Blogधान्य

Harbara Lagwad In Marathi

5/5 - (3 votes)

Harbara Lagwad

Harbara Lagwad: हरभरा पीक रब्बी हंगामा मधील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. हरभरा पिक कमी खर्चामधील पीक असून चांगला उत्पन्न देते. हरभरा या पिकाचे मानवी आहारामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. हरभऱ्याचे पीक घेण्यासाठी पेरणीची योग्य वेळ, बीज प्रक्रिया, लागवड, सुधारित जातींचा वापर, सिंचन पद्धती, पीक पोषण या सर्वांचा व्यवस्थित नियोजन केल्यावर चांगले उत्पन्न मिळते आणि शेतकऱ्याला देखील चांगला फायदा होतो.

लागणारी जमीन

  • हरभऱ्याची पेरणी करण्यासाठी मध्यम ते भारी 45 ते 60 सेंटिमीटर खोल कसदार, भुसभुशीत जमीन असणे गरजेचे आहे.
  • अशा जमिनीमध्ये जिरायत हरभऱ्याचे उत्पन्न चांगले होते.
  • उथळ, मध्यम जमिनीमध्ये पाण्याचे योग्य नियोजन केल्यावर देखील हरभरा चांगला होऊ शकतो.
  • हलकी, पाणथळ क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी टाळावी.
  • हरभरा लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थ भरपूर असलेली जमीन निवडावी.
  • हरभरा लागवड करण्यासाठी जमिनीचा सामू 5.5 ते 8.6 च्या दरम्यान असल्यास हरभऱ्याचे पीक चांगले होते.

लागणारे हवामान :

  • हरभरा या पिकाला कोरडे आणि थंड हवामान योग्य ठरते.
  • हरभऱ्यासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो, असे वातावरण हरभऱ्यासाठी चांगले ठरते.
  • लागवड केल्यानंतर 20 दिवसानंतर 10 अंश ते 15 अंश सेल्सिअस तापमान पिकासाठी चांगले ठरते.
  • हरभऱ्यासाठी 25 अंश 27अंश सेल्सिअस तापमान योग्य ठरते.
  • हरभरा लागवडीसाठी वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे 700 ते 1000 मिमी असल्यावर उत्पन्न चांगले मिळते.

हरबरा सुधारीत जाती

1. विजय :

या जातीच्या हरभऱ्याचे उत्पन्न महाराष्ट्र ,मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये केली जाते.या जातीपासून चांगले उत्पन्न मिळते. ही जात मर रोगासाठी प्रतिकारक असून बागायती, जिरायती आणि उशिरा पेरणीसाठी योग्य असून जिरायती लागवडीसाठी 85 ते 90 दिवस लागतात आणि बागायती लागवडीसाठी 105 ते 110 दिवसाचा कालावधी लागतो. या जातीपासून हेक्‍टरी 13 क्विंटरपर्यंत उत्पन्न मिळते.

2. विशाल :

लागवड केल्यानंतर सरासरी 110 ते 115 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. ही जात महाराष्ट्र मध्ये लागवडीसाठी प्रसारित केलेली आहे.या जातीचे दाणे आकर्षित ,पिवळे टपोरे असतात. या जाती पासून अधिक उत्पादन मिळते. ही जात मर रोगासाठी प्रतिकारक असून बाजारामध्ये या जातीला अधिक बाजार भाव असतो . या जातीपासून सरासरी 13 क्विंटल हेक्‍टर उत्पन्न मिळते.

3. विराट :

हरभऱ्याची ही जात काबुली वाण असून या जातीचे दाणे जास्त टपोरे असतात. ही जात मर रोगासाठी प्रतिकारक्षम असून या जातीपासून सरासरी 11 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते आणि बागायती उत्पादनामध्ये सरासरी 19 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते. लागवड केल्यानंतर सरासरी 110 ते 115 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीच्या हरभऱ्याला बाजारामध्ये चांगला भाव मिळतो आणि महाराष्ट्र राज्य करिता ही जात प्रसारित केलेली आहे.

4. दिग्विजय :

ही जात जिरायत लागवड केल्यानंतर सरासरी 14 क्विंटल हेक्‍टरी आणि बागायत लागवड केल्यानंतर सरासरी 23 क्विंटल हेक्टरी पर्यंत उत्पन्न देते. जिरायती लागवड केल्यानंतर 90 ते 95 दिवसांमध्ये पिक तयार होते आणि बागायती लागवड केल्यानंतर 105 ते 110 दिवसांमध्ये पिक काढण्यासाठी तयार होते. या जातीचे दाणे टपोरे, पिवळसर तांबूस असून ही जात मर रोगासाठी प्रतिकारक्षम आहे.ही जात महाराष्ट्र करिता प्रसारित केलेली आहे.

5. कृपा :

या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 105 ते 110 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीची लागवड बागायती पेरणीसाठी केली जाते. या जातीपासून सरासरी 18 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते. या जातीच्या दाण्यांचा आकार टपोरा असून हा काबुली वाण आहे, दाण्याचा रंग सफेद असतो. या जातीच्या हरभऱ्यांना सर्वाधिक जास्त बाजारभाव मिळतो. ही जात कर्नाटक मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांकरता प्रसारित आहे.

6. पीकेव्हिके -2 :

या जातीची पेरणी बागायती लागवड म्हणून केली जाते. या जातीपासून सरासरी 26 ते 27 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते. लागवड केल्यानंतर सरासरी 110 ते 115 दिवसांमध्ये पीक पूर्णपणे काढण्यासाठी तयार होते. ही जात महाराष्ट्र या राज्य करिता प्रसारित केलेले असून ही जात काबुली वाण असून आणि या जातीचे दाणे अधिक टपोरे असतात.

7. पीकेव्हिके -4 :

या जातीपासून सरासरी 16 ते 18 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.लागवड केल्यानंतर सरासरी 105 ते 110 दिवसांमध्ये पिक काढण्यासाठी तयार होते. या जातीचे दाणे जास्त टपोरे असतात, हा काबुली वाण असून महाराष्ट्र राज्य करिता ही जात प्रसारित केलेली आहे.

8. फुले विक्रम :

या जातीची लागवड केल्यानंतर सरासरी 105 ते 110 दिवसांमध्ये पीक काढण्यासाठी तयार होते. या जातीच्या वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने काढणी करू शकतो. या जातीपासून अधिक उत्पादन मिळते. ही जात मर या रोगासाठी प्रतिकारक असून महाराष्ट्र राज्य करिता प्रसारित करण्यात आलेली आहे. जिरायती लागवडीसाठी सरासरी उत्पन्न 16 क्विंटल हेक्टरी मिळते आणि बागायती लागवडसाठी सरासरी 22 क्विंटल हेक्टरी उत्पन्न मिळते.

पुर्व मशागत :

  • हरभरा या पिकाची मुळे खोल जातात.
  • त्यामुळे जमीन भुसभुशीत असणे गरजेचे असते.
  • पूर्व मशागतीसाठी जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी.
  • त्यानंतर कोळवाच्या दोन पाळ्या घालाव्यात, नांगरणी पुर्व जमिनीवर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खर्च पसरावे.
  • कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडी कचरा वेचावा.
  • जमीन स्वच्छ करावी आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस महिन्यामध्ये जमीन पूर्णपणे तयार करून घ्यावी.

पेरणीची वेळ, पद्धत आणि बियाणे :

  • कोरडवाहू जमिनीमध्ये 25 सप्टेंबर नंतर ओल असल्यावर पेरणी केली जाते.
  • बागायती हरभरा 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या महिन्यांमध्ये पेरला जातो.
  • देशी हरभऱ्याची पेरणी तिफनने केली जाते.
  • पेरणीचे अंतर 30 × 10 सेंटिमीटर या अंतरावर हरभऱ्याची पेरणी केली जाते.
  • टपोऱ्या दाण्यांच्या वाणाकरिता 100 किलो हेक्‍टरी बियाणे पुरतात.
  • मध्यम आकाराच्या दाण्यांसाठी 65 ते 70 किलो बियाणे लागतात आणि आकाराने लहान असलेला दाणांकरिता 60 ते 65 किलो हेक्टरी बियाणे पुरतात.

आंतर मशागत

  • चांगले उत्पन्न घेण्यासाठी पहिला 30 ते 45 दिवसांमध्ये शेतामध्ये तन उगवून देऊ नये.
  • ते उत्पादनाच्या दृष्टीने आवश्यक असते.
  • त्यासाठी पिक 20 ते 25 दिवसाच्या असताना पहिले कोळपणी करावी आणि 30 ते 35 दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी.
  • कोळपणी केल्यामुळे जमिनीमधील बाष्पीभवनाचा वेग कमी होतो आणि जमिनीमध्ये ओल जास्त काळापर्यंत टिकून राहते.
  • तसेच ओळींमधील तन काढले जाऊन रोपांना मातीची भर देखील लागते.
  • नंतर दोन रोपांमधील तर काढण्यासाठी लगेच खुरपणी करून घ्यावी.

खत आणि पाणी व्यवस्थापन

  • जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचे कुजलेले शेणखत टाकून घ्यावे.
  • जमिनीमध्ये घन जीवामृत गांडूळ खत देखील टाकावे.
  • पाण्याचे नियोजन करत असताना जमिनीमध्ये जीवामृत देखील सोडावे त्यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब देखील वाढतो.
  • जिरायती हरभरा क्षेत्रामध्ये जमिनीमधील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे आवश्यक असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागतानाच पाणी द्यावे.
  • बागायती हरभरा शेताची बांद भरणी करत असताना दोन सरिंमधील अंतर कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • मध्यम प्रकाराच्या जमिनीमध्ये पहिले पाणी 20 ते 25 दिवसांनी दुसरे पाणी 45 ते 50 दिवसांनी आणि तिसरे 65 ते 70 दिवसानंतर द्यावे.
  • भारी जमिनीमध्ये फक्त दोन वेळाच पाणी द्यावे.
  • पाण्याचे नियोजन करताना जमिनीमध्ये फार मोठ्या भेगा पडून देऊ नये.

महत्वाच्या किडी आणि रोग

किडी

1.घाटेअळी :

ही अळी सुरुवातीला पानावरील आवरण खरडून खातात .प्रादुर्भाव झालेली पाने जाळीदार व भुरकट पांढरी झालेली दिसतात .विकसित अळी घाटे आणि कळ्या व फुले कुर्तुडून खातात.पूर्ण वाढ झालेली अवस्था तोंडाकडील भाग घाटात घालून आतील दाणे खाऊन टाकते. त्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते .या किडीवर नियंत्रण करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे किडींचे कोष पक्षी वेचून खातात आणि उन्हाळ्यामध्ये त्यांचा नायनाट होतो. योग्य अंतरावर पेरणी करावे. कामगंध सापळ्यांचा वापर शेतामध्ये करावा शेतामध्ये पक्षी थांबे वापरावे.

2.लष्करी अळी :

ही अळी फिकट रंगाची गोलाकार असते. ही अळी पानावर आणि घाटांवर दोन्हीवर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव करते. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी आणि शेतामध्ये पक्षी थांबे लावावेत.

3. पाने पोखरणारी अळी :

या किडीची मादी पानावर अंडी घालते आणि हे पिवळ्या रंगांची असते. ही अळी पानांमध्ये शिरून आतील हरितद्रव्य खाते. त्यामुळे पानाच्या वरच्या बाजूला नागमोडी आकाराच्या रेषा दिसतात. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी शेतामध्ये करावे.

4. मावा :

ही कीड पानांमधील आणि फांद्यांमध्ये अन्नरस मोठ्या प्रमाणावर शोषते. ही कीड स्वतःच्या शरीरामधून एक चिकट गोड पदार्थ स्त्रवते. त्यामुळे त्या गोड पदार्थावर काळी बुरशी आकर्षित होते. त्यामुळे संपूर्ण झाड काळे पडते आणि प्रकाश संश्लेषांची क्रिया मंदावते. याचा अनिष्ट परिणाम हरभऱ्याच्या उत्पादनावर होतो. या किडीचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी घ्यावी आणि चिकट सापळ्यांचा वापर शेतामध्ये करावा.

रोग

1. मर रोग :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रादुर्भावग्रस्त रोपांची कोवळी पाने, फांद्या सुकतात. या रोगावर नियंत्रण करण्यासाठ जैविक बुरशीनाशकाचे फवारणी करावी.

2. कोरडी मूळकूज :

या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर रोपांची वरील पाने व भाग पिवळा पडून सुकून जातात. त्यानंतर पाने गवती रंगाची होतात. मुळे पूर्णपणे सडून जातात, रोपटे उपटले असता सहज निघून येतात. या रोगावर नियंत्रण करण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी करावी.

3. ओली मूळकूज :

प्रादुर्भाव झाल्यानंतर रोपे बुटकी होतात. पाने पिवळी पडून वाढ पूर्णपणे खुंटते. रोप उपटून पाहिल्यावर मुळे पूर्णपणे कुजलेले दिसतात. सालीवर बुरशीची काळसर वाढ दिसून येते. या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी.

काढणी आणि उत्पादन

  • हरभऱ्याच्या पिकाचे उत्पादन लागवड केल्यानंतर 110 ते 120 दिवसांमध्ये मिळते.
  • पीक ओलसर असताना काढणी करणे टाळावे.
  • घाटे पुर्णपणे वाळल्यानंतर मगच हरभऱ्याची काढणी करावी आणि त्यानंतर मळणी करावी.
  • यानंतर धान्याला पाच ते सहा दिवस कडक उन्हामध्ये सुकवून घ्यावे.
  • हरभरा साठवून ठेवावा. त्यामध्ये कडुलिंबाचा पाला घालावा, त्यामुळे साठवणुकीमध्ये बरेच दिवस हरभऱ्याला कीड लागत नाही.
  • हरभऱ्याची शेती व्यवस्थित नियोजनाने केल्यावर सरासरी 25 ते 30 क्विंटल हेक्‍टरी उत्पादन मिळते.
  • हरभऱ्याचे उत्पादन जमिनीची निवड, पेरणीची पद्धत, हवामान, वेगवेगळ्या जातीनुसार, खत आणि पाणी व्यवस्थापन या गोष्टींवर अवलंबून असते.

Follow This Page : https://www.facebook.com/naturekrushi

https://naturekrushi.com/category/grain

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *