Mug Lagwad In Marathi naturekrushi

Mug Lagwad In Marathi

Blog धान्य

Mug Lagwad

Mug Lagwad In Marathi: मुगाची लागवड कमी पाऊस मानाच्या प्रदेशांमध्ये वरदान ठरलेले आहे. खरीप हंगामामध्ये आपण मुगाची लागवड मोठ्या प्रमाणावर घेऊ शकतो आणि तेव्हा उत्पन्न देखील चांगले येते. मुगापासून त्याची डाळ करून मोठ्या प्रमाणावर विकली जाते. मुगामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते.

मुगाच्या डाळीचा वापर वरण बनविण्यासाठी केला मुगाच्या डाळीचा वापर रोजच्या जेवणामध्ये होतो. मुगामध्ये फायबरचे प्रमाण देखील चांगले असते, त्यामुळे पोटाचे आरोग्य देखील चांगले राहते. मुगाच्या पिकाचा कालावधी दोन ते तीन महिन्याचा असतो.

वेगवेगळ्या पीक पद्धतींमध्ये आपण मुगाच्या पिकाचा आंतरपीक म्हणून वापर करू शकतो. धान्याच्या व्यतिरिक्त त्याचा पालापाचोळा आपण खते बनवण्यामध्ये उपयोगी आणू शकतो. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी देखील मदत होते.

पीक फेरपालट करण्यासाठी मुगाचे पीक उत्तम मानले जाते. फळांच्या बागेमध्ये, उसाच्या पिकामध्ये आपण मूग हे आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. त्यामुळे कमी कालावधीमध्ये शेतकऱ्याला चांगला फायदा मिळतो.

लागणारी जमीन :

  • उन्हाळी मूग लागवडीसाठी पाण्याचा चांगला उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन योग्य ठरते.
  • ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते, अशा जमिनीमध्ये मुगाची लागवड उत्तम होते.
  • ज्या जमिनी क्षारयुक्त असतात, अशा जमिनींमध्ये मुगाची लागवड करू नये.
  • मुगाची लागवड करण्यासाठी जमिनीचा सामू 6.0 ते 8.5 या दरम्यान असल्यास उत्पन्न चांगले मिळते.
  • पाणथळ जमिनीवर आणि उताराच्या जमिनीवर मुगाचे उत्पन्न घेणे टाळावे.

लागणारे हवामान :

  • मुगाला सर्वसाधारणपणे स्वच्छ सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामान वाढीसाठी लागते.
  • या पिकाला 21 अंश ते 25 अंश डिग्री तापमान चांगले मानवते.
  • 30 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान यामध्ये या पिकाची लागवड चांगली होते.
  • मुगासाठी वार्षिक पाऊस हा 700 ते 1000 मिली मीटर पर्यंत असल्यास पीक चांगले जोमाने वाढते.

सुधारीत जाती :

1. बीएम 4 :

या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 65 ते 67 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीचे सरासरी उत्पन्न तीन ते 11 क्विंटल हेक्‍टरी मिळते .ही जात भुरी आणि करपा या रोगासाठी प्रतिकारक असून या जातीची शिफारस मध्यम भारतासाठी केलेली आहे.

2. बीपीएमआर 145 :

या जातीपासून सरासरी सात ते आठ क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळू शकते. लागवड केल्यानंतर 60 ते 65 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते .मुगाची ही जात पिवळा केवडा भुरी आणि करपा या रोगासाठी प्रतिकारक आहे.

3. कोपरगाव :

या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 65 ते 70 दिवसांमध्ये मुगाचे पीक काढण्यासाठी तयार होते .मुगाची ही जात पिवळा केवढा ,मर आणि करपा या रोगासाठी प्रतिकारक्षम असून या जातीपासून सरासरी तीन ते दहा क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

4. वैभव :

ही उशिरा परिपक्व होणारी जात आहे .या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 70 ते 75 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. ही जात भुरी या रोगासाठी प्रतिकारक असून या जातीचे दाणे हिरवे टपोरे असतात .या जातीच्या मुगापासून सरासरी 14 ते 15 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.

5. पी. के.व्ही.ग्रीन गोल्ड :

मुगाची ही जात एकावेळी परिपक्व होते. लागवड केल्यानंतर सरासरी 70 ते 75 दिवसांमध्ये पिक काढण्यासाठी तयार होते.या जातीपासून सरासरी दहा ते अकरा क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते.

6. बीएम 2002-1 :

या जातीच्या मुगामध्ये प्रथिन्यांचे प्रमाण जास्त आहे. लागवड केल्यानंतर सरासरी 65 ते 70 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीपासून सरासरी 9 क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते.ही जात भुरी या रोगासाठी प्रतिकारक आहे.

7. बीएम 2003-2 :

या जातीच्या शेंगा लांब असतात आणि दाणे चमकदार असतात. लागवड केल्यानंतर सरासरी 65 ते 70 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते या जातीपासून हेक्‍टरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन मिळते.

पूर्व मशागत :

  • पेरणी करण्याच्या अगोदर रब्बी हंगामा मधील पिकांचे अवशेष, पालापाचोळा गोळा करून जमीन पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावी.
  • जमिनीची खोल नांगरट करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी आणि सर्व ढेकळे फोडून काडी कचरा गोळा करून नष्ट करावा.
  • कुळवाच्या एक ते दोन पाळ्या मारून घ्याव्या.
  • पाळ्या घालत असताना जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत घालून घ्यावे आणि जमीन पेरणी योग्य करावी.

पेरणीची वेळ, अंतर आणि बियाणे :

  • मुगाची पेरणी वेळेवर करणे खूप महत्त्वाचे आहे.
  • हंगामाचा पहिला पाऊस झाल्यावर आणि जमिनीमध्ये वापसा तयार झाला की जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पेरणी केली जाते.
  • चांगले उत्पन्न घेण्यासाठी चांगल्या प्रकारचे बियाणे वापरणे देखील गरजेचे आहे आणि बियाण्यांची संख्या योग्य प्रमाणात असणे देखील आवश्यक असते.
  • मुग पेरणीकरिता 15 ते 20 किलो हेक्टरी बियाणे लागतात.
  • दोन ओळींमध्ये 30 सेंटीमीटर व दोन रोपांमध्ये 10 सेंटिमीटर अंतर ठेवावे.
  • असे केल्याने हेक्टरी रोपांची अपेक्षित संख्या बसते आणि उत्पन्न चांगले येते.

खत आणि पाणी व्यवस्थापन :

  • पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे.
  • शेणखता सोबतच गांडूळ खत किंवा घन जीवामृत जमिनीमध्ये टाकावे.
  • जमिनीला पाठ पाण्याने पाणी देत असताना जीवामृत सोडावे.
  • त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांची संख्या वाढते आणि सूक्ष्मजीवांची संख्या देखील वाढते आणि उत्पन्नामध्ये भर होते.
  • मुगाला पेरणीनंतर तीन ते चार दिवसांनी हलके पाणी दिले जाते.
  • उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने पाणी देण्याची गरज असते.
  • मुगाला फुल अवस्थेमध्ये आणि शेंगा अवस्थांमध्ये पाणी देणे गरजेचे असते.
  • कापणी करण्याच्या अगोदर पंधरा दिवस पिकाला पाणी देणे बंद करावे.

आंतर मशागत :

  • पीक लागवड केल्यानंतर सुरुवातीपासूनच तणांचे नियोजन करणे गरजेचे असते.
  • पिकाच्या वाढीसाठी शेत तन विरहित असणे महत्त्वाचे आहे.
  • कोळप्याच्या सहाय्याने कोळपणी करावी.
  • पहिली कोळपणी 20 ते 25 दिवसाच्या अंतराने करावी आणि दुसरी कोळपणी पहिला कोळपणीच्या 30 ते 35 दिवसाच्या अंतराने करावी.
  • कोळपणी केल्यामुळे जमीन भुसभुशीत राहते आणि जमिनीत हवा खेळती राहते.
  • त्यामुळे पिकासाठी पोषक वातावरण तयार होते.
  • दोन ओळीतील तन काढले जाते आणि रोपांना देखील मातीची भर लागते.
  • त्यामुळे कोळपणी करणे गरजेचे आहे.
  • कोळपणी वापसा तयार असताना करावे आवश्यकतेनुसार एक ते दोन खुरपणी करावी.

महत्त्वाच्या किडी आणि रोग :

1.मावा :

मावा ही रस शोषक कीड आहे.या किडीचे पिल्ले आणि प्रौढ पानाच्या मागील बाजू मधील सर्व रस शोषून घेतात. त्यामुळे पाने आकसतात. तसे या किडीच्या शरीराद्वारे चिकट गोड पदार्थ निघतो. त्या पदार्थावर काळे बुरशी आकर्षित होते .त्यामुळे प्रकाश संश्लेषण ची क्रिया मंदावते आणि झाड कमकुवत बनते. त्यामुळे उत्पादनामध्ये घट येते, या किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी व चिकट सापळ्यांचा वापर शेतामध्ये करावा.

2.ठिपक्यांची शेंग अळी :

ही कीड पानांना जाळे करून गुंडाळते व त्यामध्ये फुलांचे तुरे गुंडाळून आत राहून त्यावर आपला उदरनिर्वाह करते. त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येते .ही कीड काळपट रंगाची असते व किडीवर काळे चट्टे असलेले बघायला मिळतात.या किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त पाने नष्ट करावी आणि जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी.

3. शेंग अळी :

ही कीड शेंगा लागल्यानंतर त्या शेंगांना छिद्र पाडते आणि त्यामधील दाणे खाते.या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकावर दिसून येतो .या पिकावर नियंत्रण करण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करावी व मुगाच्या लागवडी सोबतच अंतर पिके घ्यावे व जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.

रोग :

1.भुरी :

रोगाचा प्रादुर्भाव होण्यासाठी कोरडे व दमट वातावरण पोषक असते .भुरीचा प्रसार हा हवेद्वारे होतो. आद्रतेचे प्रमाण 80 टक्के पेक्षा जास्त असल्यानंतर हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसतो .हा रोग झाल्यानंतर सर्व पिकावर पानांवर पांढऱ्या रंगाची भुकटी दिसून येते. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रोगप्रतिकारक वाणांची लागवड करावी आणि जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.

2.करपा :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर खोडावर आणि पानावर सुरुवातीला अनियमित आकाराचे तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.हे ठिपके वेळेनुसार मिसळून पाने पूर्णपणे करपतात. हळूहळू हे ठिपके रोपाच्या खालील भागाकडे जातात आणि रोपे पूर्णपणे कोलमडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पीक काढणी नंतर सर्व अवशेष जाळून टाकावेत आणि पीक व शेत पूर्णपणे स्वच्छ ठेवावे. पिकाची फेरपालट करावी आणि जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.

काढणी :

  • सर्वसाधारणपणे पेरणी केल्यानंतर 60 ते 70 दिवसांमध्ये काढण्यासाठी तयार होते.
  • पीक काढण्याची वेळ ही वेगवेगळ्या जातीनुसार वेगळी असू शकते.
  • सर्वसाधारणपणे जवळजवळ 70 ते 75 टक्के शेंगा हलके तपकिरी किंवा काळ्या रंगाच्या दिसू लागतात.
  • तेव्हा पीक काढले जाते. तयार झालेल्या शेंगा या दोन ते तीन तोड्यांमध्ये काढून घ्याव्यात.

साठवण :

  • मूग काढल्यानंतर कमीत कमी पाच ते सहा दिवस चांगले कडक उन्हामध्ये वाळवावे.
  • त्यानंतर साठवणूक करावे. साठवणुकीमध्ये पारंपारिक पद्धतीमध्ये कडू लिंबाचा पाला टाकावा.
  • साठवणूक हे ओलसर जागेमध्ये करू नये.
  • साठवणूक करताना एरंडी, करंज किंवा लिंबोळीचे तेल लावून साठवणुक केल्यानंतर धान्य किडीपासून सुरक्षित राहते.

उत्पादन :

  • मुगाचे उत्पन्न हे जमीन, पाण्याची उपलब्धता, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, हवामान या घटकांवर अवलंबून असते.
  • मुगाचे सरासरी हेक्टरी उत्पादन 15 ते 20 क्विंटल पर्यंत मिळते.
  • जास्तीत जास्त योग्य पद्धतीने नियोजन केल्यानंतर मुगाचे आपण 20 ते 25 क्विंटल हेक्टरी उत्पादन घेऊ शकतो.

👉Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

👉 https://naturekrushi.com/category/grain

5/5 - (2 votes)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *