ पाण्याने पाणी सोडण्याच्या पद्धतीने देखील आपण पाण्याचे नियोजन करू शकतो.
असे व्यवस्थापन केल्यावर जमिनीमध्ये पाणी साचून राहणार नाही याची योग्य काळजी घ्यावी.
किडी आणि रोग :
1.मावा :
या जातीचे पिल्ले आणि प्रौढ अन्नरस शोषतात. त्यामुळे पीक पूर्णपणे पिवळे पडते आणि या किडीच्या शरीरामधून चिकट गोड पदार्थ स्त्रावतो. त्यामुळे त्या पदार्थावर काळी बुरशीची वाढ होते.त्यामुळे प्रकाश संश्लेषांची क्रिया मंदावते आणि उत्पादनामध्ये घट होते .मावाही इतर रोग पसरवण्याचे कार्य करतो त्यामुळे या किडीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. या किडीवर नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी आणि चिकट सापळ्यांचा वापर शेतामध्ये करावा.
रोग :
1. करपा :
करपा हा रोग बुरशीजन्य रोग आहे. दमट, पावसाळी वातावरणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर खोड, पाने, शेंगा, बियांवर, लांबट काळपट खोल लाल चट्टे पडतात. त्यामुळे सर्व पाने करपून गळून पडतात. शेंगांना बी धरत नाही आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी शेतामध्ये करावी.
2.भुरी :
भुरी देखील बुरशीजन्य रोग असून या प्रादुर्भाव झाल्यानंतर पानाच्या दोन्ही बाजूला पांढऱ्या रंगाची पावडर शिंपडल्यासारखे दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव खोड आणि शेंगांवर देखील दिसू लागतो. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी झाडावर करावी.
3.तांबेरा :
या रोगाचा प्रादुर्भाव दमट आणि पावसाळी हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. या रोगाची लक्षणे म्हणून पानाच्या खालच्या बाजूवर काळपट तपकिरी फुगीर ठिपके दिसू लागतात. पाने पिवळी पडतात आणि गळून जातात. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.
4. बीन मोजेक :
हा रोग विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर हिरव्या पिवळ्या रंगाचे सर मिसळ ठिपके दिसू लागतात. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पाने वेडेवाकडे होतात आणि सुरकुत्या पाडतात. या रोगाचा प्रसार बियांमधून आणि मावा या किडीमुळे मोठ्या प्रमाणावर होतो. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी आणि मावा या किडीचे योग्य नियोजन करावे, रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रोगट झाडे उपटून टाकावी आणि त्यांना नष्ट करावे.
काढणी आणि उत्पादन :
लागवड केल्यानंतर सरासरी सहा ते आठ आठवड्यानंतर झाडाला फुले येऊ लागतात.
त्यानंतर दोन आठवड्यानंतर शेंगा तोडण्यासाठी तयार होतात.
भाजीसाठी कोवळ्या भरदार शेंगा तयार होतील त्याप्रमाणे तोडणी केली जाते.
दाण्यांसाठी पूर्ण पक्व झालेल्या शेंगा सुकवल्यानंतर काढल्या जातात.
दाणे काढण्यासाठी पक्व होऊन सुकलेले पीक कापून ते शेतात वाळवले जाते.
त्यानंतर शेंगांमधून दाणे व भुसा वेगळा केला जातो. तोडणी वरचेवर करीत राहिल्यामुळे कोवळ्या शेंगा मिळत राहतात.
साधारणपणे सहा ते आठ आठवड्यांपर्यंत चवळीची तोडणी चालू राहते.
हेक्टरी सुमारे 90 ते 120 क्विंटल हिरव्या शेंगांचे उत्पन्न मिळते आणि खरीप हंगामामध्ये 15 ते 20 क्विंटल तरी उन्हाळी हंगामामध्ये दहा ते पंधरा क्विंटल हेक्टरी वाळलेल्या दाण्यांचे उत्पन्न चवळीच्या लागवडीपासून मिळते.
Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi