Blogधान्य

Nachni Lagwad In Marathi

5/5 - (3 votes)

Nachni Lagwad

Nachni Lagwad : नाचणी हे धान्य महाराष्ट्र राज्यामधील महत्त्वाचे तृणधान्यांपैकी एक आहे. नाचणीला नागली किंवा रागी असे देखील म्हटले जाते. महाराष्ट्र मध्ये हे पीक प्रामुख्याने कोकण, कोल्हापूर आणि नाशिक या विभागांमध्ये पेरले जाते. या तीन विभागांपैकी प्रामुख्याने ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, तसेच नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होतो. एकूण क्षेत्राचा विचार केल्यावर महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त नाचणी हे नाशिकमध्ये पिकवली जाते. तसेच उत्पादनाचा विचार केल्यावर कोल्हापूर मध्ये सर्वात जास्त नाचणीचे उत्पन्न मिळते. नाचणी हे पीक आहाराच्या दृष्टीने इतर धान्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ तृण धान्य असून नाचणीमध्ये कॅल्शियम, स्फुरद, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, यासारखे खनिजे आढळतात. स्निग्ध पदार्थ अत्यंत कमी असल्याने नाचणी पीक आरोग्याला हितकारक ठरते. नाचणीमध्ये 7 ते 12 टक्के पर्यंत प्रथिनांचे प्रमाण सापडते. नाचणीमध्ये इतर अन्नपदार्थांच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम असते.

नाचणीमध्ये पौष्टिक घटकांसोबतच चांगल्या प्रतीचे पोषक तंतुमय भाग असल्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. जुनी मध्ये इतर धान्यांच्या तुलनेमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते ॲनिमिया होऊ नये म्हणून हाडे बळकट होण्यासाठी लोहाची गरज असते त्यासाठी आपण नाचणीचा वापर आपल्या आहारामध्ये करू शकतो. गरोदर मातांना गर्भ विकासासाठी, हाडे दिसून होऊ नये म्हणून वयस्कर व्यक्तींना आणि लहान मुलांना हाडे बळकट होण्यासाठी नाचणी अतिशय उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील कमी होते. जे लोक नाचणी रोजच्या आहारामध्ये घेतात, अशा लोकांमध्ये हृदयरोग आतड्यामधील व्रण आणि मधुमेहाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येते.

नाचणीच्या पिठापासून चपाती, भाकरी, आंबोळी, शेवया, लाडू, वडी, पापड, नूडल्स, केक इत्यादी पदार्थ तयार केले जातात. नाचणी ही ग्लूटन फ्री असते त्यामुळे वजन कमी करण्याच्या दृष्टीने नाचणीचा आपण आहारामध्ये वापर करू शकतो. नाचणीमध्ये अँटिऑक्सिडेंट चे प्रमाण जास्त असते आणि फायबरचे प्रमाण देखील जास्त असते. त्यामुळे जास्त काळापर्यंत भूक लागत नाही आणि सतत खाण्याच्या सवयी पासून आपण लांब राहतो आणि त्यामुळे आपोआप वजन कमी होण्यास मदत होते.

लागणारी जमीन :

  • नाचणी या पिकासाठी रेताड, लाल, काळी जमीन तसेच हलक्या डोंगर उताराच्या जमिनीमध्ये नागलीचे पीक चांगले येते.
  • नाचणी या पिकासाठी हलक्या ते मध्यम प्रतीची सेंद्रिय पदार्थ असणारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
  • नागली या पिकासाठी जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 च्या दरम्यान असल्यावर पीक जोमाने येते.
  • जास्त प्रमाणामध्ये भारी, पाणथ, क्षारयुक्त अशा जमिनी जिथे पाणी साठून राहते अशा जागी लागवड करणे टाळावे.

लागणारे हवामान :

  • नाचणी हे पीक उष्ण कटिबंधीय पीक असून या पिकासाठी 12 ते 18 अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे.
  • 16 ते 21 अंश सेल्सिअस या तापमानामध्ये नाचणीच्या बियांची उगवण चांगली होते आणि 19 ते 25 अंश सेल्सिअस या तापमान मध्ये लोंब्या चांगल्या तयार होतात.
  • नाचणी या पिकासाठी वार्षिक पर्जन्यमान 50 ते 100 सेंटीमीटर पर्यंत असल्यावर चांगले उत्पन्न मिळते.
  • सर्व राज्यांमध्ये नाचणी या पिकाचे उत्पादन खरीप हंगामामध्ये विशेषतः घेतले जाते.
  • खरीप हंगामामध्ये पिकाची पेरणी जून ते जुलै या महिन्यांमध्ये करतात, रब्बी हंगामांमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये आणि उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये पेरणी केली जाते.

सुधारीत जाती :

गरवे वाण :

1.दापोली – 2 नाचणीची ही जात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे विकसित करण्यात आलेली आहे.नाचणीच्या या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 118 ते 120 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते व्यवस्थित नियोजन केल्यावर या जातीपासून हेक्‍टरी 25 ते 27 क्विंटल नाचणी मिळते.

2. फुले नाचणी : ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विकसित करण्यात आलेली आहे. या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 115 ते 120 दिवसांमध्ये पिक काढण्यासाठी तयार होते. ही जात करपा या रोगाला प्रतिकारक्षम असून या जातीपासून सरासरी 25 ते 30 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

निम गरवे वाण :

1.दापोली सफेद : या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी शंभर ते 110 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते या जातीपासून हेक्‍टरी 15 ते 20 क्विंटल धान्य मिळते. ही जात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने महाराष्ट्रासाठी प्रसारित केलेले आहे.

2. के.ओ.पी.एन.942 :नाचणीची ही जात मध्यम कालावधीमध्ये तयार होते. लागवड केल्यानंतर 100 ते 105 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीपासून सरासरी 18 ते 20 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.

हळवे वाण :

1.व्ही . एल .149 : नाचणीची ही जात करपा या रोगाला प्रतिकारक्षम असून या जातीपासून हेक्‍टरी 25 ते 28 क्विंटल नाचणीचे उत्पन्न मिळते. लागवड केल्यानंतर 98 ते 102 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते.

2. पी.ई.एस 400 : या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 98 ते 102 दिवसाच्या कालावधीमध्ये हे पीक काढण्यासाठी तयार होते. ही जात देखील करपा या रोगाला प्रतिकारक्षम असून या जातीपासून सरासरी 20 ते 22 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.

पुर्व मशागत :

Nachni Lagwad करण्यासाठी सर्वात अगोदर उन्हाळी हंगामामध्ये जमिनीची चांगली नांगरून करून घ्यावी.

त्यानंतर जमिनीमध्ये तीन ते चार कुळवाच्या पाळ्या घालाव्यात आणि शेवटच्या पाळी घालण्याच्या अगोदर जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे.

जमिनी मधील सर्व काडी कचरा, गवत, गोळा करावे आणि जाळून टाकावे जमीन चांगली तापून द्यावी आणि त्यानंतर पेरणी करावी.

लागवड पद्धत :

  • नाचणीची लागवड टोकन, पेरणी किंवा रोप लागण या पद्धतीने केली जाते.
  • ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो, अशा ठिकाणी रोपे लागवड करण्याची पद्धत वापरली जाते.
  • तर काही भागांमध्ये नाचण्याची पेरणी केली जाते.
  • पेरणीसाठी दोन ओळींमधील अंतर 12.5 सेंटीमीटर व दोन रोंपांमध्ये दहा सेंटिमीटर ठेवून पेरणी केली जाते.
  • रोपानी लागवड करण्याचा पद्धतीमध्ये पेरणी करण्यासाठी हेक्टरी 2.5 ते 3.5 किलो बियाणे पुरेसे होतात.
  • या पद्धतीमध्ये बियाणे पेरणी हे मे ते जून महिन्यांमध्ये केली जाते.
  • रोप लागवडीकरिता रोपे तीन ते चार आठवड्यांनी काढून लावली जातात.
  • लागवड पद्धतीने पेरणी केल्यानंतर एक ते दीड किलो प्रति एकरी बियाणे लागतात.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

नाचणीसाठी पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे .त्यासोबत घन जीवामृत आणि गांडूळ खताचा देखील वापर करावा. जमिनीमध्ये पाण्यासोबतच जीवामृत देखील सोडावे.त्यामुळे जमिनीमधील सेंद्रिय पदार्थ वाढतात आणि जमीन देखील भुसभुशीत होते. नाचणीच्या रोपांना वीस ते तीस दिवस तयार होण्यासाठी लागतात. या कालावधी मध्ये रोपांना पाणी देणे गरजेचे असते.लागवड केलेली रोपे मुळे धरेपर्यंत पाणी मिळणे गरजेचे असते. त्यानंतर नाचणीला दुधाळ दाना अवस्थेपर्यंत आणि लोंबे आल्यानंतर आठ ते दहा दिवसांपर्यंत पाणी देणे गरजेचे असते.

आंतर पीक आणि आंतर मशागत :

  • नाचणी या पिकामध्ये आंतरपीक घेतल्यामुळे चांगले उत्पादन मिळू शकते.
  • त्यासाठी नाचणी या पिकामध्ये आपण सोयाबीन, नाचणी ,उडीद किंवा मटकी या पिकांचे पेरणी करू शकतो.
  • आंतरमशागतीसाठी लागवड झाल्यानंतर तण नियंत्रण ठेवणे गरजेचे असते.
  • चांगले उत्पादन घेण्याच्या दृष्टीने तणांचे नियोजन करणे गरजेचे आहे.
  • त्यासाठी पिकाची दोन ते तीन वेळा कोळपणी करावी.
  • कोळपणी केल्यामुळे जमिनीमधील बाष्पीभवनाची क्रिया कमी होते.
  • त्यामुळे जमिनीमध्ये ओल जास्त काळापर्यंत टिकून राहते.
  • नाचणीच्या रोपांना मातीची भर देखील लागते.

महत्वाच्या किडी आणि रोग :

किडी :

1.लष्करी अळी आणि पाने खाणारी अळी :

या किडीचा प्रादुर्भाव खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ही अळी नाचणी या पिकाचे 30 ते 80% पर्यंत नुकसान करते. या किडीचा प्रादुर्भाव गवताळ डोंगरी भागामध्ये जास्त दिसून येतो. ही अळी रोपाची पाने पूर्णपणे खाऊन टाकते आणि फक्त शिरा दिसू लागतात. या अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतामधील आणि बांधावरील सर्व गवत काढून टाकावे. प्रादुर्भाव दिसल्यावर जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.

2.मावा आणि तुडतुडे :

नाचणीच्या पिकामधील ह्या दोन्ही किडी रस शोषक असून मोठ्या प्रमाणावर पानांमधून रस शोषण करतात. त्यामुळे पीक कमकुवत होते आणि उत्पादनामध्ये देखील घट होते. मावा ही कीड स्वतःच्या शरीरामधून एक चिकट गोड पदार्थ स्त्रवते.त्या पदार्थावर काळी बुरशी लगेच आकर्षित होते. त्यामुळे पूर्ण झाडावर काळी बुरशी पसरते आणि प्रकाश संश्लेषांची क्रिया मंदावते आणि झाड कमकुवत बनते त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते.

रोग :

भुरी :

  • नाचणी या पिकावर शक्यतो भुरी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
  • फुलांच्या पूर्वी किंवा पीक फुलोऱ्यावर येत असताना जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव दिसतो.या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

काढणी आणि उत्पादन :

  • नाचणीचे पीक पक्व झाल्यानंतर पिकाची काढणी केली जाते.
  • पिकाची काढणी बोंडे काढून लवकर करावी, कारण काढण्यासाठी उशीर झाल्यावर बोंडांमध्ये दाणे झडून जातात.
  • बोंडे चांगले वाळवल्यानंतर बडवून मळणी करावी.
  • उन्हात चांगले वाळवून, हवेशीर जागी साठवणूक केली जाते.
  • पुढच्या वर्षी बियाणांसाठी चांगली भरलेली, टपोऱ्या दाण्याची, कीड व रोग विरहित बोंडे निवडावी आणि त्यांची मळणी करून व्यवस्थित साठवून ठेवावे.
  • ज्याचा वापर आपण पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी करू शकतो.
  • नाचणीच्या पिकाचे उत्पादन हे जमिनीची निवड, असणारे हवामान, सुधारित जातींचा वापर, आंतरमशागत, खत आणि पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टींवर अवलंबून असतो.
  • नाचणीच्या पिकापासून सरासरी 20 ते 25 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/grain

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *