काजू लागवड
ब्राझील हे काजूच्या फळझाडाचे उगम स्थान आहे .सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला भारताच्या समुद्रकिनाऱ्याजवळ प्रदेशात प्रामुख्याने पोर्तुगीजांनी जमिनीची धूप होऊ नये म्हणून काजूचा प्रसार केला. काजूच्या लाकडाचा उपयोग होड्या, नावा, टाईपराईटर चे रोलर्स बनवण्यासाठी होतो .काजूच्या झाडाच्या साली मधून मिळणाऱ्या रसापासून स्याही आणि रंग तयार करता येतो .काजूच्या झाडापासून तांबड्या रंगाचा डिंक आणि टॅनिन सुद्धा मिळते. काजूच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. काजूच्या फळाचे आभासी फळ आणि खरी फळ असे दोन भाग असतात. काजूच्या फळाला बोंड असे म्हणतात. बोंडाचा रंग लाल पिवळा किंवा केशरी सुद्धा असतो आणि त्याच्या खालील बाजूला काजूचा बी असतो. काजूजच्या भोंडूपासून सरबत आणि मध्येही तयार केला जातो. काजूच्या बिया म्हणजे खरे फळ ,या बिया मूत्रपिंडाकृतीचे असतात आणि त्यावर एक कठीण कवच असते .पूर्णपणे वाढ झालेल्या काजू गराची काढणी केली जाते. त्याच्या कवच मध्ये कॉस्टिक ऑइल असते .काजूगरांना उष्णता देऊन ते तेल वेगळे केले जाते. जर आपण तेल वेगळे केले नाही तर तेलामुळे त्वचेवर फोड येऊ शकतात. कवच वेगळे केल्यानंतर जो आतील गर असतो त्याला काजूचे बी असे म्हणले जाते .काजू पासून जे तेल मिळते त्याचा उपयोग बऱ्याच सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.
लागणारी जमीन :
काजू साठी खडकाळ डोंगर, उताऱ्यावरील मुरमाड जमीन योग्य ठरते.
रेताड आणि वाळू मिश्र जमिनीत काजूची लागवड योग्य प्रकारे करता येते.
विशेषतः जांभ्या दगडापासून तयार झालेल्या तांबड्या मातीमध्ये काजूची लागवड उत्तम ठरते.
काजूच्या लागवडीसाठी जमीन योग्य निचरा होणारी असावी काळ्या किंवा भारी जमिनीमध्ये आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये काजूची लागवड करू नये.
लागणारे हवामान :
या भागामध्ये पाऊस वर्षभर कमी प्रमाणामध्ये पडतो.
अशा भागामध्ये काजूची लागवड चांगली ठरते .कडाक्याची थंडी आणि धुके काजूला सहन होत नाही.
उष्ण आणि दमट वातावरण काजूच्या उत्पादनासाठी उत्तम ठरते.
काजू हे उष्णकटिबंधीय झाडांमध्ये मोडते आणि काजूला 20 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान योग्य ठरते.
या तापमानामध्ये काजूचे भरभोज उत्पन्न मिळते.
काजूच्या सुधारित जाती :
डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काजूच्या सात जाती प्रसारित केल्या आहेत त्या खालील प्रमाणे
1.वेंगुर्ला -१ : काजूच्या या जातीतून एका झाडापासून पंधरा ते वीस किलो उत्पादन भेटते .एका किलोमध्ये 160 बियांची संख्या असते आणि बी मध्ये गराचे प्रमाण 30% असते आणि ह्या जातीच्या बोंडूचा रंग पिवळा असतो.
2. वेंगुर्ला -४ : काजूच्या या जातीच्या बोंडूचा रंग तांबडा असतो आणि एका किलो बियांमध्ये 140 बिया असतात आणि बी मध्ये गराचे प्रमाण 31 टक्के असते .एका झाडापासून सरासरी 15 ते 20 किलो उत्पादन मिळते.
3. वेंगुर्ला -६ : काजूच्या या जातीच्या एका झाडापासून पंधरा ते वीस किलो उत्पादन भेटतं आणि एका किलो मध्ये बियांची संख्या 125 पर्यंत असते. काजूच्या या बियांमधील गराचे प्रमाण 28% असते आणि बोंडूचा रंग पिवळसर असतो.
4. वेंगुर्ला -७ : काजूच्या या जातीच्या बोंडूचा कलर पिवळा असतो आणि बियांमध्ये गराचे प्रमाण 31 % असून एका किलो बियांमध्ये शंभर बिया असतात .एका झाडापासून सरासरी उत्पादन 15 ते 20 किलो प्रतिवर्षी भेटते.
5. वेंगुर्ला -८ : काजूच्या वेंगुरला ८ या जातीमधून एका झाडाचे उत्पादन 15 ते 20 किलो दरवर्षी मिळते आणि एका किलो बियांमध्ये 87 बिया मिळतात या जातीच्या बियांमध्ये गराचे प्रमाण 28% असून बोंडूचा कलर नारंगी असा असतो.
6. वेंगुर्ला -९: काजूच्या ह्या जातीच्या बोंडूचा कलर नारंगी असतो आणि एका झाडांमधून पंधरा ते वीस किलो उत्पादन दरवर्षी मिळते. एका किलो बियांमध्ये 113 बिया बसतात आणि गराचे प्रमाण 29 टक्के पर्यंत असते.
काजूची अभिवृद्धी व हंगाम आणि लागवड पद्धती :
काजूच्या झाडांची अभिवृद्धी ही रोपे तयार करून केली जाते आणि तसेच डोळे भरून विनहिर कलम, गुटी कलम, भेट कलम, मृदकाष्ट कलम, करून सुद्धा केली जाते.
बियांपासून तयार झालेल्या झाडांमध्ये परपरागीकरण असल्यामुळे मातृ वृक्षाची सर्व गुणधर्म येत नाहीत.
म्हणून शक्यतो काजूची लागवड कलमा पासून केलेली योग्य ठरते.
कलम पद्धतीमध्ये शेतकरी मृदकाष्ट कलमे करण्याची पद्धत जास्तीत जास्त वापरतात.
ही पद्धत कमी खर्चात होते आणि जास्त यशस्वी देखील ठरते.
काजूची लागवड ही पावसाळ्याच्या सुरुवातीला करावी जेणेकरून झाड मातीत व्यवस्थित रुजू होते आणि प्रत्येक खड्ड्यांमध्ये एकच कलम लावावे.
रोपांची लागवड करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीची नांगरट करून आणि आखणी करून घ्यावी.
आखणी केल्यानंतर 60×60×60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे पाडावेत.
खड्ड्यांमध्ये चांगले कुजलेले शेणखत, वरची माती, घन जीवामृत याने खड्डा अर्धा पर्यंत भरत आणावा आणि त्यानंतर त्या खड्या मध्ये एक कलम मधोमध लावावे.
लागवड करताना कलमाचा जोड मातीच्या आत जाणार नाही याची पुरेपूर दक्षता घ्यावी.
लागवड झाल्यानंतर प्रत्येक रोपाला एक काठीचा आधार द्यावा.
काजूच्या लागवडीसाठी 7×7 किंव्हा 8×8 मीटर अंतरावर काजूची लागवड करावी.
काजूच्या लागवडीसाठी आपण निरनिराळ्या पद्धती वापरू शकतो.
जसे की चौरस पद्धत, चौकोनी पद्धत, षटकोनी पद्धत आणि सम पातळी उतार पद्धती जर जमीन सपाट असेल तर काजूची लागवडीसाठी चौरस पद्धती योग्य ठरते.
कारण या पद्धतीने मध्ये दोन्ही बाजूने अंतर मशागत करणे खूप सोपे जाते.
काजूच्या झाडाची छाटणी आणि वळण देणे:
काजूचे झाड हे पसरट वाढते. त्यामुळे पहिले दोन ते तीन वर्षांमध्ये काजूच्या झाडाची छाटणी करून त्याला वळण देणे झाडाच्या वाढीसाठी चांगले असते.
सर्वप्रथम काजूचे झाड एक मीटर उंचीच्या झाल्यावर त्याला छाटावे.
त्यानंतर सर्व बाजूंनी चार ते पाच जोमदार फांद्या चारी बाजूंनी पसरतील अशा ठेवाव्यात त्यानंतर झाडावर येणाऱ्या वाकड्यातिकड्या फांद्या, अनावश्यक फांद्या वेळोवेळी काढून टाकाव्यात.
त्याच सोबत रोगाट, कमजोर, वाळलेल्या फांद्या, सुद्धा काढाव्यात .काजूच्या झाडाची छाटणी फक्त सुरुवातीच्या काळात करणे गरजेचे असते.
त्यानंतर छाटणी करण्याची गरज पडत नाही.
खते आणि पाणीपुरवठा :
काजूचे झाड हे खतांना चांगले प्रतिसाद देते.
पावसाळ्याच्या अगोदर आणि पावसाळ्याच्या नंतर अशा दोन भागांमध्ये काजूच्या झाडाला खते द्यावी.
भरघोस उत्पन्नासाठी सेंद्रिय खतांचे प्रमाण जास्त असावे.
झाडाला वेळोवेळी जीवामृत सोडावे. जेणेकरून सूक्ष्म जीवांची जमिनीमध्ये संख्या वाढेल आणि उत्पादनात भर होइल.
काजूची झाड हे कणखर असल्यामुळे त्याला पाण्याची जास्त गरज पडत नाही.
पण हिवाळे आणि उन्हाळे या दिवसांमध्ये काजूच्या झाडाला पाण्याचा ताण पडू नये म्हणून पाणी द्यावे.
हिवाळ्याच्या दिवसात दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरावर आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सहा ते सात दिवसाच्या अंतरावर काजूच्या झाडाला पाणी द्यावे.
आंतरपिके आणि अंतर मशागत :
ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे तिथे आपण आंतरपीके घेऊ शकतो.
कारण काजूचे पीक हे कोरडवाहू पीक म्हणून काही विभागांमध्ये लावले जाते.
कोकण ह्या विभागामध्ये काजूच्या बागेमध्ये हळद हे आंतरपीक म्हणून घेतले जाते.
पण आपण काजूच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून मिरची, हरभरा, रताळी, वांगी, उडीद, नागली असे कमी कालावधीची पिके घेऊन नफा मिळवू शकतो.
बागेतील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी आच्छादन करावे वेळोवेळी खुरपणी करावी.
काजूच्या किडी आणि रोग :
1. टी मॉस्किटो बग :
ही कीड मोहर आणि नवीन पालवी मधील रस शोषते .याचा प्रादुर्भाव असा होतो की मोहर पूर्णपणे सुकून जातो आणि फळे गळू लागतात . या कीडीचा प्रादुर्भाव नवीन पालवी आल्यापासून ते फळ धारणे पर्यंत असतो. या किडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी मोहर फुटण्याच्या आणि फळधारणेच्या वेळी जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.
2.रोठा किंवा खोडकिडा :
ही कीड काजूच्या झाडाची साल पोखरते आणि त्याच्या आतील गाभा खायला सुरुवात करते. किडीचा प्रादुर्भाव हा उघडी मुळे आणि झाडाचे खोड यावर जास्त प्रमाणात आढळते. जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर काही वेळा झाड मरून जाते. किडीचे नियंत्रण करण्यासाठी झाडाची साल काढून खोड किड्याला मारून टाकावे. तो संपूर्ण भाग जैविक कीटकनाशक किंवा रॉकेल च्या साह्याने भिजवावा अथवा छिद्रामध्ये ओतावे .झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये याची काळजी घ्यावी.
काजू वरील रोग :
1.पानावरील करपा :
या रोगामध्ये पानावर करड्या पिंगट रंगाचे वेडेवाकडे आकाराचे ठिपके सुरुवातीला दिसतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर संपूर्ण पान करपू लागते आणि शेवटी गळून पडते. रोगांचे नियंत्रण करण्यासाठी काजूच्या बागेची व्यवस्थित काळजी घ्यावी आणि जैविक बुरशीनाशकांची फवारणी वेळोवेळी करावी.
2.काजू वरील फांदी मर :
बागेमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर काजूच्या झाडा च्या फांदा टोकाकडून खाली वाळत जाते अशी लक्षणे बागेत दिसल्यानंतर फांदी मर या रोगाचा प्रादुर्भाव बागेत झालेला आहे असे समजावे. रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी नुकसान झालेल्या फांद्या कापून टाकावे आणि कापून टाकलेल्या भागावर बुरशीनाशक लावावे.
काढणी आणि उत्पन्न :
काजूची लागवड केल्यानंतर चांगली निगा राखल्यास काजूच्या झाडांना चौथ्या ते पाचव्या वर्षी फुलोरा याला सुरू होतो.
परंतु सातव्या ते आठव्या वर्षापासून उत्कृष्ट प्रतीचे उत्पादन मिळायला सुरुवात होते आणि हे उत्पादन पुढील 40 ते 50 वर्ष नियमित राहते.
काजूचे उत्पादन हे काजूच्या झाडावर असणाऱ्या लहान फांदींवर अवलंबून असते.
ज्या झाडांना जास्त लहान फांद्या असतात त्या झाडांचे उत्पादन जास्त मिळते.
फेब्रुवारी महिन्यापासून काजू बिया तयार होण्यासाठी सुरुवात होते आणि मार्च एप्रिल मध्ये बिया काढणीस तयार होतात.
आंब्याच्या हंगामा सोबतच काजूचा हंगाम सुद्धा असतो. काजू एकावेळी तयार होत नाही त्यामुळे जसे जसे काजू तयार होतील तशी आपल्याला काढणी करावी लागते आणि काढणी हाताने केली जाते.
हे काम 45 ते 75 दिवसापर्यंत चालू राहते. खाली पडलेल्या सर्व बिया आणि बोंडे उचलून घ्यावीत.
पूर्ण पिकलेली फळे झाडावर तशीच राहू दिल्यास वटवाघळे ती खाऊन टाकतात त्यामुळे पूर्ण पक्व झालेली काजू बोंडे वेळोवेळी काढून घ्यावे.
त्यानंतर पूर्ण पिकलेला काजू बिया बोंडांपासून वेगळ्या कराव्या आणि दोन ते तीन दिवस उन्हात चांगल्या वाळून द्याव्यात.
त्यामुळे बियांमधल्या ओलावा हा 10ते 12 टक्के राहतो.
प्रत्येक मोठ्या झाडापासून 75 ते 100 किलो काजू फळे आणि 20 ते 30 तीस किलो काजू बिया दरवर्षी मिळतात.